बुलेटप्रुफ जॅकेट घातलेली एक तरूणी रशियाच्या दंगल नियंत्रक पोलिसांसमोर बसली आहे. तिच्या मांडीवर रशियन संविधानाचं एक पुस्तक आहे. पोलिसांसमोर ती हे पुस्तक मोठ-मोठ्याने वाचत आहे. त्यांच्यामागे मॉस्कोमध्ये पारदर्शक निवडणुका घेण्यासाठी आंदोलन सुरू आहे. यात काही लोक जखमीही झाले आहेत.
हा फोटो काही मिनिटांतच सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि 17 वर्षांची ओल्गा मिसिक रशियाच्या लोकशाही चळवळीचा चेहरा बनली. काही जणांनी याची तुलना 1989 मध्ये चीनची राजधानी बिजिंगमध्ये तियानानमेन स्क्वेअरला टँकसमोर उभ्या ठाकलेल्या टँकमॅनशी केली.
रशियातली स्थिती सध्या खूपच अस्थिर आहे, असं ओल्गाने बीबीसीला सांगितलं. प्रशासन सध्या खूपच घाबरलेलं आहे. ते देशातल्या विविध भागांतलं शांततापूर्ण निषेध आंदोलन चिरडण्यासाठी प्रचंड बळाचा वापर करत आहे. जसं की मी पाहू शकते, लोकही मानसिकरित्या बदलली आहेत.
येत्या सप्टेंबरमध्ये ड्युमा म्हणजेच रशियन संसदेसाठी होणाऱ्या निवडणुकांमध्ये अपक्ष उमेदवारांना अपात्र ठरवल्याबद्दल मॉस्कोमध्ये सातत्याने निषेध आंदोलनं होताना दिसत आहेत.
राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांच्याशी बांधील असलेल्या प्रशासनाने विरोधी उमेदवारांनी अर्जावर योग्यरित्या सही केली नसल्याचं सांगितलं आहे.
मॉस्को स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये पत्रकारितेचं शिक्षण घेण्याची इच्छा असलेल्या ओल्गाने सांगितलं, तिचं आंदोलन फक्त आगामी निवडणुकांबाबत नाही. सोव्हिएतनंतर संविधानात होत असलेला बदल तिला प्रकाशझोतात आणायचा आहे. यामध्ये रशियन नागरिकांच्या अधिकारांना अधिक महत्त्व होतं.
ती कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा देत नाही, असं ओल्गा सांगते. मी फक्त स्वतःसाठी आणि माझ्या लोकांसाठी आहे. माझी विरोधी पक्षनेत्याबाबतही तटस्थ भूमिका आहे. पण ते जे करत आहेत त्याला माझा पाठिंबा आहे.
पेंशन आंदोलन
ओल्गा मिसिक ही मॉस्कोच्या एका उपनगरात जन्मली आणि तिथंच लहानाची मोठी झाली. ती तिच्या कुटुंबातील दुसरी मुलगी. सत्य परिस्थिती मांडणारे, साम्राज्यवादी शासनाबाबद लिहिणाऱ्या जॉर्ज ऑरवेल आणि अल्डोस हक्सले यांच्यासारख्या लेखकांची पुस्तकं वाचायला तिला आवडतात.
शाळेत तिची कामगिरी चांगली राहिली. तिला चालू घडामोडींमध्ये जास्त रस आहे. पण गेल्या काही काळापासून तिला राजकारणामध्ये जास्त आवड निर्माण झाली. ती 16 वर्षांची असताना महिलांचं निवृत्तीचं वय 55 वरून 60 आणि पुरूषांचं निवृत्तीचं वय 60 वरून 65 करण्याच्या निर्णयाबाबत सोशल मीडियावर सुरू असलेलं आंदोलन तिनं पाहिलं. या आंदोलनात सहभागी होण्याची तिला प्रेरणा मिळाली.
मी स्वतः निवृत्तीच्या उंबरठ्यावर होते, असं काहीही नव्हतं. पण मला या निर्णयात अन्याय दिसला.
ओल्गा सांगते, मला त्यावेळी राजकारण्यांचा राग आला. कारण राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी स्वतः हे वय वाढवणार नसल्याचं आश्वासन दिलं होतं. त्यांनीच ऑक्टोबर 2018 मध्ये हा कायदा केला.
भूमिका घेतली
27 जुलै रोजी मॉस्कोच्या रस्त्यांवर एक अनधिकृत आंदोलन करणाऱ्या हजारो लोकांपैकी एक ओल्गा होती. डुमाच्या निवडणुकांमध्ये सहभागी घेण्यापासून उमेदवारांना रोखल्यानंतरचं हे आंदोलन होतं. यावेळी अनेक लोकप्रिय विरोधी नेत्यांना ताब्यातही घेण्यात आलं.
सुरक्षाकवच आणि काठ्या घेतलेल्या रशियन दंगल नियंत्रक पोलिसांच्या गराड्यात पायावर पाय ठेवून बसून तिने रशियाच्या 1993 च्या संविधानाचं पुस्तक काढलं आणि वाचू लागली.
"मी चार भाग वाचले," तिनं सांगितलं. "शांततापूर्ण आंदोलनाबाबत सांगणारं कलम मी वाचत होते. यामध्ये कोणालाही निवडणुकांत भाग घेता येतो. यामध्ये बोलण्याचा अधिकार आहे. लोकांची इच्छा आणि त्यांचं सामर्थ्य देशासाठी सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे." ओल्गा सांगते.
आंदोलनातले तिचे फोटो सोशल मीडियावर हजारोवेळा शेअर करण्यात आले आहेत. ओल्गा नंतर आंदोलन स्थळावरून निघाली पण तिला नंतर मेट्रो स्टेशनजवळ अटक करण्यात आली. 27 जुलै रोजी अटक केलेल्या 1 हजारपेक्षाही जास्त आंदोलकांपैकी ती एक होती.
मागच्या तीन महिन्यात तिला चारवेळा ताब्यात घेण्यात आलं आहे. प्रत्येकवेळी शांततापूर्ण पद्धतीने आंदोलन केल्याचं ती सांगते.
पोलिसांनी तिच्याशी वाईट वर्तन केलं नाही. पण ओल्गा आजारी असतानाही तिला डॉक्टर देण्यात आला नाही. अनधिकृत आंदोलनात सहभागी झाल्यामुळे ओल्गावर 20 हजार रुबल्सचा (305 डॉलर) दंड ठोठावण्यात आला. तिला 12 तासांनी बाहेर सोडण्यात आलं.
मी अपवाद
देशातील सर्वसामान्य तरूणीसारखी मी नाही, असं ओल्गा सांगते. रशियातील सामान्य तरूणी राजकीयदृष्ट्या इतक्या जागृत नाहीत. फक्त पत्रकारिता क्षेत्रात जाऊ इच्छिणाऱ्या तरूणींना राजकीय ज्ञान आहे. मी या तरूणींमध्ये एक अपवाद आहे.
राजकारणाबाबत मोकळेपणाने बोलण्याच्या सवयीमुळे त्रास होईल, अशी भीती ओल्गाला नाही. पण सध्या ती 18 वर्षांपेक्षा कमी वयाची आहे. अजूनही ती आपल्या पालकांवर अवलंबून आहे.
तिच्या आंदोलनाबाबत बोलण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते तिच्या पालकांना भेटायला आले होते. यामुळे तिचे पालक चिंताग्रस्त झाले. पण याच्यामुळे ती आंदोलनापासून दूर राहणार नसल्याचं ओल्गा सांगते.
ती सांगते, "देशाचं राजकीय भविष्य माझ्या हातात आहे. या काळाची मी साक्षीदार आहे."