Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अधिकमास माहात्म्य अध्याय सोळावा

अधिकमास माहात्म्य अध्याय सोळावा
, सोमवार, 14 सप्टेंबर 2020 (08:55 IST)
श्रीगणेशाय नमः ॥ जयजयाजी रुक्मिणीरंगा ॥ भक्तमानसप्रियह्रदयभृंगा ॥ मुनिजन ध्याई ह्रदयरंगा ॥ ये अंतरंगा श्रीविठ्ठला ॥ १ ॥
सगुण स्वरूपा मेघश्यामा ॥ दीनबंधु आत्मयारामा ॥ सदांसर्वदां नामीं प्रेमा ॥ मनोभिरामा असों दे ॥ २ ॥
आतां ऐका श्रोतेजन ॥ मलमहात्म कथानुसंधान ॥ संवाद लक्ष्मी नारायण ॥ पुण्यपावन कथा हे ॥ ३ ॥
मागें द्वादशीमहिमा वर्णिला ॥ पुनः मागुतां लक्ष्मीनें प्रश्न केला ॥ तोचि श्लोकार्थ पाहिजे परिसिला ॥ भावार्थ भला असो द्या ॥ ४ ॥
श्रीरुवाच ॥ भगवन् देवदेवेश भक्तानुग्रहकारक ॥ आश्चर्यकारिकथितमाख्यानं पुरुषोत्तम ॥ १ ॥
मासे मलिम्लुचे स्नानव्रतस्य फलमीदृशं ॥ विशेषेण पुनर्ब्रूहि स्नानस्य फलमीश्वर ॥ २ ॥
क्षीराब्धिजा वदे तेव्हां ॥ ऐकिजे देवाधिदेवा ॥ अभिनव कथेचा ठेवा ॥ परिसिलाजी स्वामियां ॥ ५ ॥
परि स्नान आणि जप ॥ महिमा वर्णिला अमूप ॥ तरी स्नान केलियानें निष्पाप ॥ पूर्वी कवण झालासे ॥ ६ ॥
कवण स्नानाचें तप ॥ कवण पुण्य जपला जप ॥ येविषयीं होऊन सकृप ॥ निवेदावें स्वामियां ॥ ७ ॥
मग बोले शेषशयन ॥ ऐक प्रिये प्रियवचन ॥ जें आकर्णितां जाण ॥ होय क्षाळण महापापा ॥ ८ ॥
श्रीकृष्ण उवाच ॥ श्रृणु सुंदरि वक्ष्यामि मलिम्लुच कृतस्यच ॥ स्नानस्य फलमत्युग्रं पापपंजरभेदकं ॥ ३ ॥
यमलोकं न पश्यंति स्नातामासिमलिम्लुचे ॥ सर्वकार्याणि सिद्धयंति परिपूर्णमनोरथाः ॥ ४ ॥
स्नान दान जप होम ॥ चालविता नेमानेम ॥ तरी पाय वंदी यम ॥ देती क्षेम रोग सर्व ॥ ९ ॥
सर्वारिष्टें ते शमती ॥ संसारी न घडे विपत्ती ॥ सर्व मनोरथ पुरती ॥ उद्धरागती तो पावे ॥ १० ॥
सर्व तीर्थी केलिया स्नान ॥ तयातें घडे तेंची पुण्य ॥ यदर्थी संशय नसे जाण ॥ सत्य जाण शुभानने ॥ ११ ॥
कुरुक्षेत्रादी गया श्राद्ध ॥ कोटि गोदानें प्रसिद्ध ॥ पुरश्चरण एकविध ॥ घडलें जरी प्राणियां ॥ १२ ॥
तरी समता नाहीं जाण ॥ मलमासीं केलिया स्नान ॥ परी भावार्थ परिपूर्ण ॥ धरि संपूर्ण मासवरी ॥ १३ ॥
सहस्र विप्रा इच्छित भोजन ॥ तरी घडे एक द्विज पूजन ॥ तो पावे सदां यश-कल्याण ॥ नेम जाण मासवरी ॥ १४ ॥
जन्म दारभ्य जें पाप केलें ॥ जाणोनि नेणुनि जे कां घडलें ॥ तें सर्व नासे एकचि वेळें ॥ जरीं घडलें स्नान एक ॥ १५ ॥
येच विषयीं इतिहास परम ॥ ऐकें होऊनि उत्तमोत्तम ॥ श्रवण केलिया सुगम ॥ उपरति तात्काळीके ॥ १६ ॥
इंद्रलोकीची अप्सरा कामिनी ॥ नाम तियेचें स्मृतिविलासिनी ॥ त्याहीमाजी ती प्रियमोहिनी ॥ कुबेरा घरीं सदां वसे ॥ १७ ॥
परम प्रीती पात्र ते धनदा ते ॥ स्वगुणें मोहिलें हो तया तें ॥ नृत्य गायनें देखता तयातें ॥ क्षणभरी तें न सोडी ॥ १८ ॥
स्वरूप परम लावण्य ॥ पाहतां होय वीर्य पतन ॥ कंठ जीचा कोकिळे समान ॥ ऐकतां सुरगण भुलती ॥ १९ ॥
असो ती देवलोकींची अप्सरा ॥ स्वरूप वर्णिता अपरंपार ॥ तुच्छ जियेपुढें शंकरदारा ॥ इतर सुंदरा त्या किती ॥ २० ॥
चतुर्दश लोकपाळ प्रार्थितां ॥ परी तेथें न जायची तत्वतां ॥ ऐसी हे लावण्यलता ॥ पुढें वृतांता परिसीजें॥ २१ ॥
एकदां वनविहारार्थ ॥ सखिया घेऊन त्वरित ॥ निघती झाली क्रीडनार्थ ॥ लक्षुनी पंथ कुरुक्षेत्रीं ॥ २२ ॥
तंव तो पुरुषोत्तम मास ॥ हें तों नेंणें विशेष उद्देश ॥ सहज पातली तया स्थानास ॥ समुदायास तें काळीं ॥ २३ ॥
पांचजण अंध बोलिजेती ॥ ऐका ते कोणकोणती ॥ नेत्र असूनी अंध होती ॥ ऐका प्रचीती तयांची ॥ २४ ॥
एक तो विषयांध जाण ॥ दुजा तो द्रव्यांध पूर्ण ॥ मदिरांध तोची तिसरा जाण ॥ बळांध तोची चौथा पैं ॥ २५ ॥
पांचवा तो दुर्जन पाहे ॥ तंव तो गर्भांधची होय ॥ तयातें उपमाची न साहे ॥ ऐसे हे पांच अंध जाणिजे ॥ २६ ॥
इतुकियांचे वेगळे प्रकार ॥ ते किंचित परिसवूं साचार ॥ विषयांध जाला जो नर ॥ ऐका प्रकार तयाचा ॥ २७ ॥
चित्तीं काम उद्भवतां ॥ मग तो वोळखी न धरी तत्वतां ॥ तयासी धक्का देऊनि जातां ॥ देहावरुता तो नये ॥ २८ ॥
तैसाची मदिरा प्राशिला ॥ नेत्र असतांची अंध झाला ॥ श्रीमुखें जरी ताडिला ॥ परी ओळखिला न पुरे ॥ २९ ॥
आतां तिसरा तो धनांध ॥ द्रव्य मदें उन्माद ॥ स्वकीय येतां सन्निध ॥ ओळखीं न पुसें तयातें ॥ ३० ॥
एखादा तयाचा कोणी आप्त ॥ दरिद्रें गांजिला बहुत ॥ तो जरी भेटावया येत ॥ तयातें पुसत तुम्हीं कोण ॥ ३१ ॥
आतां बलोन्मत्त असती ॥ गजा ऐसें सदां डुल्लती ॥ तयांचे शेजारी हो येती जाती ॥ तरी ते न पाहाती तयातें ॥ ३२ ॥
पांचवा अंध तो दुर्जन ॥ सदां दुजियातें चिंती अकल्याण ॥ घातप्रयुक्त ज्याचें मन ॥ म्हणोनि जाण अंध तो ॥ ३३ ॥
म्हणोनिया पांच अंध ॥ श्रोतियातें केलें विशद ॥ पुढे ऐकिजे संवाद ॥ तया देवांगनेचा ॥ ३४ ॥
ऐसी ते विषयांध पाहीं ॥ सखिया समवेत पातली ठायीं ॥ पर्वकाळ धर्म नेणे कांहीं ॥ जळप्रवाहीं स्वइच्छा गमे ॥ ३५ ॥
संपूर्ण जळक्रीडा करून ॥ केलें नूतन वस्त्र परिधान ॥ तीरा समीप येऊन ॥ केलें अवलोकन चहूंदिशे ॥ ३६ ॥
तंव एकाएकीं नयनीं ॥ कुंजवना ऐसें ते क्षणीं ॥ वन देखती जाली कामिनी ॥ देखूनि मनीं संतोषें ॥ ३७ ॥
नानापरी पुष्पयाती ॥ सुवासे सुशोभती ॥ द्राक्षें फलभारें डोलती ॥ चंपक सेंवती ठायीं ठायीं ॥ ३८ ॥
जाईजुई आणि मालती ॥ बकुळ पुन्ना गरजती ॥ मांदार गुलाब केतकी ॥ कर्दळी डोलती फळभारें ॥ ३९ ॥
ऐसें अनुपम्य तें वन ॥ छाया सुशीतळ सघन ॥ पाहता आनंदली कामिन ॥ तोषलें मन सतीचें ॥ ४० ॥
मग सुवासिक पुष्पें तोडूनी ॥ माळा करीते चतुरकामिनी ॥ स्वकरें छेदितां ते क्षणीं ॥ कामोद्भव मनीं दाटला ॥ ४१ ॥
मग सकळ सखियातें बोले ॥ जरी पुरुष असतां ये वेळे ॥ तरी अरुवार पुष्यसेजे लीळे ॥ भोगित्यें सोहळे विषयाचे ॥ ४२ ॥
वयसा सुंदर सगुण ॥ वरी एकांत क्रीडावन ॥ नानापरी सुवास सुमन ॥ परी भ्रताराविण निर्फळ ते ॥ ४३ ॥
ऐसीं नानापरी कामचेष्टा ॥ करितसे ती वरिष्ठा ॥ तंव तिचें फिरलें अदृष्टा ॥ पातला श्रेष्ठ दुर्वासमुनी ॥ ४४ ॥
सवें शिष्य मेळा अपार ॥ लक्षुनि सरोवर तीर ॥ माध्यानीं आला दिनकर ॥ म्हणोनि समग्र उतरलें ॥ ४५ ॥
कोणी स्नानातें आदरिलें ॥ कोणी बहिर्दिशेसी गेलें ॥ कोणी स्वकर्मीं गुंतलें ॥ एकलें देखिलें दुर्वासा ॥ ४६ ॥
तंव हे देवांगना वहिली ॥ कामज्वरें ऋषीतें न्याहाळी ॥ एकाकीं धावून आली ॥ कंठीं सुदली पुष्पमाळा ॥ ४७ ॥
करीं होती पुष्पमाळा ॥ तेची घातली ऋषीचे गळा ॥ ऐसें देखता ते वेळा ॥ ऋषी आला कोपातें ॥ ४८ ॥
म्हणे नष्टे पापिष्टे पाही ॥ हें त्वा कर्म केलें काई ॥ हें तो आम्हां योग्य नाहीं ॥ आतां घेई शापातें ॥ ४९ ॥
कंठीं घातली माळा ॥ तो भ्रतारची केवळा ॥ तूं तव मदांध अबळा ॥ पिशाच तात्काळ होई का ॥ ५० ॥
ऐसें ऐकतां शापवचन ॥ येरी कंपित दीन वदन ॥ काममद गेला उतरून ॥ करुणा वचन बोलतसे ॥ ५१ ॥
उवाच दीनया वाचा कृतमेतत्क्षमस्व मे ॥ अजानंत्या कृतमिदं कुरुष्वानुग्रहं मयि ॥ ५ ॥
ऐके स्वामी ऋषिराया ॥ अज्ञानत्वें घडे क्रिया ॥ ते क्षमा कीजे स्वामिया ॥ म्हणोनिया पायां लागतसे ॥ ५२ ॥
चरण न सोडी सर्वथा ॥ चरणांवरी ठेविला माथा ॥ कृपाळुवा ऋषिनाथा ॥ शापव्यथा निवारी हे ॥ ५३ ॥
ब्राह्मण ह्रदय कोमळ ॥ कृपेनें द्रवला तात्काळ ॥ म्हणे माझें वाक्य असत्य केवळ ॥ नव्हे अबळे सर्वथा ॥ ५४ ॥
परी चतुर्युग प्रमाण ॥ सहस्र वेळ होय गणन ॥ तोंवरी पिशाचत्व पावोन ॥ उपरी स्वस्थान पावसी ॥ ५५ ॥
पाहा तरी अन्याय केतुला ॥ पर्वतप्राय दंड तेथे जाला ॥ यालागीं सूज्ञानि ब्रह्मवृंदाला ॥ भिवोन त्याला वंदावें ॥ ५६ ॥
ब्राह्मण असो कैसा तरी ॥ परी चहूंवर्णीचा अधिकारी ॥ मुख्य गायत्री मंत्राधिकारी ॥ म्हणोन चतुरीं नमावें ॥ ५७ ॥
असो उश्शाप पावोनि सुंदरी ॥ ऋषि निघोन गेले ते अवसरी ॥ तात्काळ पिशाचते नारी ॥ पावली निर्धारी ऋषिशापें ॥ ५८ ॥
दुर्घट वना माझारी ॥ कंटक वृक्ष परोपरी ॥ उदक न मिळे निर्धारी ॥ हिंडे सुंदरी पै तेथें ॥ ५९ ॥
आळेपिळे वृक्षासी घेत ॥ श्वापदें नाठवें जीवघात ॥ सदां तळमळे क्षुधित ॥ ऐसे लोटत बहुकाळ ॥ ६० ॥
तंव अकस्मात एके काळीं ॥ याज्ञवल्कीची कन्या सुमेळीं ॥ कांची तपस्विनी नामें बाळी ॥ सखियामेळी पातलीसे ॥ ६१ ॥
तंव तो मलमास विशेष ॥ लक्षुनी तीर्थ यात्रा प्रदोष ॥ चाललीसे कुरुक्षेत्रास ॥ भेटी अनयासें पैं झाली ॥ ६२ ॥
येरी जाऊन लवलाह्या ॥ धरिती जाली तिचे पाया ॥ म्हणे तपस्विनी माया ॥ परिसे सये वृत्तांतु ॥ ६३ ॥
मग मुळापासून वृत्तांत समग्र ॥ कथिला तिये समाचार ॥ शापभय परम दुस्तर ॥ कर्म अघोर सुटेना ॥ ६४ ॥
माये परम उपकारिये ब्रह्मनंदिनी ॥ मुक्त करीं शापभयापासुनी ॥ ऐसें मधुर वचनें करूनी ॥ ऋषिकुमारी प्रार्थिली ॥ ६५ ॥
नम्र वचनें कार्यसिद्धी ॥ नम्र वचनें साधे नवविधी ॥ ते अपाय न पावे कधी ॥ क्रूरवचनीं अनर्थ पैं ॥ ६६ ॥
जयाची वाणी मधुर असे ॥ त्याचें कार्य कधींच न नासे ॥ जो सदां क्रूर बोलतसे ॥ कल्पांती नसे यश तया ॥ ६७ ॥
असो तैसी नव्हे याज्ञवल्की ॥ चतुर भामिनी परम निकी ॥ पिशाचनिचे बोल ऐकोनि की ॥ ह्रदय विवेकी अनुसरली ॥ ६८ ॥
मग बोले ऋषिकन्यका ॥ कीं पिता माझा याज्ञवल्की देखा ॥ त्याणें मातें निवेदिलें व्रत एका ॥ अधिकमास निर्धारें ॥ ६९ ॥
पुरुषोत्तम मास विशेष ॥ म्हणोन जातसों सागरसंगमास ॥ तेथें करूनि स्नानदानास ॥ तप विशेष जाणोनी ॥ ७० ॥
मासमात्र करून स्नान ॥ नक्त भोजन मौन्य धरून ॥ त्याहीवरी दीप दान जाण ॥ वरी ब्राह्मण संतर्पण यथाविधी ॥ ७१ ॥
ऐसें तूं तें पुण्य घडलें जरी ॥ कदाचित मुक्त होशी शरीरीं ॥ पिशाचत्व जाऊन निर्धारी ॥ स्वपदीं जाशील तूं ॥ ७२ ॥
ऐकोन तयेचें वचन ॥ येरी बोले दीनवदन ॥ माझा देह पिशाच जाण ॥ केवीं स्नान दान घडें पै ॥ ७३ ॥
तरीं माउलिये तूं माझी माता ॥ मी तंव तुझी धर्मदुहिता ॥ इतुका उपकार करीं आतां ॥ देहव्यथा निवारी हे ॥ ७४ ॥
कांहीं पुण्य तुवां आपुलें ॥ मदर्पण जरी माये केलें ॥ तरी कोटिगुणें आगळें ॥ पुण्य घडे जाणिजे ॥ ७५ ॥
परोपकारा ऐसें पुण्य ॥ दुजें नसेचि सखे जाण ॥ यालागीं माये कृपाकरून ॥ करीं कृपादान येवढें ॥ ७६ ॥
तरी एका दिवसाचें पुण्य ॥ मातें करशिल जरी अर्पण ॥ तरी मी उद्धरागती पावेन ॥ स्थान पावेन आपुलें ॥ ७७ ॥
चतुर्युग केधवां जाती ॥ तोंवरी भोगूं पिशाचगती ॥ यालागीं परिसें विनंती ॥ लागे पुढती पायांतें ॥ ७८ ॥
येरी ऐकून करुणा वचन ॥ कृपेनें द्रवलें अंत:करण ॥ तियेतें अवश्य म्हणवून ॥ दिधलें भाषदान त्रिवाचा ॥ ७९ ॥
म्हणे मी परतो येई तोंवरी पाहीं ॥ तूं येथेंचि राही ये ठाई ॥ चिंता न करीं ह्रदयीं कांहीं ॥ मासान्तीं लवलाहीं येतसें ॥ ८० ॥
ऐसें वदोनि ऋषिअबळा ॥ घेऊन सखियांचा मेळा ॥ सत्वर पावली सागर संगमाला ॥ करी सोहळा मन इच्छा ॥ ८१ ॥
स्नानदानादी यथविधी ॥ मासमास अवघे साधी ॥ पूर्ण करून व्रतविधी ॥ ब्राह्मणविधी परिपूर्ण ॥ ८२ ॥
ऐसी करूनि पुण्य क्रिया ॥ परतूनि आली तया ठायां ॥ तंव ती पिशाची ऊर्ध्व दृष्टी करूनियां ॥ निरखितसे मार्गातें ॥ ८३ ॥
तंव एकाएकीं स्त्रियांचा मेळा ॥ देखून आनंदली वेल्हाळा ॥ धावून धरी चरणकमळा ॥ केला आपुला साच बोला ॥ ८४ ॥
मग ते ऋषिकन्या पाही ॥ करीं उदक घेतलें लवलाहीं ॥ एके दिनीचें पुण्य पाहीं ॥ उदक करीं घातलेंसें ॥ ८५ ॥
पुण्यतोय पडतांच हस्तकीं ॥ तात्काळ देहें जाली निकी ॥ पूर्ववत पुण्यलोकी ॥ अप्सरादेही पावली ॥ ८६ ॥
मुखें करून जयजयकार ॥ करिती जाली नमस्कार ॥ म्हणे माये उपकार थोर ॥ केला माते मजवरी ॥ ८७ ॥
ऐसें वदोनि ते अवसरी ॥ स्वधामा पावली ते नारी ॥ एवढी पिशाची निर्धारी ॥ उद्धरागती पावली ॥ ८८ ॥
म्हणोन मलमासाचें महिमान ॥ स्वयें कथितसे जनार्दन ॥ यालागीं श्रोते सज्जन ॥ कीजे स्नानदान यथाविधीं ॥ ८९ ॥
आपुले स्वकुळीचें वंशी ॥ कवण पावले पिशाच्यत्वासी ॥ अथवा पूर्वीचे वंशोवंशी ॥ हे तो नेणवे आपणासी ॥ ९० ॥
किंवा आपण स्वदेहासी ॥ प्राप्त होऊं कवण ठायासी ॥ हे तो नेणवे आपणासी ॥ म्हणोन व्रतासीं आचरावें ॥ ९१ ॥
म्हणाल काय होतें ये दानें ॥ झणीं न म्हणा ऎसें वचन ॥ येथें लक्ष्मीनारायण संवाद जाण ॥ तरी अप्रमाण कवण म्हणें ॥ ९२ ॥
परि भावार्थ पाहिजे निका ॥ म्हणजे प्राप्तीं तात्काळ देखा ॥ यालागीं करून विवेका ॥ आचरा निका व्रत भावो ॥ ९३ ॥
पुरुषोत्तम मासा ऐसा दुजामास ॥ नाही नाही हो निःशेष ॥ साक्षात पुरुषोत्तमाचा अंश ॥ जाणा निःशेष भाविकहो ॥ ९४ ॥
जैसा पर्वतामाजी मेरु थोर ॥ ग्रहगणीं भानु अपार ॥ गंगेमाजी सरस्वती अपार ॥ बोले श्रीवर आदरें ॥ ९५ ॥
नक्षत्रांमाजी जैसा चंद्रमा ॥ चतुःपादामाजी कामधेनू उत्तमा ॥ तैसा मासामाजी पुरुषोत्तम ॥ द्विपाद ब्राह्मण हा असे ॥ ९६ ॥
म्हणोन अति आदरें करून ॥ अगत्य कीजे स्नानदान ॥ म्हणोनि बोले जनार्दन ॥ तेंची कथन केले असे ॥ ९७ ॥
स्वस्ति श्रीमलमास माहात्म ॥ पद्मपुराणींचें संमत ॥ मनोहरसुत विरचित ॥ षोडशोऽध्याय गोड हा ॥ १६ ॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ ओव्या ९७ ॥ श्लोक ५ ॥ इति षोडशोऽध्यायः ॥
 
॥ इति षोडशोऽध्यायः ॥

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रविवारची आरती.... जयदेव जयदेव जय (श्री) म्हाळसापती ॥कर्‍हेच्या पाठारीं नांदे मल्हारी ॥ रहिवास केला कनक शिखरीं ॥ अर्धांगीं शोभे म्हाळसा सुंदरीं ॥ प्रीती आवडली बाणाई धनगरीण ॥ जयदेव जयदेव जय (श्री) म्हाळसापती ॥ आरति (भावार्थी) ओवाळुं तव चरणाप्रती ॥जयदेव