Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्रवासी भारतीय दिवस : महात्मा गांधींचे आगमन

प्रवासी भारतीय दिवस : महात्मा गांधींचे आगमन
, गुरूवार, 27 सप्टेंबर 2018 (12:45 IST)
9 जानेवारी 2015 रोजी म. गांधींच्या दक्षिण आफ्रिकेतून भारतातील आगमनास शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त. 
 
दक्षिण आफ्रिकेत गांधी गेले असताना वंशवादाचा संघर्ष पराकोटीला पोहोचला होता. सतत 22 वर्षे अहिंसक, सत्याग्रहाच्या मार्गाने संघर्ष देत गांधींनी यश प्राप्त केले होते. या यशानंतर भारतमातेची सेवा करण्याचे आश्वासन गांधींनी गोपाल कृष्ण गोखल्यांना दिले होते. ते पूर्ण करण्याची वेळ येऊन ठेपली होती. गांधी कुटुंबीयांनादेखील मायभूमीत परतण्याची उत्कट इच्छा निर्माण झाली होती.
 
भारतात परतण्यापूर्वी पुढील योजनांबाबत चर्चा करण्यासाठी गांधी गोखल्यांना भेटू इच्छित होते. गोखले त्यावेळी इंग्लंडमध्ये असल्याचे    समजल्यामुळे कस्तुरबा व गांधी त्यांना भेटण्यासाठी इंग्लंडला गेले. पण गोखल्यांची भेट होऊ शकली नाही (ते पॅरिसला गेलेले होते.) त्यामुळे गांधी दांपत्य भारतात परत येण्यास निघाले. 
 
9 जानेवारी, 1915 रोजी ‘एस.एस. अरेबिया’ या बोटीने कस्तुरबा व गांधी मुंबई बंदरात दाखल झाले. आज मितीला या आगमनाला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. गांधी दांपत्याच्या स्वागतासाठी दुपारच्या उन्हातदेखील प्रचंड गर्दी जमली होती. द. आफ्रिकेमध्ये भारतीयांच्या हक्कासाठी त्यांनी दिलेल्या लढय़ामुळे गांधींबद्दल लोकांच्या मनात औत्सुक्य वाढले होते.
 
अहिंसा, सत्याग्रह व उत्स्फूर्तपणे स्वीकारलेली गरिबी याचे मूर्तीमंत प्रतीक असलेल्या गांधींच्या दर्शनासाठी लोकांनी गर्दी केली होती. वसाहतवादी ब्रिटिश सरकारनेही त्यांची दखल घेतली होती. मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड विलिंग्टन यांनी त्यांना बोलावून घेतले. अतिशय साध्या, खादीच्या साडीतील कस्तुरबा व शेतकर्‍याच्या वेशभूषेतील काठीयावाडी अंगरखा, धोतर व डोक्यावर पगडी अशा पोषाखात गांधी दांपत्य   भेटावयास गेले. ‘दक्षिण आफ्रिकेतील हिरॉईन’ अशी कस्तुरबांची तर ‘भारतीय स्वातंत्रसाठी लढणारे हिरो’ अशी त्यांची ओळख करून देण्यात  आली.
 
गांधींचे वय या सुमारास 46 वर्षे होते. दक्षिण आफ्रिकेतील 22 वर्षाच्या वास्तव्यात त्यांच्या जीवनात आमुलाग्र बदल झाला होता. आश्रमाची संकल्पना व कठोर अनुशासनबद्धता त्यांच्यात निर्माण झाली.
 
पोरबंदर व राजकोटला भेट दिल्यानंतर गांधी पश्चिम बंगालमधील रवींद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतनमध्ये गेले. फिनिक्स आश्रमातून आलेली त्यांची मुले, नातेवाईक व मित्रमंडळी द. आफ्रिका सोडल्यानंतर तात्पुरत्या निवासासाठी तेथे होती. गांधी शांतिनिकेतनला गेले तेव्हा रवींद्रनाथ टागोर तेथे नव्हते. गांधी दांपत्य दोन आठवडे तेथेच राहिले. ज्यावेळी टागोर आले तेव्हा गांधींना बघून त्यांना अतिशय आनंद झाला. टागोर यांनी गांधींना ‘महात्मा’ म्हणत व गांधी टागोरांना ‘गुरुदेव’ म्हणत. शांतिनिकेतनमध्येच असताना गो. कृ. गोखले यांच्या   निधनाचे वृत्त कळले. गांधींना जबरदस्त धक्का बसला. भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील आपले पदार्पण गोखल्यांमुळे सुरळीत होईल, अशी त्यांची धारणा होती. पण गोखल्यांच्या मृतूमुळे पुढील मार्गक्रमण दाखविणार्‍या गुरूची उणीव निर्माण झाली, पण आधीच भेटीत गोखल्यांनी  सांगितलप्रमाणे एक वर्षभर गांधींनी, ‘देशभर भ्रमण करावे, निरीक्षण करावे, जनतेचे ऐकून घ्यावे.’ असे गोखले म्हणाले होते, ‘आपली मते आपोआपच सुधारली जातील आणि त्यानंतर तुम्ही राजकारणात सहभागी होऊ शकाल.’
 
आश्रमी परंपरेनुसार रेल्वेच्या तिसर्‍या वर्गातून प्रवास करण्याची प्रथा द. आफ्रिकेप्रमाणे भारतातही त्यांनी अवलंबिली. जेणे करून सर्वसामान्य जनतेशी संवाद साधून प्रत्यक्षपणे त्यांना जाणून घेता यावे पण भारतात तिसर्‍या वर्गातून प्रवास करणे किती अवघड आहे याचं प्रत्यंतर  या दांपत्याला लवकरच आले.
 
देशात विदेशी अधिकार्यांची सत्ता, राजकीयदृष्टय़ा विघटित असलेला, आर्थिकदृष्टय़ा शोषित, सामाजिक, धार्मिकदृष्टय़ा विविध गटात विखुरलेल्या भारत देशाचे दर्शन गांधी घेत होते.
 
देशभर भ्रमण करीत असताना ते भाषण करीत होते. शाळा महाविद्यालातील तरुणांपुढे बोलताना त्यांच्या अंत:करणालाच गांधी जणू हात घालीत होते. मातृभाषा, विविध धर्मातील ऐक्य, शोषितांसाठी बुलंद आवाज, हिंसेला प्रखर विरोध आदी विषयांवर ते बोलत.
 
त्यावेळी देशात भयंकर दुष्काळ पडला होता, प्लेगची साथ फैलावली होती तरी ब्रिटिश अधिकार्‍यांचा नाकर्तेपणा व जुल्म जबरदस्तीने कर गोळा करण्याची अधिकार्‍यांची पद्धत, त्यातच जालिनवाला बाग हत्याकांड इत्यादी घटनांमुळे ब्रिटिश सत्ता उलथविण्याचे प्रयत्न लो. टिळकांनी केले. टिळकांच्या मृत्यूनंतर गांधीकडे स्वातंत्र्य लढय़ाचे नेतृत्व आले होते.
 
देशातील सर्वसामान्य जनतेमध्ये स्वातंत्र्याची ज्योत पेटविण्याचे कार्य गांधींनी केले. स्वातंत्र्यलढय़ाचा मंत्र घराघरात दोन माध्यमाद्वारे त्यांनी पोहोचविला. एकीकडे लढय़ाला अहिंसक आंदोलनाचे, सत्याग्रहाचे हत्यार वापरून सर्वसामान्य लोकांमध्ये जागृती निर्माण केली. तर दुसर्‍या  बाजूने विधायक, रचनात्मक कार्य हाती घेऊन स्वातंत्र्यविषयीची निकड समाजोद्धाराचा कार्यक्रम त्यांनी राबविला. असा अनोखा संग्राम जगापुढे मांडणारे नेतृत्व केवळ गांधींकडेच होते. 
 
गांधी विचाराशिवाय तरणोपाय नाही. जगभर सुरू असलेल्या विविध आंदोलनातून आजही याची प्रचिती येत आहे. 
 
माया बदनोरे 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हिंदुत्वाबाबतचा 'तो' निर्णय चुकीचा : मनमोहन सिंग