मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून धावणाऱ्या एका लोकल रेल्वेत तरुणीशी लगट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयितास पोलिसांनी अटक केली आहे.
रेल्वे पोलिसांनी यासंदर्भात एक प्रसिद्धीपत्रक जारी करून कारवाईची माहिती दिली. पण दुसरीकडे या घटनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी केलेल्या दाव्यावरून खळबळ माजली आहे.
संबंधित प्रकरणावरून राज्य सरकावर टीका करताना लोकल रेल्वेत मुलीवर बलात्कार झाल्याचा दावा सुप्रिया सुळे यांनी केला होता.
पण, पोलीस आयुक्तालय लोहमार्ग यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात लगट असा शब्दप्रयोग करण्यात आल्याने नागरिकांमध्ये या कारवाईबाबत संभ्रमावस्था आहे.
रेल्वे पोलिसांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, हा प्रकार काल (बुधवार, 14 जून) सकाळी 7.26 वाजताच्या पनवेल स्लो लोकल रेल्वेत घडला.
लोकलमध्ये एक 20 वर्षीय तरुणी महिला राखीव डब्यात एकटी बसली होती. गाडी सुरू होताच एका अज्ञात व्यक्तीने त्या डब्यात प्रवेश केला. त्याने तरुणीशी लगट करण्याचा प्रयत्न केला. पण तरुणीने आरडा-ओरडा केल्याने मस्जिद रेल्वे स्थानकावर गाडी थांबताच आरोपी खाली उतरून पळून गेला.
यानंतर तरूणीने दुसऱ्या डब्यात जाऊन इतर प्रवाशांना याबाबत माहिती दिली. सहप्रवाशांनी याची माहिती रेल्वे पोलीस हेल्पलाईन 1512 वर संपर्क साधून माहिती दिली. मुलीच्या तक्रारीनंतर सदर गुन्ह्याच्या तपासाकरिता CSMT रेल्वे पोलिसांनी 4 पथके तयार केली.
संशयित आरोपीला पोलिसांनी 4 तासांत अटक केली असून पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती रेल्वे पोलिसांच्या प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली आहे.
रेल्वे पोलिसांनी काय म्हटलं?
रेल्वे पोलीस उपायुक्त महेश पाटील यांनी या प्रकरणी पत्रकार परिषद घेऊन सर्वांना माहिती दिली.
ते म्हणाले, “या प्रकरणात आरोपीने तरुणीशी लगट करण्याचा प्रयत्न केला. पण तरुणीने त्यातून स्वतःची सुटका करून घेतली.”
“या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अतिशय प्रोअक्टिव्हली कारवाई केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला. महिला पोलीस अधिकारी मुलीच्या कॉलेजमध्ये गेल्या. तिथून तिच्याकडून अधिक माहिती घेण्यात आली. तक्रारदार तरुणी पोलीस स्टेशनला येण्याच्या आधीच सीसीटीव्ही फुटेज पाहून आरोपीची ओळख पटवण्यात आली.”
तक्रार दाखल झाल्यानंतर दोन तासांत आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं.
सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
संबंधित घटनेची माहिती समोर आल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी तत्काळ ट्विट करून त्याकडे लक्ष वेधण्याच्या प्रयत्न केला.
त्या म्हणाल्या, “संतापजनक, चालू लोकलमध्ये महिलांच्या डब्यात चढून एका व्यक्तीने तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली. ही अतिशय संतापजनक घटना आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबई लोकलच्या सुरक्षेचा प्रश्न पुढे आला आहे. महाराष्ट्रात गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिली नसून याला गृहखात्याची निष्क्रियता कारणीभूत आहे. या घृणास्पद घटनेतील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी तपासयंत्रणांनी कार्यवाही करणे गरजेचे आहे.”