रॉजर फेडरर याने रविवारी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात क्रोएशियाच्या मारिन सिलिचला 6-2, 6-7, 6-3, 3-6, 6-1 अशा सेटमध्ये पराभूत केले. रॉजर फेडररने सलग दुसर्यांदा आणि एकूण सहाव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपदावर आपले नाव कोरले. गेल्यावर्षीही फेडररने सिलिचला हरवूनच हे विजेतेपद जिंकले होते.
स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर आणि क्रोएशियाचा सिलिक हे दोघेही आतापर्यंत दहावेळा प्रतिस्पर्धी म्हणून समोरासमोर आले आहेत. या 10 पैकी 9 वेळा रॉजर फेडरर विजयी झाला आहे. तर एकदा सिलिक विजयी झाला आहे. सिलिकने 2014 मध्ये अमेरिका ओपनमध्ये फेडररचा पराभव केला होता. रॉजर फेडरर आणि दक्षिण कोरियाचा खेळाडू हेयॉन चुंग यांच्यात सेमी फायनल रंगली होती.
हेयॉन चुंग उपांत्य फेरीत दमदार खेळी करु शकला नव्हता, त्याच्यामुळे त्याला नमवून फेडररने अंतिम फेरीत धडक मारली होती. सेमी फायनलमध्ये चुंगच्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला उपचारासाठी धाडण्यात आले. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये राफेल नदाल आणि स्टॉन वावरिंका हे खेळाडू दुखापतीमुळे भाग घेऊ शकले नाहीत. तसेच अॅण्डी मरेने या स्पर्धेत सहभाग घेतला नव्हता.