Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जाणून घेऊ या सापाविषयी..

जाणून घेऊ या सापाविषयी..
‘साप’ म्हटलबरोबर आपण सावध होतो. मनातून घाबरतोसुद्धा! गावात काय, शहरात काय, साप दिसला की त्याला आपण काठीने ठेचतो. ही एक बाजू. श्रावण महिन्यातील पहिलाच सण आपण याच जिवाची पूजा करण्यासाठी नागपंचमी म्हणून साजरा करतो. ही दुसरी बाजू. घरात शिरलेल्या सापाला ठेचताना हा साप विषारी आहे की बिनविषारी? याचा आपण कधी विचार केला? उत्तर आहे ‘नाही’. कारण आपल्या परिसरात आलेला साप आपल्यापैकी कुणाला तरी चावणारच अशी आपली पक्की खात्रीच असते. त्यामुळेच धामणसारखा साप, जो मोठय़ा प्रमाणात उंदराना खाऊन शेतातील धान्याचे रक्षण करणारा सापसुद्धा हकनाक मारला जातो. या सापांना मारल्यामुळे नकळत आपले नुकसान होत आहे. शेतीला उपद्रव ठरणार्‍या आणि अनेक रोगांना कारणीभूत ठरलेल्या उंदरांची संख्या आपल्या अविचारामुळे वाढत आहे.
 
‘साप’ तसा आकर्षक जीव. हा जेव्हा सरपटत जातो तेव्हा मातीवर, वाळूवर आपल्या खुणा ठेवून जातो. त्याचा रंग, पट्टे यामुळे त्याचा   चकाकणार्‍या कांतीला शोभा येते. आपल्या लांबुळक्या शरीराने त्याने केलेल्या हालचालीतील चपळाई माणसाला चकवतात. त्याला पकडताना जाणीव होते की सळसळत वेगाने पुढे जाण्याची क्षमता निसर्गाने त्याला उदारमनाने दिलेली आहे. बघता बघता जमिनीच्या बिळात शिरणारा अचानक अदृश्य होणारा हा साप जेव्हा घरात शिरतो तेव्हा तो अशा ठिकाणी लपून बसतो की त्याला शोधताना घराचे कोपरे, अडगळीचा नको तो पसारा आपल्याल नव्याने कळतो.
 
सापाचा आढळ सर्वत्र असतो. गजबजलेल्या शहरात जुन्या आणि काठावरील घरामध्ये साप निघतो. गाव, खेडय़ामध्ये साप निघणे नित्याची बाब. गुप्तधनाशी सापाची जवळीक असते, ‘जुन्या वाडय़ाच्या तळघरात सोन्याचांदीने भरलेल्या हंडीवर मोठाले साप आहेत. त्यांच्या अंगावर केस आहेत. तो बाहेर पडला की धुपासारखा वास येतो. आम्ही त्याला पाहिले नाही पण आमच्या आजोबांना तो दिसायचा’ असं आपण बर्‍याचवेळा ऐकतो. सापांच्या कथेच पुस्तकात ‘नागमणी’चा उल्लेखही आढळतो. परंतु नागमणी बाळगून स्वत:चे भक्ष्य शोधणारा साप ‘अँनिमल प्लॅनेट’ किंवा ‘डिसकव्हरी चॅनेलवर’ अद्याप प्रदर्शित झाला नाही.
 
सदाहरितपर्णी जंगलात सापांचे प्रमाण जास्त असते. बांबू घोणस, मलबार घोणससारखे विषारी साप आसपासच परिसराशी एकजीव होऊन जातात. त्यामुळे निरखून पाहिल्याशिवाय ते सहज दिसत नाहीत.
 
पानगळी अरणतसुद्धा सापांचा वावर आहे. पालापाचोळा, दाट पानांमध्ये पाय ठेवताना सापांनी दंश केल्याची उदाहरणे आहेत. पावसाळ्यात  साप जास्त बाहेर दिसतात. पावसामुळे बेडूक कीटकांची संख्या जास्त वाढते. त्याचे हे आवडते खाद्य त्यामुळे तो उघडय़ावर येतो. अजस्त्र आकाराचे अजगर हरीण आणि त्यासारख्या प्राण्यांना सहजपणे गिळतात. आपल्या शेपटीच्या टोकाने खुळखुळीसारखे आवाज करणारे अँनाकोंडा, नागासारखे, मण्यासारखे विषारी साप छोटय़ा सापांना भक्ष्य करतात. समुद्रीसाप समुद्रातील जिवावर जगतात. झाडावरून उडणारे हिरवे साप, लाल पाठीचे साप सरडय़ांना, पक्ष्यांना, त्यांच्या अंडय़ांना भक्ष्य बनवतात.
 
साप हा थंड रक्ताचा जीव. जगणकरिता त्याला जी ऊर्जा लागते ती खाद्यातून मिळत नाही. त्यासाठी त्याला सूर्याच्या उष्णतेचा उपयोग करावा लागतो. सूर्यप्रकाशात शेक घेत असलेले साप, सूर्यस्नान (बास्किंग)घेत असलेले साप बघणे दुर्मीळ योग, असे वननिरीक्षक सांगतात. पुण्याजवळच्या कात्रजच्या सर्पोद्यानात सापांच्या विविध जाती बघायला मिळतात. सापाच्या विषावरील प्रतिबंधक लसीबद्दलही माहिती मिळते. भारतीय संस्कृतीत या सरपटणार्‍या जिवाला खूप महत्त्व प्राप्त झालेले आहे. तो जसा विष्णूच्या विसाव्याचे स्थान आहे तसा महादेवाचा गळाही त्याचे विसावास्थान आहे. त्याच्या फण्यांवर डौलदारपणे उभा असलेला बाल श्रीकृष्ण आपल्याला कॅलेंडरमध्ये, शिल्पामध्ये दिसतो. महाभारतात खांडववनापासून जन्मेंजयाच्या मृत्यूपर्यंत त्याचा उल्लेख आढळतो. पौर्वात्य आणि पाश्चिमात्य देशातील राजाराणींनी याचे विष पचविल्याची उदाहरणे आहेत. गुप्तहेरखातत काम करणार्‍या सुंदर स्त्रिा ह्या विषकन्या असत. नागलोक, नागकन्या यांचाही उल्लेख ठिकठिकाणी अगदी बॉलिवूडच्या सिनेमातही आपण पाहतो. अगदी अलीकडचे उदाहरण म्हणजे नाना फडणवीस पेशवाईचा कारभार पाहताना, नवीन उमेदवारांच्या प्रामाणिकपणाची कसोटी पाहताना काडीपेटीएवढय़ा छोटय़ा पेटीत बचनाग पाठविल्याचे उल्लेख पुस्तकात वाचायला मिळतात.
 
भारतात ठिकठिकाणी नागोबाची मंदिरे आहेत. सोलापुरात दर अमावस्येला वडवळ नागनाथाला जाणारे भक्तगण आहेत. नागपंचमीच्या दिवशी मंदिरातील नागाच्या दगडीमूर्तीची, घरातील देव्हार्‍यावरील पितळीमूर्तीची पूजा केली जाते. वारूळांचीही पूजा केली जाते. परंतु जिवंत नाग दिसला की त्याला ठेचलं जातं. त्याची परत पूजा करून त्याच्या तोंडात नाणी ठेवून त्याला जाळलं जातं, ही त्याची विडंबना! आज अनेक सर्पमित्र कार्य करीत आहेत. त्यामुळे थोडी जनजागृती होत आहे. हे जागृतीचं कार्य बसवेश्वरांनी बाराव्या शतकात केलेलं आहे. 
 
‘कल्लनागर कंडरे हाल ने रे थंबरू
दिटद नागर कंडरे कोल्लेंबरय्या’
 
चंद्रकला शिलवंत 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नागपंचमीला बाहुलीला बदडण्याची परंपरा