Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अधिकमास माहात्म्य अध्याय एकोणिसावा

अधिकमास माहात्म्य अध्याय एकोणिसावा
, मंगळवार, 15 सप्टेंबर 2020 (13:08 IST)
श्रीगणेशाय नमः ॥ जयजयाजी श्रीगुरुसमर्था ॥ भाविकांते मोक्षदाता ॥ अनाथनाथा कृपावंता ॥ करुणाकरा दीनबंधो ॥ १ ॥
अगाध भक्‍तीचा महिमा ॥ भक्‍तप्रिय सर्वोत्तमा ॥ भक्‍तिवीण निरर्थक जन्मा ॥ प्राणियांचा निर्धारें ॥ २ ॥
यालागीं भाव धरून अंतरीं ॥ प्रचीत घ्यावी शरीरीं ॥ आत्मप्रचीत गुरुप्रचीतवरी ॥ शास्त्रप्रचीत तिसरी जाणिजे ॥ ३ ॥
म्हणोन दृष्टांतीं कथाभाग सत्य ॥ स्वयें बोलिला श्रीअनंत ॥ ही जाणिजे शास्त्रप्रचीत ॥ ऐका दृष्टांत दुसरा ॥ ४ ॥
वक्ता वदेल अर्थांतर ॥ तो जाणिजे गुरुकृपा साचार ॥ भाव धरूनि उकलावें अंतर ॥ मग साक्षात्कार आत्मप्रचीती ॥ ५ ॥
एवं तिन्ही प्रचीती घेऊनी ॥ प्रवर्तावें श्रोतेजनीं ॥ याउपरी मलमास कथनीं ॥ श्रोतेजनीं परिसावी ॥ ६ ॥
लक्ष्मी नारायण संवाद ॥ तोची श्रोतियां करूं विशद ॥ ऐका विचक्षण सावध ॥ जेणें हरेल वेध मानसीं ॥ ७ ॥
क्षीराब्धिजा वदे पुरुषोत्तमा ॥ अनुपम्य ऐकिला जी महिमा ॥ तरी पुढील परिसावें नेमा ॥ कवणे परी आचरावें ॥ ८ ॥
कवण उद्धरोनि गेला ॥ कवणें नेम असा साधिला ॥ हा तंव विस्तार आगळा ॥ कृपा करून वदावा ॥ ९ ॥
ऐकून लक्ष्मीची वाणी ॥ बोलता जाला चक्रपाणी ॥ म्हणे ऐकहो शुभकल्याणी ॥ एकाग्र करून मानस ॥ १० ॥
मेरु सिंधौतु नगरी वर्तते बहुविस्तरा ॥ नाम्ना शिवपुरी ख्याता शिवस्याति प्रिया सदा ॥ १ ॥
गोकर्णस्य गिरेः प्रार्श्वे प्रासादाट्टलभूषिता ॥ बव्हाश्चर्यवतीरम्या रम्यचत्वर शोभिता ॥ २ ॥
नाना ब्राह्मणसंयुक्ता क्षत्रियैश्च विराजिता ॥ वैश्यैः शूद्रै स्तथान्यैश्च संयुक्ता सत्यवादिभिः ॥ ३ ॥
तस्यामासीत्सदाचारः शूद्रः कश्चिद्वरोगृही ॥ नाम्नापि विप्रदासोसौ कमर्णापि तथाविधः ॥ ४ ॥
तस्य पत्‍नी विप्रदासीसा नाम्ना शुभलक्षणा ॥ साध्वी पतिपरापत्युराज्ञासन्निता सदा ॥ ५ ॥
मेरु तळाचिया ठायीं जाण ॥ शिवकांची नगरी विस्तीर्ण ॥ ब्रह्मसमुदावो परिपूर्ण ॥ अध्ययन घरोघरीं ॥ ११ ॥
गोकर्णाचे पश्चिमदिशे ॥ अपूर्व नगरी ते असे ॥ क्षुद्र क्षेत्री सर्व धर्म वसे ॥ वेदमार्गे वर्तती पैं ॥ १२ ॥
वेदमर्यादा नुलंघिती कोणी ॥ ब्राह्मणा पूजिती वर्ण तिन्ही ॥ श्रौतस्मार्त अवग्रहणीं ॥ सदाचारें ब्राह्मण वर्तती जे ॥ १३ ॥
नगराची रचना अतिअद्‍भुत ॥ पाहून जननयन तटस्थ होत ॥ रम्य गोपुरें लखलखीत ॥ बरवी झळकत रविकिरणें ॥ १४ ॥
तया नगरीं एक शूद्र जाण ॥ नाम तयाचें विप्रदास म्हणोन ॥ बाहाताती सर्वही जन ॥ सेवाधारी पूर्ण ब्राह्मणाचा ॥ १५ ॥
एका विप्राचिया घरीं ॥ करून सेवा चाकरी ॥ निरंतर वर्ते सदाचारी ॥ विश्वास पूर्ण ब्राह्मणाचा ॥ १६ ॥
तयाची भार्या पतिव्रता पूर्ण ॥ नुलंघी कदा पतिवचन ॥ तेही विप्रसेवा करूनि जाण ॥ कुटुंब रक्षण करिताती ॥ १७ ॥
याउपरी एके दिनी ॥ मलमासे संधी जाणुनी ॥ विप्रमेळा तये क्षणीं ॥ स्नानालागुनी चालिले ॥ १८ ॥
तंव ते शुद्रकामिनी ॥ विनवी भ्रतारालागुनी ॥ समस्त जग मिळोनी ॥ स्नानालागुनी जाताती ॥ १९ ॥
तरी आपण वर्णहीन याती ॥ केवी न घडेल पुण्यप्राप्ती ॥ द्रव्यही नाहीं संचितीं ॥ जे दान पद्धती करावी ॥ २० ॥
यालागीं प्राणनाथा पाहीं ॥ विप्रा सांगातें चला सर्वही ॥ दानधर्मातें धन तें नाहीं ॥ परी करूं देह पवित्र ॥ २१ ॥
स्नानें करून पवित्रता ॥ ऐसी वदतसे जनवार्ता ॥ यालागीं विप्रातें प्रार्था ॥ न्यावे तत्वता समागमें ॥ २२ ॥
ऐसें ऐकून उत्तर ॥ द्रवलें शूद्राचें अंतर ॥ मग प्रार्थूनिया द्विजवर ॥ निघाला सत्वर कुटुंबेंसि ॥ २३ ॥
यात्रेचा समुदावो पातला ॥ गोकर्ण क्षेत्राप्रति आला ॥ पाहोन तेथीच्या गंगाजळा ॥ तटस्थ जाला समुदावो ॥ २४ ॥
गंगा पाहतांच नयनीं ॥ तात्काळ पातका होय धुणी ॥ समग्र जन स्नानालागुनीं ॥ तये स्थानीं उतरले ॥ २५ ॥
नित्य करिती स्नानदानास ॥ यात्रा राहिली एक मास ॥ विप्रासवें शूद्रही स्नानास ॥ स्त्रियेसहीत जातसे ॥ २६ ॥
नित्य स्नान-विधीसारूनी ॥ मग पुष्पबिल्वादी आणुनी ॥ नित्य पूजितसे शिवभवानी ॥ भावार्थ मनी आगळा ॥ २७ ॥
उभयतां जाऊनि वनांत ॥ काष्ठभारा आणिती नित्य ॥ त्याचा विक्रय करून सत्य ॥ द्रव्य संचय करिताती ॥ २८॥
मौन्य न बोलती कवणासी ॥ नक्‍त राहती उपवासी ॥ सायंकाळीं सारिती भोजनासी ॥ नित्यनेमेसी वर्तत ॥ २९ ॥
ऐसे व्रत संपूर्ण एकमास ॥ उभयतां आचरली निर्दोष ॥ पाप जळालें निःशेष ॥ नाहीं लवलेश तिळभरी ॥ ३० ॥
मग संचयो जो धनाचा ॥ नित्य विक्रय काष्ठाचा ॥ तो काढुनियां तयाचा ॥ व्यय करिते पैं जाले ॥ ३१ ॥
यथायुक्त ब्राह्मण भोजन ॥ करिते जाले उद्यापन ॥ त्रयचि दशक अपूप अन्न ॥ केलें अर्पण द्विजातें ॥ ३२ ॥
मग शेवटीं ते उभयतां ॥ भोजनीं बैसलें तत्वता ॥ घेऊन विप्रांची मंत्राक्षता ॥ बिराडमार्गी चालिले ॥ ३३ ॥
तंव नवल वर्तलें तये क्षणीं ॥ रात्र जाली एक यामिनी ॥ तंव एक पिशाच मार्गस्थानीं ॥ उभां येऊनि ठाकला ॥ ३४ ॥
विक्राळ वदन भयंकर ॥ लंबबाहो विशाळ शरीर ॥ मुख पसरूनि क्षुधातुर ॥ धांवला समोर ग्रासावया ॥ ३५ ॥
तयातें पाहून उभयांनीं ॥ तटस्थ ठेले तयास्थानीं ॥ तंव दैवयोगें करूनीं ॥ अपूर्व काहाणीं पैं जाली ॥ ३६ ॥
पुण्यशरिरी शूद्रदंपत्य ॥ पाहूनी पिशाच प्रेत ॥ क्रूर भावना निरसून तेथें ॥ जाला बोलतां शूद्रातें ॥ ३७ ॥
म्हणे महापुरुषां तू कोण ॥ येथें यावया काय कारण ॥ मी तंव क्षुधीत पिशाच जाण ॥ करावया भक्षण आलों तुम्हां ॥ ३८ ॥
परी तंव दर्शनें समाधान ॥ पावन जालें माझें मन ॥ तूंतें करितां संभाषण ॥ वाटे पावन होईन मी ॥ ३९ ॥
आजवरी या पर्वतशिखरीं ॥ मी फिरत होतों वनांतरी ॥ वृकव्याघ्र नानापरी ॥ क्षुधाहारीं हिंडतसे ॥ ४० ॥
परि क्षुधा न धाय सर्वथा ॥ या क्षुधेंत फिरे मी तत्वता ॥ तंव दृष्टीस देखिलें अवचिता ॥ विप्रदासा तुजलागी ॥ ४१ ॥
तरी कृपावंता दयानिधी ॥ निरसी माझी भवव्याधी ॥ देऊनियां पुण्य औषधी ॥ भवभयव्याधी हरावी ॥ ४२ ॥
ऐकून तयाचें उत्तर ॥ शूद्र वदे तेव्हां प्रत्युत्तर ॥ म्हणें तूं पूर्वी होतासि थोर ॥ ते सविस्तर निवेदी ॥ ४३ ॥
कवण पापास्तव पाहें ॥ पिशाच देह लाधला आहे ॥ तो सांगे लवलाहें ॥ पुढें उपाय विचारू ॥ ४४ ॥
येरू म्हणे ऐकें स्वामिराजा ॥ पूर्वी मीं क्षेत्रज वंशी राजा ॥ होतों पराक्रमीं तेजःपुंजा ॥ शत्रु सहज पायातळी ॥ ४५ ॥
सर्वांवरी दरारा पाहें ॥ कापती सर्वही राये ॥ यवन मंडळी पाळीं निर्भय ॥ नाहीं भयपापाचें ॥ ४६ ॥
पुण्य लेश नाहीं सर्वथा ॥ स्वप्नीं नेणें धर्मवार्ता ॥ मार्ग पाडून तत्वता ॥ वस्तु हरीं मार्गस्थांच्या ॥ ४७ ॥
परद्वार असंख्यात ॥ मज घडले अपरमित ॥ माझिया पापा नाहीं गणित ॥ सौख्या अमीत भोगिलें ॥ ४८ ॥
आपपर नेणें सर्वथा ॥ प्रजेतें नागवीं तत्वता ॥ त्यांचिया शापें मज ताता ॥ क्षयरोग लागला पैं ॥ ४९ ॥
त्यायोगें मृत्यु पावलों सवेग ॥ यमदूतीं कर्शूनियां आंग ॥ दुर्धर माझा पापभोग ॥ जाणुनि जाचिती मजलागीं ॥ ५० ॥
मी दानधर्म केलाच नाहीं ॥ अतीत अभ्यागत नेणें कांहीं ॥ तीर्थ पर्वणी स्वप्नीही ॥ पाहिलीं नाहीं पापिष्टें ॥ ५१ ॥
द्रव्य असूनि माझे पदरीं ॥ मी तव तीर्थ दान न करीं ॥ सरली आयुष्याची दोरी ॥ नरक अघोरी टाकिलें मज ॥ ५२ ॥
मग तेथें बहु पस्तावलों ॥ अहा देवा स्वधर्म आंचरलों ॥ पापातें मी नाहीं भ्यालों ॥ मदबळें करूनियां ॥ ५३ ॥
मग तेथें उपाव नसे काहीं ॥ हिंपुटी जालों स्वदेहीं ॥ द्रव्य जोडिलें तेंही ॥ राहिलें जेथिचें तेथेंची ॥ ५४ ॥
व्यर्थ गेलीं माझी वयसा ॥ पापबळें जोडिला पैसा ॥ संसारकारणीं सर्व आशा ॥ शेवटीं नाशा पावलों ॥ ५५ ॥
मिळोनीं काका मामा आत्या ॥ बंधुभगिनी आणि चुलत्या ॥ मिळूनियां मज भोंवत्या ॥ वाटोळे केलें द्रव्याचें ॥ ५६ ॥
सासूसासरा विहिणी ॥ सुना जावई काकी मामी ॥ आपा आबा सर्वांनीं ॥ वेढिले मजलागी धनलोभें ॥ ५७ ॥
शेवटीं अंतकाळ आला ॥ सकळ जालीं सभोंवती गोळा ॥ हात देऊनी कपाळा ॥ रडती खळखळा धनासाठीं ॥ ५८ ॥
म्हणती छत्र गेलें आमुचें ॥ कोण रक्षण करील कुटुंबाचें ॥ शेवटीं नाहीं कोणी कोणाचें ॥ सर्वही जायाचें सर्व लेणें ॥ ५९ ॥
ऐसी गती माझी झालीं ॥ शेवटीं यमयातना प्राप्त झाली ॥ सर्व आटलें तये काळीं ॥ सोडविता बळी न दिसे पैं ॥ ६० ॥
काळाचे मुखींहूनी सर्वथा ॥ न देखों कोणी सोडविता ॥ यालागीं विचक्षण जनीं तत्वता ॥ मोक्षपंथा स्मरावें ॥ ६१ ॥
एका सद्‍गुरू वांचुनी ॥ उपाव नाहींच त्रिभुवनीं ॥ तोची सोडवी काळापासुनी ॥ इतरांची कहाणी न चलेची ॥ ६२ ॥
ऐसा मी फार पस्तावलों ॥ शेवटीं रवरवीं पडता जालों ॥ तेथें बहुत जाजावलों ॥ कुसमुसलों अंतरीं ॥ ६३ ॥
तेथें कुंभपाक कुंड ॥ तळीं विस्तीर्ण लहान तोंड ॥ तयामाजी नरक भरला उदंड ॥ तोचि दंड प्राणियातें ॥ ६४ ॥
त्यामाजी नेउनी टाकिती ॥ एकावरी एक रिचविती ॥ उसंत नाहीं निघावयाप्रती ॥ बुचकळ्या घेती एकाएक ॥ ६५ ॥
तंव टोले देती यमदूत ॥ मागुते आंत लोटीत ॥ नाकीं तोंडीं भरत नरक तो ॥ ६६ ॥
ऐसो जाचणी दिवस बहुत ॥ भोगिली सहस्र वर्षे परियंत ॥ शेवटी मज काढूनि देत ॥ पिशाच योनींत टाकिलें ॥ ६७ ॥
तेथे क्षुधा लागतां बहुत ॥ परी संकीर्ण रंध्रमुखांत ॥ कवळमध्यें अडकत ॥ क्षुधा शांत न होय ॥ ६८ ॥
उदक प्राशनासी नाहीं ॥ संवदनीचें किंवा अशौच्य देहीं ॥ निर्मळ पाहतातें नाहीं ॥ ऐसी देहीं दुःखयातना ॥ ६९ ॥
वस्त्र नाहीं दिगंबर ॥ वृक्षावरी आमुचें घर ॥ ऐसा भोग तीस हजार ॥ संवत्सर भोगावा ॥ ७० ॥
यालागीं भाकितों करुणा ॥ कृपाळू तू तापसी राणा ॥ देऊन कांहीं पुण्यदाना ॥ निवारी यातना माझी हे ॥ ७१ ॥
अवघे गेले सुखाचे सांगाती ॥ शेवटी झाली हे माझी गती ॥ कृपासागरा दयामूर्ति ॥ करीं निवृत्ती पापाची ॥ ७२ ॥
येवढा उपकार करीं ॥ सुकृत बांधीं आपुले पदरीं ॥ चुकवीं माझी जन्ममरण फेरी ॥ थोर उपकारीं बुडेन मी ॥ ७३ ॥
ऐसी करुणादीन वाणी ॥ ऐकून शूद्र द्रवला अंतःकरणी ॥ मग उदक करीं घेऊनी ॥ संकल्पुनी सोडित ॥ ७४ ॥
म्हणे महापुरुषा ऐक ॥ तूं तंव कर्मपातकी देख ॥ तूं तें पाहूनि अधिक ॥ दया मातें उपजली ॥ ७५ ॥
तरी सप्तदिन स्नानाचें फळ ॥ मी आचरी जो केवळ ॥ मलमाहात्माचें निर्मळ ॥ तें हें जळ असे पैं ॥ ७६ ॥
या सप्तदिनाचे पुण्येकरून ॥ तुझें पापक्षाळण ॥ तात्काळ जाई उद्धरून ॥ ऐसें म्हणोन उदक सोडिलें ॥ ७७ ॥
तें उदक पडतां प्रेतहस्तीं ॥ तेथें आश्चर्य झाले श्रोतीं ॥ अवधाराहो परमप्रीती ॥ महापातकी उद्धरला ॥ ७८ ॥
तात्काळ दिव्य देह पावला ॥ प्रेतभाव सर्व लोपला ॥ तंव अकस्मात देखिला ॥ घंटारव स्वर्गीचा ॥ ७९ ॥
दिव्य विमान स्वर्गीहून ॥ तात्काळ उतरलें तयेक्षण ॥ लखलखीत देवगण ॥ उभे येऊन ठाकले ॥ ८० ॥
पिशाच उद्धरला तात्काळ ॥ विमानीं बैसवोनि गेला ते वेळ ॥ नेत्रीं पाहते जाले सकळ ॥ म्हणती धन्य फळ स्नानाचें ॥ ८१ ॥
मलस्नान अगाध महिमा ॥ कृपाळु तो सर्वोत्तमा ॥ धन्य या शूद्राच्या नेमा ॥ केलें कर्म अघटित ॥ ८२ ॥
स्वयें पुण्याचें दान केलें ॥ ऐसें कधी देखिलें ना ऐकिलें ॥ ऐसिया पापिया तें उद्धरिलें ॥ अनुपम्य केलें या शूद्रें ॥ ८३ ॥
आश्चर्य करून सर्वांनी ॥ येऊन लागती शूद्रचरणीं ॥ जयजयकार गोकर्णी ॥ प्रवर्तला आदरें ॥ ८४ ॥
मग नानापरी दिव्यान्न ॥ ठायीं ठायीं विप्रभोजन ॥ होता पुराणकथा श्रवण ॥ आनंद पूर सर्वांतें ॥ ८५ ॥
ऐसा मलमास स्नानमहिमा ॥ निवेदिला श्रोतयां तुम्हां ॥ जो कथिला सार्वभौमा ॥ श्रीविष्णु लक्ष्मीते ॥ ८६ ॥
तोचि प्राकृत भाषे वैखरीं ॥ भरविला श्रोतियांचे कर्णद्वारीं ॥ न्यून पूर्ण तो चतुरीं ॥ क्षमा मजवरी पैं कीजे ॥ ८७ ॥
मलमहात्म अगाध महिमा ॥ जेणें संतोष पुरुषोत्तमा ॥ म्हणोनि धरिजे अतिनेमा ॥ अनुक्रमें संपादावा ॥ ८८ ॥
कांहीं धन न लागतां बहुत ॥ फुकाचें पुण्य असे जोडत ॥ यालागीं साधावें हिताहित ॥ हेची विहित सर्वदां ॥ ८९ ॥
शेवट कोणी कोणाचें नाहीं ॥ एकटें पडणें लागे प्रवाहीं ॥ धनधान्यतें सर्वही राही ॥ जेथील तेथेंची ॥ ९० ॥
यालागीं करा काढाकाढी ॥ साधा बापानों लवडसवडी ॥ जेणें सुटे काळाची वोढी ॥ ऐसी तांतडी करावी ॥ ९१ ॥
इति श्रीमलमासमहात्म ग्रंथ ॥ पद्मपुराणाचे संमत ॥ मनोहरसुत विरचित ॥ एकोनविंशोध्याय गोड हा ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ ओव्याः ९१ ॥ श्लोक ५ 
 
॥ इति एकोनविंशोऽध्यायः ॥

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

श्री बजरंग बाण