विद्यार्थ्यांमधील बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) कमी किंवा जास्त असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनात खिचडी ऐवजी स्थानिक पातळीवर उत्पादित कडधान्ये, बाजरी आदी मिलेट्स, भाज्या आणि फळे मिळणार असल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या मार्गदर्शनात प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या अध्यक्षतेखालील ही आठ सदस्यीय राज्य - नियुक्त समिती, विद्यार्थ्यांच्या आहाराची गुणवत्ता आणि पौष्टिक मूल्य वाढविण्यासाठी राज्याच्या मध्यान्ह भोजन मेनूमध्ये सुधारणा सुचविणार आहे. समितीने मेनूमध्ये स्थानिक पदार्थ, तृणधान्ये, अंकुर इत्यादींचा समावेश करण्याची शिफारस केली आहे.
गुरुवारी याबाबत अध्यादेश काढण्यात आला. विद्यार्थ्यांचा बॉडी मास इंडेक्स एकतर कमी किंवा जास्त आहे. विद्यार्थ्यांना दिले जाणारे अन्न पौष्टिक, रूचकर आणि दर्जेदार असावे यासाठी विविध पाककृती सुचविणे हा समितीचा मुख्य उद्देश आहे, जेणेकरून आहार विद्यार्थ्यांचा बीएमआय सुधारू शकेल.
प्राथमिक शिक्षण संचालकांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये कोल्हापूर हॉटेल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष उज्ज्वल नागेश्वर, आघारकर संशोधन संस्थेचे प्रसाद कुलकर्णी, आहारतज्ज्ञ पूनम कदम, बिझनेस फेडरेशनचे कार्यकारी नितीन वाळके, पोषणतज्ज्ञ अर्चना ठोंबरे, हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजीचे वैभव बरेकर, पोषण शक्ती निर्माण योजनेचे अधीक्षक आणि राज्य समन्वय अधिकारी देविदास कुलाल यांचा समावेश होता.
Edited by -Ratnadeep Ranshoor