बायबल ख्रिस्तपूर्व दहाव्या शतकाआधी लिहिले!
जेरूसलेम , सोमवार, 24 डिसेंबर 2012 (15:29 IST)
ख्रिश्चनांचा पवित्र धर्मग्रंथ असलेले बायबल रूढ समजूतीपेक्षा शेकडो वर्षे आधी लिहिले गेले होते, असा दावा एका इस्त्रायली संशोधकाने नव्याने सापडलेल्या हिब्रूतील शिलालेखाच्या आधारे केला आहे. इस्त्रायल हे राज्यही ख्रिस्तपूर्व दहाव्या शतकात अस्तित्वात होते, याचा पुरावही त्यात आहे, असे त्याचे म्हणणे आहे. बायबल हे ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकात लिहिले गेले असावे अशी रूढ समजूत आहे. कारण ते लिहिण्यासाठी असलेली किमान साक्षरता त्या काळापर्यंत नव्हती असे स्पष्टीकरण त्यासाठी दिले जात असे. पण हैफा युनिव्हर्सिटीचे प्रा. गेरशॉन गलील यांनी मात्र हे मत खोडून टाकणारा दावा केला आहे. गलील यांना शाईच्या सहाय्याने लिहिलेला शिलालेख सापडला असून त्या आधारे त्यांनी इस्त्रायल हे राष्ट्र ख्रिस्तपूर्व दहाव्या शतकात अस्तित्वात असल्याचा दावा केला आहे. संपूर्ण बायबल नसले तरी त्यातला काही भाग नक्कीच बराच आधी लिहिला गेला असावा असे गलील यांचे म्हणणे आहे. जेरूसलेममधील इलाह खोर्यातील एक शिलालेख २००८ मध्ये सापडला होता. पण त्यातली भाषा तेव्हा उलगडलेली नव्हती. आता गलील यांनी त्याचा अर्थ लावला आहे. या शिलालेखात गुलाम, विधवा आणि अनाथांविषयी भाष्य करण्यात आलेले आहे. यात अनेक हिब्रू क्रियापदांचा वापर झालेला दिसतो. ही क्रियापदे हिब्रूव्यतिरिक्त इतर कोणत्याही भाषेत सहसा वापरली जात नाहीत. विधवेसाठी अलमनाह असा शब्द हिब्रूत आहे. तो त्याच अर्थी या शिलालेखात वापरला आहे. विधवा शब्दासाठी इतर अनेक शब्द बाकीच्या भाषांत आहे. हिब्रूत हाच शब्द असल्याने हिब्रू भाषेच्या अस्तित्वाचा हा पुरावाच असल्याचे गलील यांचे मानणे आहे. जेरूसलेममधील मध्यवर्ती भागात रहात असणारी मंडळी कुशल लेखक होती हेच यातून सिद्ध होते, असे सांगून हे लेखन बायबलमधील लेखांशी साधर्म्य साधणारे आहे. पण ती बायबलची नक्कल नसल्याचेही गलील यांनी स्पष्ट केले आहे.