Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अहिंसेची शिकवण देणारा जैन धर्म

अहिंसेची शिकवण देणारा जैन धर्म

सॉ. अर्चना गजेंद्र भटूरकर

जैन धर्म हा भारतातील जुन्या धर्मांपैकी एक आहे. या धर्माचा जन्म हिंदू धर्मातूनच झाला. चोवीस तीर्थकरांची संपन्न परंपरा या धर्माला लाभली आहे. भगवान महावीर हे या धर्माचे चोवीसावे तीर्थकर.

कुणाचे स्वातंत्र्य हिरावून घ्यायचे नाही, कल्याण करायचे व कोणालाही त्रास द्यायचा नाही ही शिकवण हा धर्म प्रामुख्याने देतो. 'जिन'चे अनुयायी म्हणजेच जैन. जिन हा शब्द 'जी' या धातूपासून बनलेला आहे.

'जी' म्हणजे विजय व जिन म्हणजे विजय मिळवणारा. ज्यांनी आपल्या मनावर, वाणीवर व कामावर विजय मिळवलाय म्हणजे त्यांना नियंत्रणात ठेवले ते जिन. अर्थात जैन. या धर्माचे जगभरात सुमारे पंचेचाळीस लाख अनुयायी आहेत. त्यातील बहुसंख्य भारतात आहेत.

विश्वातील सर्व प्राणीमात्रांचे कल्याण होत आहे की नाही याची काळजी घेणे हे या धर्माचे मुख्य सार आहे. जैन असे मानतात, की मनुष्य, प्राणी व वनस्पती या सर्व स‍जीवांमध्ये आत्मा आहे. या प्रत्येकाला समान वागणूक दिली पाहिजे, त्याला मान दिला पाहिजे.

जैन हे शाकाहारी असतात. या धर्माचा पुनर्जन्मावर विश्वास आहे. या धर्माच्या मते देव किंवा धार्मिक कर्मकांडे मनुष्याला फारशी मदत करणारी नाहीत. त्याएवजी श्रध्दा, योग्य ज्ञान व योग्य वर्तणूक ही तत्वे महत्त्वाची आहेत.

या धर्माची शिकवण पाच महावृत्तातूनही स्पष्ट होते. अहिंसा हे त्याचे मुख्य वृत्त. त्याचप्रमाणे नेहमी सत्य बोलणे, मालमत्तेचा लोभ न करणे, चोरी न करणे व भोगवादी न होणे ही त्यांची इतर वृत्ते आहेत. जैन धर्माला धर्मगुरू असा नाही. जैन धर्माचे दोन पंथ आहेत.

दिगंबर व श्र्वेतांबर. साधू, साध्वी, श्रावक (सामान्य पुरूष अनुयायी ) व श्राविका (सामान्य स्त्री अनुयायी ) अशा काही या धर्मातील संज्ञा आहेत. श्रावक आणि श्राविका धर्माने सांगितलेली तत्वे, नियम पाळत असतात. या धर्मातील साधू व साध्वी देशभर पायी भ्रमण करीत मार्गदर्शन करतात.

तीर्थंकर परंपरा-

जैन धर्मात 24 ‍तीर्थकर झाले. भगवान ऋषभदेव हे पहिले तीर्थकर. भगवान महावीर हे 24 वे तीर्थकर होते. त्यांनी दिलेली शिकवण पाळणे म्हणजेच या धर्माचे अनुसरण करणे होय. भगवान महावीरांची जयंती मोठ्या उत्साहात या धर्माच्या अनुयायांकडून साजरी केली जाते.

Share this Story:

Follow Webdunia marathi