‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले असून त्याचा वेग वायफायपेक्षा १०० पट अधिक असणार आहे. लायफाय’मध्ये प्रकाश लहरींच्या माध्यमातून इंटरनेट कार्यरत करण्यात येते. २०११ मध्ये स्कॉटलंडमधील एडिनबर्ग युनिव्हर्सिटीचे शास्त्रज्ञ हेरॉल्ड हास यांनी ‘लायफाय’चं संशोधन केलं आहे. वायर्डपेक्षा एलईडी प्रकाशाच्या माध्यमातून नेटवर्कचा वेग जास्त असतो, हे त्यांना आढळून आले आणि त्यानंतर यावर अधिक संशोधन करण्यात आले. आता हे तंत्रज्ञान अनेक देशांत रुजू लागले आहे. ‘लायफाय’ या तंत्रज्ञानाचा शोध २०११ पूर्वीच लागला होता. परंतु अपेक्षित वेग साध्य करता आला नाही. आताच्या ‘लायफाय’ तंत्रज्ञानात माहिती पाठविण्याचा वेग सेकंदाला १० गिगाबाइट्स इतका आहे.
‘लायफाय’ तंत्रज्ञानाचा वापर सध्या रशिया, फ्रान्स, इस्तोनिका, इंग्लंड (यूके) या देशांमध्ये केला जात आहे. ‘मेक इन इंडिया’ ही संकल्पना लक्षात घेता, भारतात हे तंत्रज्ञान वापरण्यावर भर दिला जात आहे. ‘लायफाय’च्या माध्यमातून माणसाच्या डोळ्यांनाही चकवेल इतक्या वेगाने माहिती पाठवू शकता येते. वायफायच्या तुलनेत ‘लायफाय’चा आणखी एक फायदा असा, की यात संदेश हॅक करता येणार नाही. ‘लायफाय’ या तंत्रज्ञानात एलईडी बल्बच्या माध्यमातून इंटरनेट सुविधा पुरवण्यात येते. या बल्बमध्ये एक मायक्रोचिप बसवण्यात येते. ‘व्हिजिबल लाइट कम्युनिकेशन’ (व्हीएलसी) अर्थात ‘दृश्य प्रकाश वहन’या माध्यमातून ते काम करते. महत्त्वाचे म्हणजे बायनरी कोडमध्ये ट्रान्समिट होणारं हे तंत्रज्ञान आहे.