एकदंतावतारो वै देहिनां ब्रम्हाधारक:।
मदासुरस्य हंता स आखुवाहनग: स्मृत:।।
एकदंतावतार हा ब्रह्माधारक असून तो मदासुराचा वध करणारा आहे. त्याचे वाहन मूषक आहे. गुरू शुक्राचार्यांचे भाऊ महर्षी च्यवन यांचा मुलगा मद एकदा शुक्राचार्यांकडे आला. स्वत:ची ओळख करून देत त्याने ब्रह्मांडावर राज्य करण्याची इच्छा व्यक्त केली. शुक्राचार्यांनी त्याला आपला शिष्य बनविले आणि एकाक्षरी मंत्र त्याला दिला. मदाने त्यांना प्रणाम केला आणि तपश्चर्या करण्यासाठी जंगलात निघून गेला.
तिथे त्याने निरंकार तपश्चर्या सुरू केली. त्याची कठोर तपश्चर्या पाहून सिंहवाहिनी भगवती प्रकट झाली. तिने त्याला निरोगी आणि ब्रह्मांडावर राज्य करण्याचा वर प्रदान केला. मदासुर नंतर घरी आला. त्याने आपले नगर सुंदर आणि भव्य बनविले. दूरदूरचे पराक्रमी असुर या नगरीमध्ये येऊन राहू लागले. नंतर त्याने प्रमादसुराची कन्या सालसाशी विवाह केला. गुरू शुक्राचार्याने मदासुराला दैत्याधीशपदी नियुक्त केले.