Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पददलितांचा कैवारी

पददलितांचा कैवारी
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशात सामाजिक न्याय प्रस्थापित व्हावा, यादृष्टीने 'स्वातंत्र्य, समता व बंधुता' या त्रिसूत्रीचा पुरस्कार केला. गरीब-श्रीमंत, सवर्ण-मागसवर्गींय, कामगार-मालक हे भेदाभेद मिटवून सर्वधर्मीय लोक हे कायद्यापुढे समान आहेत, ही संकल्पना त्यांनी जनमानसात दृढ करुन देशातल्या प्रत्येक नागरिकाला राज्यघटनेच्या माध्यमातून मतदानाचा हक्क बहाल केला. आज (ता.14) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. ‍त्यानिमित्त त्यांच्या गौरवपूर्ण व महान कार्यावर टाकलेल्या हा दृष्टीक्षेप ....
सामाजिक न्यायचे प्रणेते भीमराव रामजी आंबेडकर ऊर्फ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू गावी झाला आणि जणू काय, एका सामाजिक क्रांतीचा उदय झाला. खरं तर, शालेय जीवनात बाबासाहेबांना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांचे वडील रामजी सुभेदारांनी शिकवलं. बाबासाहेब अवघे 5 वर्षांचे असताना त्यांच्या मातोश्रींचे आकस्मिक निधन झालं आणि बाबासाहेबांच्या शिरावरची जणू मायेची सावलीच विरुन गेली. एकूण आर्थिक स्थिती बेताची असल्याचे बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याकडे नोकरी करुन पुढे त्यांच्या मदतीने डॉ. बाबासाहेबांनी उच्च शिक्षण घेतले आणि पुढे समाजातील जातीभेदाचे उच्चाटन करुन, सामाजिक न्याय प्रस्थापित केला.

डॉ.आंबेडकर हे तळागाळातील लोकांना बौद्धिक व सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करुन समानतेचा मंत्र देणारे दीपस्तंभ होते. गरीबी व निरक्षरता ही गुलामगिरीची मूळ कारणे असल्याने त्यांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र रयतेला दिला. शिकल्याशिवाय आपल्यावर अन्याय होतोय हे कळत नाही आणि आपले हक्क मिळत नाहीत, हा विचार पददलितांना देऊन बाबासाहेबांनी सामाजिक क्रांतीचे रणशिंग फुंकले आणि पाच हजार वर्षांपासून अमानुष व लाचारीचे जीवन जगणार्‍या जनमानसात आत्मसन्मानाची व अस्मितेची ज्योत पेटवली.

शिक्षण हे समाज परिवर्तनाचे आयुध असून, त्यातूनच खर्‍या अर्थाने माणसाला आपल्या घटनादत्त अधिकार व कर्तव्याची जाणीव होऊन तो विवेकी व विचारी होतो. स्त्रियांना शिक्षण दिले तर त्या मुलांवर चांगले संस्कार घडवू शकतील, असा मोलाचा उपदेश बाबासाहेबांनी पददलितांना दिला. वंचित-उपेक्षित वर्गाच्या पाल्यांसाठी त्यांनी सोलापूर, पनवेल, ठाणे, पुणे, नाशिक, बेळगाव आदी ठिकाणी वसतिगृहे सुरु करुन विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी शिष्यवृत्तीचीही व्यवस्था केली. इतकेच नव्हे तर डॉ. बाबासाहेबांनी औरंगाबाद येथे मिलिंद कॉलेज, मुंबईत सिद्धार्थ कॉलेज व लॉ कॉलेज स्थापन केले. याशिवाय मुंबई, औरंगाबाद, पंढरपूर, दापोली, नांदेड आदी ठिकाणी शैक्षणिक संस्थांचं जाळंही निर्माण केलं.

webdunia
ND
डॉ. आंबेडकरांनी स्वकर्तृत्त्वाने व विद्वत्तेच्या जोरावर शिक्षण क्षेत्रात अनन्यसाधारण कामगिरी केली. स्वत: बाबासाहेबांनी कोलंबिया विद्यापीठातून 'भारताचे राष्ट्रीय उत्पन्न' या विषयावर संशोधन करुन पी.एच.डी. संपादन केली. तर 'रुपयाची समस्या' या विषयावर संशोधन करुन लंडन विद्यापीठातून डी.एस्सी. व बार एट लॉ ही पदवी प्राप्त केली. अर्थशास्त्राचा सखोल अभ्यास करुन डॉ. आंबेडकरांनी विविध पदव्या संपादन केल्या. खरं पाहता, बाबासाहेबांनी सर्वप्रथम स्वत: शिकून-सवरुन शिक्षणाचे महत्त्व व उपयुक्तता चांगल्याप्रकारे जाणून घेतली आणि त्यांनतर पददलित बंधु-भगिनींमध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण करुन त्यांना शिक्षण घेण्यास प्रवृत्त केले. म्हणूनच बाबासाहेबांना पददलितांचे कैवारी म्हणून संबोधले जाते.

शतकानुशतके दुर्लक्षित व वंचित समाजाला जागृत करण्यासाठी वृत्तपत्रासारखं दुसरं साधन नाही, असे बाबासाहेबांचं ठाम मत होतं. भारतीय समाजजीवनात ज्यांना कधीच आवाज उमटला नाही, अशांना बोलकं करण्याचं काम डॉ. आंबेडकरांनी प्रकाशित केलेल्या मूकनायकने केलं. त्यापाठोपाठ बहिष्कृत भारत, जनता, प्रबुद्ध भारत सारखी वृत्तपत्रे त्यांनी लोकजागृती व लोकशिक्षणासाठी सुरु केली. वृत्तपत्रे हे जनतेचे एक जबाबदार सल्लागार असून वस्तुनिष्ठ बातम्या छापणे हे प्रत्येक वृत्तपत्राचे आद्यकर्तव्य आहे, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. जातीभेदामुळे रुढ झालेली सामाजिक विषमता समाजातून हद्दपार करण्यासाठी बाबासाहेबांनी वृत्तपत्र या आयुधाचा वापर करुन समाजात समानतेची शिकवण दिली व समाजपरिवर्तन घडवून आणलं.

डॉ. आंबेडकरांना विविध विषयांचे ग्रंथ संग्रहित करण्याचा दांडगा व्यासंग होता. अध्यापनाचे काम करणार्‍या शिक्षक, अध्यापकांनी आपल्या पगारातून ग्रंथ खरेदीसाठी काही प्रमाणात नियमित खर्च करावा, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. आर्थिक स्थिती बेताची असल्याने बाबासाहेबांनी कर्ज काढून मुंबईत राजगृह नामक भव्य ग्रंथालय उभारलं. जागतील विविध देशांच्या राज्यघटना तसेच सामाजिक, राजकीय क्रांतींचा इतिहास, धर्मग्रंथ, संतांची ‍चरित्रे व तत्त्वज्ञान, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, समाजशास्त्र, विज्ञान, विधीशास्त्र, इतिहास, भूगोल, शिक्षणशास्त्र आदी विषयांची सुमारे 50 हजार पुस्तके संग्रहित केली. याशिवाय मराठी, हिंदी, इंग्रजी व पर्शियन गद्य-पद्य साहित्यांची पुस्तकेही त्यांनी संकलित करुन अभ्यासली. बाबासाहेब म्हणत ''जीवन कार्याला दिशा दाखविणारे व स्फुर्ती देणारे ग्रंथ हेच माझे खरे गुरुमि‍त्र होत.''

समाजातून निरक्षरता, गरिबी, जातीभेद यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी लोकशाही शासनप्रणाली सर्वोत्तम, अशी त्यांची ठाम भूमिका होती. राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेबांनी प्रत्येक नागरिकाला व्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, धर्म स्वातंत्र्य, व्यवसाय स्वातंत्र्य, न्यायालयात दाद मागण्याचा हक्क आदी मूलभूत अधिकार बहाल केले. कुठल्याही जाती-धर्माची मग ती स्त्री असो व पुरुष कायद्यापुढे समान असून, त्यांना समान नागरिकत्त्वाचा हक्क प्रदान करण्यात बाबासाहेबांनी पुढाकार घेतला. महाडचे चवदार तळे अस्पृशांसाठी खुलं करणे, नाशिक येथील काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा यासाठी केलेला सत्याग्रह तसेच मनु्स्मृतीची जाहीररित्या होळी करुन त्यातील चातुर्वर्ण्य समाजव्यवस्थेला विरोध अशा ऐतिहासिक मोहिमा उभारुन बाबासाहेबांनी सार्‍या देशात समानतेची बिजे रोवली. सामाजिक लोकशाहीच्या पायावर राजकीय लोकशाहीची उभारणी झाली तरच, खर्‍याअर्थाने लोकशाही यशस्वी होऊ शकेल, असा राजकीय मंत्र त्यांनी राज्यकर्त्यांना दिला. बाबासाहेब हे लोकशाहीचे खरे उपासक व पुरस्कर्ते होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एआय तंत्रज्ञान करू शकते एलियनचा शोध घेण्यास मदत