Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भगवान महावीर यांचा जीवन परिचय

भगवान महावीर यांचा जीवन परिचय
जैन धर्माचे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर अहिंसेचे मूर्तिमंत प्रतिक होते. वैशाली राज्याच्या कुंडलपूर येथे इसवी सन पूर्व 599 मध्ये त्यांचा जन्म झाला. वडिलांचे नाव सिद्धार्थ तर आईचे नाव त्रिशला होते. बिहारमधील मुजफ्फरपुर जिल्ह्यात पूर्वीचे वैशाली होते.

भगवान वर्धमान यांच्या भावाचे नाव नंदिवर्धन तर बहिणीचे नाव सुदर्शना होते. त्यांचे बालपण राजेशाही थाटात गेले. आठ वर्षांचे असताना त्यांना शिक्षण व शस्त्रविद्येचे ज्ञान घेण्यासाठी शाळेत पाठविण्यात आले.

श्वेतांबर पंथाच्या म्हणण्यानुसार भगवान वर्धमान यांनी यशोदा यांच्याशी विवाह केला होता, तर दिगंबर पंथाच्या म्हणण्यानुसार त्यांनी विवाह केला नसून ते ब्रम्हचारी होते. महावीरांचे कुटुंबीय जैनांचे तेवीसावे तीर्थंकर पार्श्वनाथ यांचे अनुयायी होते.

भगवान महावीर 28 वर्षांचे असताना त्यांच्या आई वडिलांचा मृत्यू झाला. वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांनी श्रामणी दीक्षा घेतली. त्यानंतर बहुतांश वेळ ते ध्यानात मग्न असत. काही दिवसांनी त्यांनी पूर्ण आत्मज्ञान झाले.

त्यांनी बारा वर्षांपर्यंत मौन पाळले होते. हटयोग्याप्रमाणे त्यांनी शरीराला खूप कष्ट दिले. शेवटी त्यांना केवलज्ञान प्राप्त झाले. ज्ञानप्राप्तीनंतर त्यांनी जनकल्याणासाठी उपदेश देण्यास सुरवात केली.

त्यासाठी त्यांनी त्यावेळी लोकांमध्ये प्रचलित असलेल्या अर्धमागधी भाषेचा आधार घेतला. इंद्रिय व व विषय वासनांचे सुख दुसर्‍याला दुःख देऊनच मिळवता येते, असे त्यांचे मत होते. त्यामुळेच त्यांनी जैन धर्माच्या अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह या बाबींमध्ये ब्रम्हचर्याचाही समावेश केला.

त्याग, संयम, प्रेम, करूणा, शील व सदाचार हे त्यांच्या प्रवचनाचे सार आहे. त्यांनी चतुर्विध संघाची स्थापना करून समता हेच जीवनाचे लक्ष्य असल्याचे सांगितले. देशात ठिकठिकाणी फिरून महावीरांनी पवित्र संदेशाचा प्रसार केला.

इसवी सन पूर्व 527 मध्ये बिहार येथील पावापुरी येथे वयाच्या बाहत्तराव्या वर्षी त्यांचे निर्वाण झाले. तो दिवस होता कार्तिक कृष्ण अमावस्येचा. भगवान महावीरांच्या निर्वाणादिवशी घराघरात दिवे लावले जातात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Shiva Mantra: सोमवारी पूजा करताना महादेव मंत्राचा जप करावा