Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुरुषोत्तम मास: हे कार्य केल्याने लाभेल पुण्य

पुरुषोत्तम मास: हे कार्य केल्याने लाभेल पुण्य
, गुरूवार, 17 सप्टेंबर 2020 (14:57 IST)
अधिक महिना भगवान विष्णूंचा प्रिय महिना आहे. या महिन्यात प्रभू श्रीराम, भगवान श्रीकृष्ण आणि श्री हरीची उपासना करणे अधिक महत्वाचे आहे. 
 
१. या महिन्यात पहाटे लवकर उठून थंड पाण्याने स्नान करावे. अंगाला सुगंधी उटी लावावी. नदीवर अथवा तीर्थाच्या ठिकाणी स्नानादी धार्मिक कृत्ये करावीत. मन निर्मळ ठेवावे. या महिन्यात आवळीच्या झाडाखालील स्नानाला विशेष महत्व आहे.
 
स्नानानंतर म्हणावयाचा मंत्र
 
गोवर्धन धरं वंदे गोपालं गोपरू पिणम् ।
गोकुलोत्सव मीशानं गोविंदं गोपिका प्रियम् ॥
भक्तिर्भवति गोविंदे पुत्रपौत्र विवर्धिनी ।
अकीर्ति क्षय माप्नोति सत्कीर्तिर्वधते चिरम् ॥
 
२. या मासात शक्यतो एक वेळेसच अन्नग्रहण करावे. जेवताना मौन पाळावे.
 
३. अधिक महिन्यात रोज देवाजवळ दिवा लावावा आणि महिन्याच्या शेवटी तो ब्राह्मणाला दान द्यावा.
 
४. या महिन्यात आपल्याला आवडणार्‍या वस्तूचा त्याग करावा. जसे एखादे खाद्य पदार्थ, एखाद्या रंगाचे वस्त्र, एखादी आवडणारी वस्तू वगैरे.
 
५. या महिन्यातील दानाचे महत्व अनन्यसाधारण आहे.
हिंदू धर्मात मुलगी - जावयाला लक्ष्मीनारायणाचा जोडा मानतात. म्हणून जावयाला तुपात तळलेले तेहतीसच्या पटीत अनारसे देतात. एका चांदीच्या अथवा तांब्याच्या ताम्हणात अनारसे ठेवून त्यावर तांब्याचा दिवा ठेवून तो लावून जावयाला देतात. (अनारशा ऐवजी बत्तासे, म्हैसूरपाक, वगैरे जाळीदार पदार्थ द्यावयाचे असतात.) या महिन्यात नारळ, सुपार्‍या, फळे यासारख्या वस्तू सुद्धा तेहतीसच्या पटीत घेऊन दान करतात.
 
या महिन्यात पुरणाचे दिंड करून इष्ट मित्रांना, नातेवाईकांना भोजन देतात (या दिंडांना धोंडे सुद्धा म्हणतात यावरुन या महिन्यास 'धोंडे महिना सुद्धा म्हणतात.)

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अधिकमास माहात्म्य अध्याय तिसावा