Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अनंत चतुर्दशीचे महत्व

अनंत चतुर्दशीचे महत्व
अनंत चतुर्दशी भाद्रपद शुद्ध चतुर्दशी या तिथीला साजरी करतात.
महाराष्ट्रात दहा दिवसांच्या गणपतीचे विसर्जन या दिवशी करतात.
भाद्रपद शुध्द चतुर्दशीला अनंत चतुर्दशी म्हणत असतात.
या दिवशी अनंत म्हणजे विष्णुची पूजा करतात व अनंताचे व्रत करतात. आपल्यावर आलेले संकट दूर व्हावे व आपल्याला पुन्हा वैभव प्राप्त व्हावे म्हणून सतत चौदा वर्षे चौदा गाठी असलेले रेशमी दोरा अनंत मानून त्याची पूजा करून हे व्रत पूर्ण करतात.
 
पांडवांना द्यूतात हरल्यावर १२ वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवास भोगावा लागला.
पुढे या आपत्तीतून सुटका व्हावी म्हणून अनंत ब्रत करण्याचा भगवान श्रीकृष्णांनी उपदेश केला. अशी कथा आहे.
आपल्या सणावारांचा प्रारंभ प्रतिवर्षी नागपंचमीपासून होतो आणि त्यातील एक पर्व अनंत चतुर्दशीला संपते.
अनंत हे एका महानागाचे नाव असले आणि हे नाव जपणे पुण्यकारक मानले जात असले तरी अनंत हे विष्णुचे नाव आहे, हे नजरेआड करता नये.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी विष्णुची 'अनंत' ह्या नावाने पूजा केली जाते.
अनंत चतुर्दशीचे व्रत खूप घरातून पाळले जाते.
१४ प्रकारची फुले,
१४ प्रकारची फळे,
१४ प्रकारची धान्ये आणि १४ प्रकारचे नैवेद्य दाखवून एका दोरकासह अनंताची पूजा केली जाते.
हा दोरक म्हणजे दोरा अनंत म्हणूनच ओळखला जातो. हा उजव्या हाताच्या मनगटावर बांधतात आणि तो सर्वप्रकारच्या संकटापासून रक्षण करतो, अशी श्रद्धा असते.
ह्या व्रताचा विशेष असा की, ही पूजा झाल्यानंतर विसर्जन मागाहून दुस-या दिवशी किंवा गणपती पूजेप्रमाणे दोन, पाच दिवसांनी अशाप्रकारे न करता त्याच दिवशी पूजेनंतर काही वेळाने करण्याची रुढी आहे.
हे अनंताचे व्रत १४ वर्षे आचरावे असे सांगितलेले असले तरी अनेक लोक ते आजन्म पाळत असतात.
ह्या व्रताची कथा सत्यनारायणाच्याकथेसारखीच आहे. म्हणजे कोणी अडचणीत सापडला असता त्याला दुस-या कोणी तरी अनंताचे व्रत करण्यास सांगितले आणि त्यामुळे त्याचे दुःख निवारण झाले. पुढे तो हे व्रताचरण विसरला आणि त्याच्यावर घोर आपत्ती आल्या, अशा स्वरुपाच्या या व्रताच्या कथा आहेत.
नेहमीप्रमाणे ह्या कथेचाही नायक एक ब्राह्मण आहे. त्याच्या पत्नीने एका कन्येला जन्म दिला, तिचे नाव शीला! तिच्या जन्मानंतर ब्राह्मणाची पत्नी दिवंगत झाली.
सुमंतुने म्हणजे त्या ब्राह्मणाने दुसरा विवाह केला.
ती पत्नी अतिशय कर्कशा होती.
पुढे ह्या शीलेचा विवाह कौंडिण्य ॠषीशी झाला. 'निरोप देताना जावयाला काहीतरी देऊ या,' असे सुमंतुने म्हटल्यावर त्याची कर्कशा पत्नी आडवी आली. तिने सुमंतुला ते देऊ दिले नाही. उलट जावयाला आणि लेकीलाही दुरुत्तरे केली.
ती पतीबरोबर सासरी जात असताना वाटेत एकेठिकाणी काही स्त्रिया अनंताचे व्रत आचरित असताना तिला दिसल्या. त्या स्त्रियांकडे शीलेने व्रताची चौकशी केली आणि ती त्या दिवसापासून ते व्रत आचरु लागली.
व्रताच्या प्रभावाने तिला म्हणजे कौंडिण्याला वैभवाचे दिवस आले.
तो खूप श्रीमंत झाला आणि त्याला श्रीमंतीची धुंदी चढली. एके दिवशी त्याने शीलेच्या हातातील अनंताचा दोर तोडून टाकला आणि त्यामुळे अनंत त्याच्यावर रागावला. कौंडिण्याचे सर्व वैभव गेले.
त्याला पश्चाताप झाला आणि मग त्याच्या सहनशीलतेचा अंत पाहून अनंताने ब्राह्मणरुपात त्याला दर्शन दिले आणि पुन्हा व्रताचरण करण्यास सांगितले. त्यामुळे कौंडिण्याला पुन्हा वैभव प्राप्त झाले.
ही कथा साधारणपणे आपल्या सत्यनारायणाच्याकथेशी मिळतीजुळती असली तरी सत्यनारायणाच्यापूजेपेक्षा हे व्रत खूपच प्राचीन आहे यात शंका नाही. सत्यनारायणाची पूजा ही आपल्याकडे अलीकडे आली.
अनंत चतुर्दशीचे महत्त्व अधिक वाढविणारा योग म्हणजे गणेशोत्सवातील मूर्तीचे विसर्जन सगळीकडे थाटामाटात केले जाईल. जलाशयात मूर्ती विसर्जित करावयाच्या असा धर्मनियम असल्यामुळे समुद्र, नद्या, विहिरी अशा ठिकाणी गणेशभक्त वाजतगाजत जाऊन मूर्तीचे विसर्जन करतात. सगळीकडे आनंदाचा जल्लोष चालू असतो आणि अशा जल्लोषामुळे अनंत चतुर्दशी हा अनंताच्या व्रताचा दिवस आहे, ही गोष्ट फारशी कोणाच्या ध्यानातच येत नाही.
गणपतीबाप्पा मोरया पुढच्या वर्षा लवकर या....!

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

म्हणून केले जाते गणेश प्रतिमेचे विसर्जन