Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मोहरम

मोहरम
MH NewsMHNEWS
प्रत्येक धर्मात सणाचे महत्त्व असते. त्या त्या धर्माप्रमाणे सण साजरे करण्याची एक विशिष्ट पद्धत असते. मुस्लिम धर्मात मोहरमची पद्धत आहे. मोहरम मुस्लिम महिन्याचा पहिला महिना व त्या महिन्यातील उत्सव म्हणून पूर्वी मोठ्या प्रमाणावर साजरा केला जात असे. परंतु हजरत इमाम हुसेन यांचा वध झाल्यामुळे या महिन्याला अशुभत्व आले. तेव्हापासून या महिन्यात विवाह करणे अशुभ मानले जाऊ लागले. प्राचीन काळापासून मोहरम महिन्याच्या पहिल्या दहा दिवसात मोहरम नावाचा उत्सव साजरा केला जातो. मुहम्मंद पैंगबराच्या मुलीची मुलगे हसन व हुसेन यांना त्यांच्या शत्रुने म्हणजे सुन्नी पंथाच्या खलीफानी इ.स.७ च्या शतकात अमानुष प्रकारे मारले. त्या दु:खद प्रसंगाची स्मृती म्हणून हा उत्सव करतात.

या उत्सवात ताजियाला किंवा ताबूत याला फार महत्त्व असते. प्रत्येक मनुष्य आपल्या ऐपतीप्रमाणे चांदी हस्तीदंत, शिसवी, चंदन, काच, बांबू, कागद हे पदार्थ वापरून ताबूत बनवितो. अधिक किंमतीच्या प्रतिकृती अनेक वर्ष ठेवल्या जातात. शेवटच्या दिवशी पुरण्यासाठी साधे बांबू व कागद यांचा वापर केला जातो. श्रीमंत लोक घुमटाकृती इमारत बांधतात. तिला इमामबारा म्हणतात. विशेषत: ताबूताजवळ एक ओटा बांधलेला असतो. तिथे रोज मौलवी 'धीमजलीस' नामक पोथीतील एकेक भाग जमलेल्या लोकांना वाचून दाखवतो. मजलीसचा अर्थ शोक प्रदर्शक किंवा पवित्र सभा असा आहे. हा कार्यक्रम सकाळ, संध्याकाळ होतो. शेवटी छातीवर हात मारुन हसन, हुसेन यांच्या नावाचा आक्रोश केला जातो.

मुस्लिम स्त्रीया देखील शोक प्रदर्शित करतात. मोहरम उत्सवाच्या शेवटच्या दिवशी सर्व ताबूताची मिरवणूक काढली जाते. प्रत्येक ताबूताबरोबर मालकाच्या इतमामाप्रमाणे वाद्य असतात. मिरवणुकीच्या शेवटी गरीब लोकांना अन्नदान केले जाते. विशेषत: महाराष्ट्रातल्या अनेक भागात हिंदू धर्मिय देखील या ताबूतात सहभागी होतात. मिरवणूक संपल्यानंतर सर्व ताबूत गावाबाहेरच्या थडग्यात पुरतात. मृत मनुष्याच्या दफनप्रसंगी जो विधी केला जातो तो विधी यावेळी केला जातो. घरी परतल्यानंतर गरीबाना दानधर्म आणि अन्नधान्य देण्याची प्रथा आहे. महाराष्ट्रातल्या अनेक गावात मोहरम हिंदू-मुस्लिम एकत्रितपणे साजरा करतात.
(महान्यूज)

Share this Story:

Follow Webdunia marathi