बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद घेऊन निघालेल्या आदित्य ठाकरेंनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या उमेदवारी अर्जासोबत आदित्य ठाकरेंनी जे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे, त्यामध्ये त्यांनी आपल्या संपत्तीचे तपशील दिले आहेत.
आदित्य ठाकरेंच्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे 11 कोटी 38 लाख रुपयांची संपत्ती आहे.
निवडणुकीच्या मैदानात आज ठाकरे घराण्यातील पहिली व्यक्ती उतरत असून आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत.
मोठे शक्तीप्रदर्शन करत आदित्य ठाकरे निवडणूक अर्ज भरत आहेत. मोठ्या संख्येनं शिवसैनिक मराठमोळ्या वेशात आदित्य यांच्या मिरवणुकीत सहभागी झाले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला फोनवरून शुभेच्या दिल्याचं आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.
आदित्य ठाकरे यांच्या निवडणुकीच्या रिंगणात पदार्पणासाठी शिवसेनेने सेफ गेम खेळत वरळी विधानसभा मतदारसंघाचीच निवड केली आहे. 2009 चा अपवाद वगळता हा मराठीबहुल मतदारसंघ नेहमीच शिवसेनेसोबत राहिला आहे. 2014 साली येथून शिवसेनेचे सुनील शिंदे विजयी झाले होते. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सचिन अहिर यांनी वरळीचे प्रतिनिधित्व केले होते. हेच सचिन अहिर आता शिवसेनेत सामिल झाले आहेत. ही आदित्य ठाकरे यांच्यासाठी जमेची बाजू आहे.
तसंच 1990, 1995, 1999, 2004 अशा सलग चार वेळा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दत्ताजी नलावडे या मतदारसंघातून निवडून आले होते. त्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेला सुरक्षित वाटत असल्याने आदित्य ठाकरे यांच्यासाठी या मतदारसंघाची निवड करण्यात आली आहे.
आदित्य ठाकरे यांच्या उमेदवारीविषयी बोलताना शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, "आदित्य ठाकरे यांनी राज्याचं नेतृत्व करावं अशी आमची इच्छा आहे. महाराष्ट्रात त्यांनी जी जनआशीर्वाद यात्रा काढली त्याला प्रचंड यश मिळालं. राज्य त्यांच्याकडे अपेक्षेनं पाहतंय आणि आम्हाला खात्री आहे की निकाल असे लागतील की ईश्वर आणि नियतीचं त्यांच्या हातात राज्याची सूत्र देईल."
1966 मध्ये शिवसेनेच्या स्थापनेपासून ठाकरे कुटुंबातील कुणीही निवडणुकीच्या रिंगणात स्वतः उतरलं नव्हतं. ठाकरे कुटुंबीय निवडणूक लढवत नसल्यावरून विरोधक अनेकवेळा टीकाही करायचे. ठाकरे घराण्यातून कोणीही आत्तापर्यंत निवडणूक लढवलेली नसताना आदित्य मैदानात का उतरले यावर संजय राऊत सांगतात की, "बाळासाहेब ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे होते.
निवडणूक लढवायची नाही ही त्यांची भूमिका होती आणि उद्धव ठाकरे यांनीही त्यांची भूमिका स्वीकारली की निवडणूक लढवायची नाही. आम्ही ज्या भूमिका घेऊन जातो त्या भूमिका भविष्यानुसार बदलाव्या लागतात. सध्याच्या परिस्थितीत राज्याचं नेतृत्व ठाकरेंनी करायचं हे जर आम्ही मान्य केलं, तर त्यासाठी एक ठाकरे विधानसभेत हवेत, मुख्यमंत्री व्हावेत किंवा त्यापेक्षा वरच्या पदावर जावेत असा आमचा विचार आहे. कधी तरी इतिहास घडवण्यासाठी मागचा इतिहास थोडा थांबवावा लागतो. बाळासाहेबांनी इतिहास घडवला. आता ही पुढची पिढी आहे. आम्हाला असं वाटतं की या पिढीनं राज्याचं नेतृत्व प्रत्यक्ष करावं, उंटावरून शेळ्या न हाकता."
'फ्री प्रेस जर्नल'चे राजकीय संपादक प्रमोद चुंचूवार सांगतात आदित्य ठाकरेंनी शिवसेनेचं पारंपरिक राजकारण बदलण्याचा प्रयत्न केला "आदित्य हा नवीन पिढीचा माणूस आहे. आदित्यनं शिवसेनेच्या अनेक पारंपरिक गोष्टी बदलण्याचा प्रयत्न केला. व्हॅलेंटाईन्स डेला शिवेसेनेचा विरोध आदित्यचा प्रवेश झाल्यानंतर मावळला. नाईट लाईफबाबत आदित्यने आग्रह धरला. ठिकठिकाणी पक्षाची भूमिका बदलण्यास भाग पाडलं.