पाकने कुलभूषण यांच्या परिवाराला दिलेल्या वाईट वागणुकीचा जोरदार समाचार सामना ने घेतला आहे. यामध्ये सामनातील अग्रलेखाने पाकवर जोरदार टीका करण्यात आली आहे. पाक माजला आहे त्याला मानवता माहित नाही का असा प्रश्न शिवसेनेने विचारला आहे. या ५० वर्षात पाक माजला असून आपण अजूनही शांततेच्या गप्पा करतो आहोत असे या लेखात म्हटले आहे.
सामनातील अग्रलेख पुढील प्रमाणे :
हिंदुस्थानी पंतप्रधानांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांची त्यांच्या वाढदिवशी ‘सरप्राइज’भेट घेऊन त्यांच्या आईसाठी शाल भेट द्यायची आणि त्यांनी कुलभूषण व त्याची आई तसेच पत्नीला समोरासमोर घेऊनही ना भेटू द्यायचे ना बोलू द्यायचे. पाकिस्तानच्या अशा मस्तवालपणाचा मागील ५०-६० वर्षांत डोंगर झाला आहे आणि आम्ही तो डोंगर पोखरून ‘परस्पर सामंजस्या’चा ‘उंदीर’बाहेर काढण्यातच मग्न आहोत. कुलभूषण आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या भेटीबाबत पाकड्यांनी जी खालची पातळी गाठली त्याला फक्त निषेधाचे कागदी बाण हे उत्तर होऊ शकत नाही. पाकिस्तानचा फणा ठेचणे हेच त्या देशाबाबत आपण आजवर दाखविलेल्या राजकीय नेभळटपणाचे ‘प्रायश्चित्त’ठरेल!
कुत्र्याचे शेपूट आणि पाकड्यांचे शेपूट सारखेच आहे. कितीही नळीत घातले तरी ते वाकडेच राहते. कितीही साखरपेरणी केली तरी त्यांच्या वागण्या-बोलण्यातील हिंदुस्थानद्वेष आणि विखार कमी होत नाही. आतादेखील हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानी तुरुंगात असलेले कुलभूषण जाधव आणि त्यांची आई व पत्नी यांच्या भेटीप्रसंगी पाकिस्तानने आपले खायचे दात दाखवलेच. खरे तर जेमतेम ४० मिनिटांचा वेळ या भेटीसाठी देऊन पाकड्यांनी त्यांचा नापाक इरादा स्पष्ट केलाच होता. मात्र समोरासमोर येऊनही त्यांना थेट बोलता येणार नाही, एका आईला तिच्या मुलाला कुशीत घेता येणार नाही किंवा पती-पत्नीला किमान हस्तांदोलनही करता येणार नाही याची काळजी पाकिस्तानने घेतली. बंद काचेची ‘दीवार’पाकड्यांनी त्यांच्यात आणून ठेवली. एवढेच नव्हे तर कुलभूषण यांच्या आई आणि पत्नीला बांगड्या, टिकली, मंगळसूत्र हे सर्वच काढून ठेवायला लावले. कपडे बदलण्यास भाग पाडले. त्यांना मराठी भाषेत बोलण्यासदेखील मज्जाव करण्यात आला. हा पाहुण्यांच्या आदरातिथ्याचा कोणता प्रकार म्हणायचा? ‘अतिथी देवो भव’ही आपली संस्कृती नाही हेच यानिमित्ताने पाकिस्तानने दाखवून दिले. वास्तविक या भेटीवरून आपण कसे मानवतावादाचे पुजारी आहोत.