बिपरजॉय वादळामुळे लखनौहून मुंबईला जाणारे इंडिगोचे विमान उदयपूरला वळवण्यात आले. मात्र पुन्हा एकदा विमानाने उदयपूरहून उड्डाण घेतले आणि मुंबईत उतरले.
पण प्रवास पूर्ण होण्यापूर्वी म्हणजेच विमान मुंबईला पोहोचण्यापूर्वीच पायलट बदलण्यात आला. संपूर्ण प्रकरण असे आहे की फ्लाइट 6E 2441 सकाळी 11:10 वाजता लखनौ विमानतळावरून निघाली होती आणि दुपारी 1:15 वाजता मुंबईत उतरणार होती.
मात्र चक्रीवादळामुळे मुंबई विमानतळावर जोरदार वारे वाहत होते. विमानतळावर दोन फेऱ्या केल्यानंतरही पायलटला विमान धावपट्टीवर उतरवण्यात अपयश आले. यानंतर पायलटने उड्डाण उदयपूरच्या दिशेने वळवले. खराब हवामानामुळे वैमानिक उतरू शकला नाही आणि विमान वळवण्याचा निर्णय घ्यावा लागला, असा दावा एअरलाइनने केला आहे.
पण विमानात बसलेल्या प्रवाशांना हा प्रकार आवडला नाही. विमानातील प्रवाशांनी विमान कंपनीला पायलटला बदलण्याची मागणी केली. काही प्रवाशांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिदित्य सिंधिया आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) यांना ट्विटरवर टॅग करत त्यांच्या तक्रारीही नोंदवल्या.
विशेष म्हणजे इंडिगोने उदयपूरमध्ये पायलट बदलला. पण प्रवाशांच्या तक्रारींवरून पायलट बदलण्यात आला नसून प्रवासादरम्यान वैमानिक पूर्णपणे थकला होता त्यामुळे वैमानिक बदलावा लागल्याची माहिती विमान कंपनीने दिली.
यानंतर संध्याकाळी 6 वाजता विमान मुंबईकडे रवाना झाले. मिळालेल्या माहितीनुसार रात्री आठच्या सुमारास विमान मुंबईत उतरवण्यात आले.