तरुणांना नोकरी देण्याच्या बहाण्याने रशियाला नेऊन युद्धात लढण्यास भाग पाडणाऱ्या टोळीचं नेटवर्क उघड केल्याचा दावा भारतीय तपास संस्था सीबीआयने केला आहे.
सीबीआयने म्हटलंय की, या एजंटांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना रशियामध्ये नोकरी देण्याचं आमिष दाखवलं होतं.
नोकरीच्या नावाखाली तरुणांना रशियन सैन्यात भरती करणाऱ्या लोकांचं नेटवर्क भारतातील अनेक राज्यांमध्ये पसरलं असल्याचा दावा सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. आतापर्यंत 35 जण या लोकांच्या जाळ्यात अडकले आहेत.
रशिया-युक्रेन युद्धात दोन भारतीयांचा मृत्यू झाल्यानंतर भारतीय अधिकाऱ्यांनी या नेटवर्कशी संबंधित लोकांना अटक करायला सुरुवात केली.
या दोघांना रशियन लष्करात सहाय्यक म्हणून नोकरी देण्याच्या बहाण्याने रशियाला पाठवण्यात आलं.
भारतीयांना सहाय्यकांच्या नोकरीचं आमिष दाखवून रशियन सैन्यात भरती करणारे एजंट अत्यंत संघटित स्वरुपात काम करत असल्याचं सीबीआयचं म्हणणं आहे.
हे एजंट यूट्यूब आणि त्यांच्या स्थानिक संपर्कांद्वारे तरुणांना स्वतःच्या जाळ्यात ओढत असल्याचा दावा सीबीआयने केला आहे.
याआधी, मॉस्कोमध्ये राहणाऱ्या उत्तरप्रदेशातील एका व्यक्तीने बीबीसीशी बोलताना सांगितलं होतं की, त्याला युट्यूब चॅनलद्वारे रशियाला जाण्याची ऑफर देण्यात आली होती. त्याला दरमहा दीड लाख रुपये पगार देण्याचं आश्वासनही दिलं होतं.
या व्यक्तीने सांगितलं की, "तिथे जाऊन आम्हाला रशियन सैन्यासाठी काम करावं लागेल असं काहीच सांगितलं नव्हतं."
सीबीआयच्या म्हणण्यानुसार, या भारतीयांना युद्धाचं प्रशिक्षण देण्यात आलं. त्यानंतर त्यांना रशिया-युक्रेन युद्धक्षेत्रात आघाडीवर तैनात करण्यात आलं. या दलालांनी त्यांचा विश्वासघात करून त्यांच्या जीवाला धोका निर्माण केला.
परराष्ट्र मंत्रालयाने काय म्हटलंय?
सीबीआयने या प्रकरणी अनेक खासगी व्हिसा कन्सल्टन्सी कंपन्या आणि एजंटविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने दिल्ली आणि मुंबईसह 13 ठिकाणी छापे टाकले आहेत.
छापेमारीत 50 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आल्याचं सीबीआयने म्हटलंय.
या ठिकाणांवरून भरतीशी संबंधित काही कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. काही इलेक्ट्रॉनिक उपकरणेही जप्त करण्यात आली आहेत. या संदर्भात काही जणांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे.
भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानेही यापूर्वी मान्य केलं होतं की, रशियन सैन्यात काही भारतीयांना 'सपोर्ट रोल'साठी भरती करण्यात आलं होतं.
अशा कामात गुंतलेल्या लोकांना भारतात परत आणण्यासाठी ते रशियन अधिकाऱ्यांशी बोलत असल्याचं मंत्रालयाने म्हटलं होतं.
सोबतच भारतीयांना अशा बाबतीत सावधगिरी बाळगण्याचे आणि युद्धापासून दूर राहण्याचे आवाहन मंत्रालयाने केले आहे.
मागच्या काही दिवसांपूर्वी 'द हिंदू' या इंग्रजी वृत्तपत्राने एक वृत्त प्रकाशित केलं होतं, ज्यात असं म्हटलं होतं की, काही भारतीयांना नोकरी देण्याचं आमिष दाखवून रशियात नेण्यात आलं आणि नंतर रशियन सैन्यात भरती केलं.
या वृत्तानुसार, रशिया-युक्रेन सीमेवर अडकलेल्या आणखी सात भारतीयांनी भारतात परतण्यासाठी सरकारकडे मदत मागणारे दोन व्हीडिओ शेअर केले आहेत.
एजंटांच्या जाळ्यात अडकून रशियात पोहोचलेल्या तरुणांमध्ये हैदराबादमधील काही तरुणांचाही समावेश होता. यात युक्रेनसोबतच्या युद्धात आघाडीवर तैनात असलेल्या मोहम्मद अस्फानचा मृत्यू झाला.
या वृत्तानंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं होतं की, रशियन सरकारशी चर्चा सुरू असून या लोकांना परत आणण्याचं काम सुरू आहे.
29 फेब्रुवारी रोजी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने या बातमीची पुष्टी करताना सांगितलं की, "सुमारे 20 भारतीय मॉस्कोमधील भारतीय दुतावासात पोहोचले असून त्यांनी भारतात परत येण्यासाठी मदत मागितली आहे."
रशिया-युक्रेन युद्धाचं तिसरं वर्ष
रशिया-युक्रेन युद्धाने तिसऱ्या वर्षात प्रवेश केला आहे. रशियन सैन्याला सैनिकांची कमतरता भासत असल्याच्या अनेक बातम्या येत होत्या.
रशिया-युक्रेन युद्धात रशियन सैनिकांसोबत भारतीय नागरिकही युद्धभूमीवर दिसत असल्याच्या बातम्या अलीकडच्या काही काळात येत होत्या.
रशियात अडकलेल्या लोकांच्या म्हणण्यानुसार, एजंटांनी त्यांना सांगितलं होतं की, त्यांना लष्करात नव्हे तर मदतनीस आणि सुरक्षेशी संबंधित नोकऱ्या दिल्या जातील.
या नेटवर्कमधील दोन एजंट रशियाचे तर दोन भारतातील आहेत. फैसल खान नावाचा दुसरा एजंट दुबईत असतो आणि या चार एजंटांचा समन्वयक म्हणून तो काम करत होता.
फैसल खान 'बाबा व्लॉग्स' नावाचं यूट्यूब चॅनल चालवतो.
या एजंटांनी एकूण 35 जणांना रशियात पाठवण्याची योजना आखली होती. पहिल्या टप्प्यात 9 नोव्हेंबर 2023 रोजी तीन लोकांना चेन्नईहून शारजाला पाठवण्यात आलं.
12 नोव्हेंबर रोजी त्यांना शारजाहून रशियाची राजधानी मॉस्कोला नेण्यात आलं. फैसल खानच्या टीमने 16 नोव्हेंबर रोजी सहा आणि नंतर सात भारतीयांना रशियाला नेलं. त्यांना सैनिक म्हणून नव्हे तर मदतनीस म्हणून काम करावं लागणार असल्याचं सांगितलं होतं.
Published By- Priya Dixit