Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

श्री आनंदनाथ महाराज कृत श्रीस्वामीचरित्र स्तोत्र

श्री आनंदनाथ महाराज कृत श्रीस्वामीचरित्र स्तोत्र
, बुधवार, 8 मे 2024 (05:30 IST)
श्रीगणेशाय नमः || 
श्रीस्वामीचरित्रस्तोत्र प्रारंभः ||आधीं नमू श्रीसद्गुरूनाथा || भक्तवत्सल कृपावंता || तुजवांचूनि या जगीं त्राता || अन्य आतां नसेचि || १ || अवतार घेतला समर्थ || नाम शोभे कृपावंत || पाप जाळूनियां सत्य || भार उतरिला जगतींचा || २ || मूळ स्वरूप निर्गुण || निराकार नित्य ध्यान || अघटीत लीला करूनि जाण || तारिलें जना कौतुकें || ३ || म्हणुनि नमन तुझे पायीं || तुजविण अन्य दाता नाहीं || विश्वव्यापक तूंच पाहीं || ध्याती हृदयीं साधुजन || ४ || रूपारूपासी वेगळा || गुणगुणाच्या निराळा || परी अघटित जगीं कळा || सूत्र हातीं वागवित || ५ || स्वस्वरूपीं निपुण || सादर कराया जगतीं पालन || स्वामीनाम सगुण || उद्धराकारण धरियेलें || ६ || तो दिगंबरवेष द्वैतरहित || दत्तदिगंबर हाची सत्य || भार उतरावया यथार्थ || कलियुगीं समर्थ अवतरला || ७ || दीन जनांचिया पोटीं || पाप जाळूनि तारी संकटीं || नाम जयाचें धरितां कंठीं || मग सृष्टीं भय नाहीं || ८ || ॐ आदिस्वरूपरूपा || ओंकार निर्गुणरूपा || जगव्याप्यव्यापककौतुका || दाखविता सखा तूंचि खरा || ९ || कोण करील तुझी स्तुती || शेष शिणला निश्चितीं || तेथें मानव बापुडे किती || अल्पमती निर्धारें || १० || सुख करा स्वामीराया || भक्तवत्सला करुणालया || जगतारक तुझ्या पायां || नमन माझें सर्वदा || ११ || मी अन्यायी थोर || परी तूं कृपेचा सागर || जगतारावया निर्धार || सगुण अवतार धरियेला || १२ || जयजयाजी गुरुनाथा || भक्तवत्सला समर्था || तुजवांचूनि अन्य त्राता || मज आतां पाहतां नसेचि || १३ || सर्व सुख सगुण || अवतार हाचि पूर्णब्रह्म जाण || जग तारावया कारण || अवतार जाण धरियेला || १४ || अनंत ब्रह्मांडाचा नायक || तूंचि सखा माझा देख || तुजवांचूनि अन्य कौतुक || नको नको मजलागीं || १५ || कैसी करावी तुझी स्तुती || हें मी नेणें बा निश्चितीं || चरणीं जडो तुझ्या प्रीती || ऐसें आतां करावें || १६ || दीन दयाळा गुरुराया || भावें वंदिलें तुझ्या पायां || सोडिली समूळ मोहाची माया || आतां मज वायां दवडू नको || १७ || हें स्तोत्र तुझें लघुस्थिती || तूंचि बोलविता निश्चितीं || भक्त तारावया गुरुमूर्ती || अवतारस्थिती दाविली || १८ || दीनवत्सला स्वामिराया || अगाधतेजा करुणालया || अघटित जगतीं तव माया || लीला कौतुक निर्धार || १९ || निरंजन स्वरूपरूपा || विश्वरूपा आदिरुपा || अक्कलकोटीं दावूनि कौतुका || जगसुखा राहिला || २० || अक्कलकोटीं जरी जन || अवचित कोणी जातां जाण || उद्धार तया कारण || स्वामिकृपें होय खरा || २१ || अवधूतवेष निर्धारी || निर्गुण निराकारी || तेज पाहतां थरारी || काळ पोटीं बापुडा || २२ || वेदीं रूप वर्णिलें निर्धार || तैसी लीला दाविली साहाकार || विश्वविश्वंभर गुरुवर || सद्गुरूनाथ स्वामी माझा || २३ || चरण पाहतां सुकुमार || कैसें पूजावें निर्धार || ठेऊनि प्रेम गादीवर || सत्य सादर पूजावें || २४ || प्रेम गंगा यमुना सरस्वती || सिंधु कावेरी भागीरथी || तयासी प्रार्थावें निश्चितीं || स्नानालागीं समर्थाच्या || २५ || मन कलश घेऊनि निर्धार || प्रेम गंगा जलसागर || स्नान घालूनि उत्तरोत्तर || पूजन प्रकार करावा || २६ || आवडी अक्षता निर्धारीं || सुमन संगती घेऊनि वरी || सद्गुरुनाथ पुजावा अंतरी || प्रेमभरी होऊनियां || २७ || भक्तिची ती जाण || वरी नामाचा चंदन || शांती केशर मिळवून || गंध अर्चन समर्थांचे || २८ || क्षमा धूप दीप निर्धारीं || प्रेम नैवेद्य वरी || भावें समर्पोनि निर्धारीं || सद्गदित अंतरीं होऊनियां || २९ || क्रोध कापूर जाळावा || प्रेमें स्वामी आळवावा || आवडीचा तो ध्यानीं पहावा || शुद्ध चित्त करूनियां || ३० || ऐसी पूजा झालियावरी || मग प्रार्थावा निजांतरी || हृदयीं उठती प्रेमलहरी || ऐशापरी आळवावा || ३१ || जयजयाजी गुरुराया || जयजयाजी करुणालया || भक्ता दाउनियां पायां || भवभया निवारिलें || ३२ || जयजयाजी अनंतरूपा || जयजयाजी आदिरुपा || चुकवा चुकवा जन्मखेपा || मार्ग सोपा दाऊनियां || ३३ || जयजयाजी त्रिगुणा || जयजयाजी अवतार सगुणा || पुरवावया मनकामना || जनीं वनीं फिरीयेला || ३४ || जयजयाजी दिगंबरा || जयजयाजी सर्वेश्वरा || मज सांभाळा लेंकरा || तुजविण आसरा नाहीं नाहीं || ३५ || जयजयाजी समर्था || स्वामिराया कृपावंता || || तुजविण आम्हां त्राता || नाहीं नाहीं जगत्रयीं || ३६ || शुद्धतेजा तेजरुपा || दिव्य स्वस्वरूपा || चुकवा चुकवा जन्म खेपा || आदिरुपा जगद्गुरू || ३७ || जयजयाजी यतिरुपा || जयजयाजी अघटित स्वरूपा || निर्गुण सगुणरूपा || सच्चिदानंद जगद्गुरू || ३८ || जयजयाजी त्रिगुणरहिता || जयजयाजी त्रिदोषहारका || जयजयाजी ब्रह्मांडनायका || निजभक्त सख्या स्वामिराया || ३९ || जयजयाजी दत्तात्रेया || जयजयाजी करुणालया || जयजयाजी विश्वमाया || संशयभयहारका स्वामिराया || ४० || जयजयाजी आनंदविलासा || जयजयाजी पापतमनाशा || जयजयाजी अवधूतवेषा || भवभयपाश निवारका || ४१ || जयजयाजी निजभक्तपालका || जयजयाजी विश्वव्यापका || निज दासासि सखा || कलियुगीं देखा तूं एक || ४२ || जयजयाजी विराटस्वरूपा || जयजयाजी आदिरूपरूपा || जयजयाजी विश्वव्याप्यव्यापका || मायबापा गुरुराया || ४३ || त्रिलोकीं तूं समर्थ || अवतार तुझाचि यथार्थ || तारक भक्तांलागीं सत्य || दैवीरूप दाऊनि || ४४ || तूं पूर्णब्रह्म जाण || निर्विकार निर्गुण || निरंजनी सदा ध्यान || लीला कौतुक दाविलें || ४५ || तेज पाहतां थरारे || कली मनीं सदा झुरे || विश्वव्यापक व्यापूनि उरे || तारक खरे पतितासी || ४६ || तुजविण आणिक आधार नाहीं || कलियुगीं दुजा आम्हां पाहीं || सद्गुरुनाथ तूंचि खरा तोही || अवताररूपें नटलासी || ४७ || लीला दाविली अगाध || शेषा न करवे त्याचा शोध || जें तुम्ही केलें विविध || ज्ञानरूपें जाणविलें || ४८ || अक्कलकोटमहापुरीं || वास केला निर्धारीं || पवित्रक्षेत्र करूनि तारी || पाय ठेऊनि जगतासी || ४९ || तरी जनीं सत्य आतां || अक्कलकोटीं जावें तत्वतां || हित साधावया यथार्थ || पवित्र भूमी पैं केली || ५० || हें वचन निर्धार || समर्थांचें असे साचार || बोल बोलवितां उत्तर || स्वामी माझा निर्धारीं || ५१ || अक्कलकोटीं करितां अनुष्ठान || हें स्तोत्र वाचितां एक मास तेरा दिन || शुद्ध चित्त करून || ध्यान सदा समर्थांचें || ५२ || भिक्षान्न निर्धारीं || पवित्र राहे सदा अंतरी || षण्मास वाचितां तरी || महाव्याधी दूर होय || ५३ || एक संवत्सर अनुष्ठान || वटछायेसी करितां जाण || तयासी होईल पुत्र संतान || वचन सत्य समर्थांचें || ५४ || तेरा मासी जोडे धन || चतुर्दश मासीं लक्ष्मीवंत जाण || प्रेमभावें करितां अनुष्ठान || सत्य वचन निर्धार || ५५ || वटपूजा आवडी पूर्ण || तेथेंचि पादुका स्थापून || प्रेमभावें करितां अनुष्ठान || मनोरथ पूर्ण होतील || ५६ || कलियुगीं तारक निर्धारीं || स्वामी माझा सगुण अवतारी || जग तारावया निर्धारीं || सृष्टीवरीं पैं आला || ५७ || तरी सादर सादर मन || ठेऊनि वंदा आतां चरण || पुढें न मिळे ऐसें निधान || मायाबंधन तोडावया || ५८ || नाम घेतां निर्धारीं || स्वामी माझा कैवारी || भवामाजीं पार करी || वचन निर्धारीं सत्य हो || ५९ || आनंद म्हणे तरी आतां || स्वामीराया जी समर्था || भक्तवत्सला कृपावंता || वाचितां जगव्यथा चुकवावी || ६० || हाच देऊनि प्रथम वर || भक्तिपंथ वाढवावा निर्धार || आणिक काहीं मागणें साचार || तुजपाशीं दयाळा || ६१ || परोपकार हाचि एक || तुझ्या नामें तारावे लोक || आणिक मागणें तें कौतुक || नाहीं नाहीं सर्वथा || ६२ || विश्व विश्वाकारी || विश्वरूप तूंचि निर्धारीं || चालविता तुजविण तरी || कोण आहे दयाळा || ६३ || तूंचि सर्व सुखदायक || तूंचि कृपा नायक || तुजवांचूनि जगा तारक || नाहीं कोणी सर्वथा || ६४ || आतां न करीं निष्ठुर चित्ता || माय जाणे बालकाची व्यथा || तुजवांचूनि अन्य सर्वथा || माय दुजी न जाणो || ६५ || तूंचि मातापिता सर्वेश्वरू || जगतारक जगदगुरू || नको नको अव्हेरुं लेंकरुं || दीना उदारु तूं एक || ६६ || दीनदयाघन नाम || तुमचें असे हो उत्तम || जग तारावया कारण || स्वामी समर्थ धरियेलें || ६७ || महापूर बोरी पायीं उतरला || मैदार्गीहुनी येतां सोहळा देखिला || अक्कलकोटस्थ जनीं डोळां पाहिला || अघटित लीला समर्थांची || ६८ || प्रेम उंदीर सजीव केला || मुक्यासी वाचा देऊनि बोलविला || अंधासी रत्नें पारखविला || अघटित लीला जगीं तुझी || ६९ || अघटित केलें चमत्कार || किती लिहावे साचार || ग्रंथ वाढेल निर्धार || या भेणें सादर लेखणी आवरिली || ७० || स्वामीचरित्र ग्रंथ निर्धार || पुढें स्वामिराज बोलवील सादर || भक्त तारावया निर्धार || कली जोर मोडोनियां || ७१ || म्हणुनियां आतां लघुचरित्र || स्वामी नाम नामाचें स्तोत्र || जग तारावया पवित्र || लघुस्तोत्र वर्णिलें || ७२ || अक्कलकोटीं बहु लीला || ज्याणें दाखविली अघटित कळा || कोटीमदनमदनाचा पुतळा || स्वरुपीं जयाच्या तुळेना || ७३ || बहु वर्षें एकभूमी वस्ती || एक विचार एक स्थिती || अघटित रूप तें निश्चितीं || जगतालागीं तारावया || ७४ || हे निर्जीव पाटावरी || पादुका उठल्या कलिमाझारी || अजूनि भुली कैशी जगांतरी || तरणोपाया चुकती हे || ७५ || नाम घेतां प्रेमभरीं || हृदय शुद्ध आधीं करीं || दया ठेऊनि अंतरीं || वाच निर्धारीं स्वामिलीले || ७६ || स्वामिपादुकापूजन || नामस्तोत्र भजन || तेणें वंश उद्धरे जाण || कलीमाझारी निर्धार || ७७ || म्हणुनियां आतां || स्वामिनाम आठवावें सर्वथा || तयावीण अन्य वार्ता || तारक नाहीं जगांत || ७८ || अहा सुंदरस्वरूपनिधान || अहा भक्तवत्सल अगम्य ध्यान || सच्चिदानंद आनंदघन || स्वामी माझा दयाळू || ७९ || या प्रपंचमोहाचे काठीं || बुडोनियां जातां रे निकटी || तुम्हां तरावया सुलभ गोष्टी || स्वामिनाम पोटीं धरा || ८० || स्वामिनामाचा प्रताप || पाप जाळूनि करी राख || अपूर्व दाविलें कौतुक || कलीमाजी तरावया || ८१ || तरी आतां शुद्ध करूनि मन || हेंचि जाण संध्यास्नान || दया क्षमा शांती पूर्ण || गुणवर्णन समर्थांचें || ८२ || खोट्याचा जाणूनि पसारा || तोडीं तोडीं मायेच्या व्यवहारा || न भुले ह्या दुर्गतीच्या बाजारा || मोहपसारा दूर करोनी || ८३ || मूळबिंदु हा प्रमाण || तेथोनि वाढविता कोण || कोणी केलें हो रक्षण || पिंडालागीं जाण पां || ८४ || कैंची माया कैंसा मोह || कोठें आहे तुझा ठाव || तो आधीं शोधुनी पहा हो || भुलू नको मानवा || ८५ || मूळ बिंदुरूप प्रमाण || देह झाला बीजा कारण || वाढवोनि करचरण || दीनानाथें अर्पिले || ८६ || तेथें झाली जीवशिवाची वस्ती || तीन गुण गुणांची प्राप्ती || सहा विकारांची स्थिती || मायेसंगती खेळोनिया || ८७ || दया क्षमा शांती विचार || विवेक ज्ञान जागृतीसार || अविद्येची गती निर्धार || सोडोनि भवपार करीतसे || ८८ || धरितां स्वामी नावाची आवडी || घेतां भवामाजीं घाली उडी || नेवोनि भक्तां पैलथडी || पार करी दयाळू || ८९ || नाम जगीं तारक || काय सांगू नामाचें कौतुक || नामें तारिले कितीएक || महापापी कलियुगीं || ९० || नाम घेतां संकट हरे || वारी केल्या पाप सरे || सेवा करितां भवांत तरे || चुकती फेरे चौऱ्यांशीचें || ९१ || अक्कलकोटीं न जातां तरी || वटछायेसी अनुष्ठान करी || तयासीं तारक निर्धारीं || दृष्टांतरूपें स्वामी माझा || ९२ || स्वामींची मूर्ति मनोहर || प्रेमें घेऊनि अयन्यावर || भावें मांडोनि गादीवर || पूजन करावें प्रेमभावें || ९३ || भजनपूजनाच्या रीती || कलीमाजीं जग उद्धरती || प्रेम ठेउनियां चित्तीं || स्वामी कृपामूर्ति आठवावा || ९४ || काय न करी श्रीगुरुनाथ || सत्य होती शरणांगत || भक्ततारक अवतार समर्थ || कलियुगीं यथार्थ अवतरला || ९५ || विश्वव्यापक विश्वंभरू || त्यासी कैंची समाधी निर्धारु || जगीं जगप्रकार दाखवणें साचारु || लीला थोरु समर्थांची || ९६ || द्वैत नाहीं तिळभरी || आशा कैंची अंतरीं || योगमाया दवडिली दुरी || अवतार निर्धारीं स्वामी माझा || ९७ || भक्तांकारणे अक्कलकोटीं || वास केला हो निकटी || पाय दाऊनियां सृष्टीं || पतित उद्धार करविला || ९८ || अघटित कळा अघटित लीला || पूर्णतेज तेजाचा पुतळा || अगम्य ज्याची अवतार लीला || कलीचा सोहळा मोडावया || ९९ || तरी नामाची संगती || प्रेम ठेउनी सदा चित्तीं || स्वामी आठवा दिवसरात्रीं || भवामाजी तरावया || १०० || स्वामीनामाचा सोहळा || धाक पडे कलीकाळा || निजदासासी सांभाळी वेळोवेळां || अवतार सोहळा करूनियां || १०१ || कलीमाजी तारक || भक्तासी एकचि नाम देख || स्वामीरायाविण कौतुक || आणिक नको सर्वथा || १०२ || स्वामीनामाचें कीर्तन || सप्रेमें पादुकापूजन || करितां कलीमाजी जाण || जन उद्धरे निर्धारें || १०३ || स्वामीपंथ तारक || भव नाशील हा सत्य देख || कलीमाजीं जगतारक || परमसुखदायक उद्भवला || १०४ || म्हणुनि जनीं आपुल्या हिता || शरण जावें श्रीगुरूनाथा || मुखीं धरोनि स्वामीवार्ता || जन्मव्यथा चुकवावी || १०५ || ऐसी भुललिया सोय || पुढें नाहीं रें उपाय || भवाचा हा भय || दूर कराया निर्धारीं || १०६ || तरी सुंदर मानवाची काया || नेवोनि लावा स्वामिपाया || सुखें निवारा भवभया || मोहमाया तोडोनियां || १०७ || समर्थें दिधलें अभय वचन || जो हें स्तोत्र करील पठण || तयाचे मनोरथ पूर्ण || होतील जाण मज कृपें || १०८ || येथें धरितां संशय || तयासी भवामाजी भय || पुढें नाहीं ऐशी सोय || सत्य सत्य त्रिवाचा || १०९ || हें लघुस्तोत्र समर्थांचें || मनोभावें करितां पठण याचें || अर्थ पूर्ण होतील अर्थिकांचे || परमार्थकांसी मोक्षपद || ११० || आनंद  म्हणे तरीं आतां || स्वामिचरणीं ठेऊनि प्रीति सर्वथा || प्रेमभावें स्तोत्र गातां || मोक्ष हातां येईल || १११ || इति श्रीस्वामी प्रार्थनास्तोत्र || हें जगतारक पवित्र || जपामाजीं महामंत्र || अर्थ सादर पुरवावया || ११२ || इति श्रीगुरुस्वामिचरणारविंदापर्णमस्तु || 
 
राजाधिराज योगीराज श्रीस्वामी समर्थ महाराजकी जय || श्रीरस्तु || शुभंभवतु || 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

श्री स्वामी समर्थ ध्यान मंत्र