Adivasi Rajesh Bhal ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यातील सावर्णे या गावचा राजेश अनंत भला हा आदिवासी ठाकूर सुशिक्षित बेरोजगार राजेश अनंत भला या तरुणाने रोजगाराची भटकंती सोडून केशकर्तनालयाचा छंद आणि कलेचे रूपांतर आदिवासी विकास प्रकल्पाच्या आर्थिक सहाय्यातून आत्याधुनिक केशकर्तनालयाच्या व्यवसायात केले. राजेशची आता आर्थिक उन्नतीकडे आत्मविश्वासाने वाटचाल सुरू झाली आहे, राजेशची ही यशोगाथा आदिवासी बेरोजगारांना स्फूर्ती देणारी ठरावी.
ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यातील सावर्णे गाव माळशेज घाटाच्या पायथ्याशी असलेले आदिवासी समाजबहुल गाव ठाणे शहरापासून 115 किलोमीटर अंतरावर आहे. सावर्णे गावची लोकसंख्या सुमारे 500 असून राजेश अनंत भला या गावचा रहिवासी आहे. बारावी पर्यंत शिक्षण घेतलेला सुशिक्षित बेरोजगार तरुण. राजेशचे वडील तुटपुंजी शेती करतात, त्यांच्या शेती कामाला तो मदत करीत असे. शेतीनंतर रोजगारासाठी आजूबाजूच्या गावात भटकंती हा या कुटुंबाचा दिनक्रम.
या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी राजेशने मुरबाड तालुक्यातील मोरोशी येथील पोष्ट बेसिक आश्रमशाळेत बारावी पर्यंत शिक्षण घेतले. बारावी नंतर तो आठ महिने बेरोजगार होता. आता या बेरोजगारीतून बाहेर पडायचे तर काहीतरी करायचेच असा चंग त्याने मनाशी बांधला. पण कमी भांडवलामुळे व्यवसाय करण्याचे धाडस त्याला होईना. त्याला केशकर्तनाच्या कामाची आवड होती. त्याने ही कला छंद म्हणून जोपासण्याचा निर्णय घेतला. त्याने सावर्णे या आपल्या गावच्या घरातच कमी भांडवलातील केशकर्तनालयाचा व्यवसाय करण्यासाठी एक छोटा आरसा, कैची, वस्तरा, दाढीचे सामान खरेदी करून घरच्या घरी केस कापणे आणि दाढीचा व्यवसाय सुरू केला. त्याच्या या प्रामाणिक व्यवसायाला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळू लागल्याने त्याची आर्थिक कमाई वाढू लागली. राजेश आता स्वत:च्या पायावर उभा राहिला.
राजेशने केशकर्तनालयाचा व्यवसाय मोठ्या गावात किंवा शहरात जाऊन अत्याधुनिक स्वरूपात करण्याचे ठरविले. मात्र त्यासाठी मोठ्या भांडवलाची गरज होती. राजेशचे जिवलग छायाचित्रकार मित्र श्री.जयराम मेंगाळ यांनी त्याला आदिवासी विकास विभागाच्या न्यूक्लिअस बजेट योजनेतून शंभर टक्के अनुदानावर मिळणाऱ्या अर्थसहाय्य योजनेची माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनानुसार राजेश भला याने शहापूर येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाशी संपर्क साधला. तेथील न्यूक्लिअस बजेट योजनेसंबंधी काम करणारे लिपिक श्री.अनिकेत दत्तात्रय पष्टे यांनी त्याच्या नियोजित व्यवसाय आणि अनुभवाची माहिती घेऊन अनुदान मागणीच्या अर्जाचा नमूना दिला आणि सोबत लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शन केले.
राजेशने लागलीच कागदपत्रांची पूर्तता करून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी श्री. राजेंद्रकुमार हिवाळे यांच्याकडे विहित नमुन्यात अनुदान मागणीचा अर्ज सादर केला. प्रकल्प अधिकाऱ्यांच्या सुचने नुसार त्यांच्या कार्यालयातील वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक श्री. सखाराम गोपाळ भोये यांनी राजेशच्या केशकर्तनालयाच्या अनुभवाची खात्री करून तो जय ठिकाणी सदरचा व्यवसाय सुरू करणार आहे त्या गाळ्याची पहाणी करून तांत्रिक बाबींची पूर्तता करून घेतली आणि राजेशचा अनुदान मागणीचा प्रस्ताव प्रकल्प अधिकाऱ्यांकडे मंजुरी साठी सादर केला. प्रकल्प अधिकारी राजेंद्रकुमार हिवाळे यांनी तो अग्रक्रमाने मंजूरही केला.
त्यानंतर राजेशने बँक ऑफ महाराष्ट्र न्याहाडी शाखेत बचत खाते उघडून नियमानुसार लाभार्थीचा आर्थिक सहभाग म्हणून रु. 6 हजार 750 मात्र बँकेत जमा केले. त्यानंतर त्याला सन 2021-2022 या आर्थिक वर्षात शासनाकडून मंजूर झालेल्या 39 हजार 250 रुपयांची अनुदानाची रक्कम मिळून त्याच्या खात्यावर 45 हजार रुपये इतकी रक्कम जमा झाली.
राजेश भला याने नजीकच्या कल्याण-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या मोरोशी नाका येथे भाडे तत्वावर एक गाळा घेऊन मिळालेल्या अनुदानातून केशकर्तनालयासाठी लागणारे साहित्य जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथून खरेदी केले. त्यातून गोल फिरणाऱ्या खुर्च्या, आरसे, लहान मोठे कंगवे, वस्तारा, ट्रिमर मशीन, ब्लेड, केस रंगविण्यासाठी विविध रंगांचे कलफ, ब्रश, दाढीचे शेव्हींग क्रीम, स्प्रे, दाढीचे ब्रश, कापडी अप्रॉन, कैची, आफ्टर शेव्हींग लोशन, इत्यादि आवश्यक सामान खरेदी केले.
आवडीचा व्यवसाय करायला मिळाल्यामुळे लवकरच राजेश व्यवसायात चांगला स्थिर झाला आणि त्याचे कामही चांगले असल्यामुळे ग्राहकांची संख्याही वाढू लागली. मिळालेल्या नफ्यातून त्याने दुकानाच्या अंतर्गत सजावटीसह आधुनिक पद्धतीची विद्युत रोषणाई, पंखे, प्रतिक्षेत असणाऱ्या गिऱ्हाईकांना लाकडी बाकडा असे इतर साहित्य खरेदी केले. राजेशचे आर्थिक उत्पन्न वाढू लागले, परंतु सामाजिक बांधिलकीतून गावच्या गरजू बांधवांच्या बारसे, मुंज, उत्तरकार्यासाठी मुंडण अशी कामे नाममात्र मानधनात करण्याचे कर्तव्यही निभावत आहे.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाद्वारे केंद्रवर्ती अर्थसंकल्प म्हणजेच न्यूक्लिअस बजेट अंतर्गत अनुदानातून आदिवासी आणि अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना स्वयंरोजगारातून आर्थिक उन्नतीकडे नेणारी योजना आहे. राजेश भला या आदिवासी ठाकूर जमातीच्या तरुणाला स्वयंरोजगारासाठी आर्थिक अनुदान मिळाल्याने त्याचा भाग्योदय झाला आहे. ठाणे जिल्ह्यातील अशा अनेक आदिवासी बांधवांसाठी ही योजना वरदानच ठरली आहे, असे प्रकल्प अधिकारी श्री. राजेंद्रकुमार हिवाळे यांनी सांगून राजेशच्या पुढील वाटचालीचे मनापासून कौतुक केले आहे.
रिपोर्ट सहाय्य जिल्हा माहिती कार्यालय ठाणे