Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अग्निवीर अमृतपाल सिंग यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला नाही कारण...

amrutpal singh
, सोमवार, 16 ऑक्टोबर 2023 (19:03 IST)
BBC
पंजाबमधील अग्निवीर अमृतपाल सिंग यांच्या मृत्यूवरून राजकारण चांगलंच तापलंय. अमृतपाल सिंग यांना 'लष्करी मानवंदना' दिली न गेल्याच्या मुद्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
 
बुधवार, 11 ऑक्टोबर रोजी अग्निवीर अमृतपाल सिंग यांचा जम्मू-काश्मीरमध्ये कर्तव्यावर असताना मृत्यू झाला होता.
 
त्यानंतर त्यांना भारतीय लष्करातर्फे 'लष्करी मानवंदना' दिली गेली नाही आणि त्यांचे पार्थिव लष्करी इतमामात गावी पाठवण्यात आलं नाही.
 
त्याऐवजी त्यांचा मृतदेह खासगी रुग्णवाहिकेतून पंजाबला आणण्यात आला.
 
मात्र, भारतीय लष्कराने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात अग्निवीर अमृतपाल सिंह यांचा त्यांच्याच गोळीने मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे.
 
निवेदनात पुढे म्हटलंय की, "अग्निवीरच्या युनिटने भाड्याने घेतलेल्या नागरी रुग्णवाहिकेत नेमणूक केलेला एक कनिष्ठ अधिकारी आणि इतर चार वेगळ्या दर्जाच्या अधिकाऱ्यांसह मृतदेह नेण्यात आला होता. अंत्यसंस्कारासाठी लष्कराचे चार जवानही त्यांच्यासोबत पाठवण्यात आले होते."
 
"स्वत:ला पोहaचवलेली इजा हे मृत्यूचे कारण आहे, त्यामुळे सध्याच्या धोरणानुसार, 'लष्करी मानवंदना' किंवा लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले नाहीत."
 
लष्कराने अमृतपाल सिंग यांना कोणताही लष्करी सन्मान न दिल्याने अमृतपाल सिंग यांच्या कुटुंबीयांनी स्थानिक पोलिसांना त्यांच्या मुलाला सन्मान देण्याची विनंती केली.
 
यानंतर स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांनी अमृतपाल यांना 'मानवंदना' दिली आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
 
बीबीसीचे प्रतिनिधी सुरिंदर मान यांनी अग्निवीर अमृतपाल सिंग यांच्या पालकांशी संवाद साधला.
 
'तुम्ही त्याला कापडात गुंडाळून का पाठवलं?'
अमृतपाल सिंग पंजाबमधील मानसा येथील कोटली गावचा रहिवासी होते.
 
सध्या त्यांच्या घरात शोकाकूल वातावरण आहे, मात्र या दु:खाबरोबरच कुटुंबीय आणि ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण देखील आहे.
 
अमृतपाल सिंग यांची आई राजविंदर कौर सांगतात, "माझ्या मुलाला गणवेश घालण्याची आवड होती. तो म्हणायचा की, सैनिक व्हायचंय, देशाचं रक्षण करायचंय."
 
"माझा सरकारला प्रश्न आहे, ज्या मुलाला गणवेश घालून मरण पत्करायचं होतं त्याला गणवेश का दिला गेला नाही?" त्याला कापडात गुंडाळून का पाठवण्यात आलं?" हे बोलताना त्यांचा कंठ दाटून आलेला.
 
आपल्या मुलाला असं पाहून त्यांच्या मनाला अतीव दु:ख झालं, असं त्यांच्या पालकांचं म्हणणं आहे.
 
राजविंदर कौर रडतच म्हणतात, "आमच्या मुलाचा कोणीही आदर केला नाही. आम्हाला विचाराल, तर तो आमच्या ह्रदयाचा तुकडा आहे.
 
 'बंद पेटीत माझा मुलगा मला सोपवण्यात आला'
अमृतपाल सिंग यांचे वडील गुरदीप सिंग यांनी सांगितले की, त्यांचा मुलगा सैन्यात दाखल होऊन फक्त 10 महिने झाले होते.
 
ते म्हणाले, "पहिल्यांदा आमच्या सरपंचांना ही माहिती मिळाली, मग त्यांनी संकोच करतच मला ही गोष्टी सांगितली. पण लष्कराची माणसं आल्यानंतरच मला हे समजलं."
 
सन्मान मिळाला नसल्याच्या मुद्द्यावर ते म्हणतात, "आमच्या गावकऱ्यांनी या गोष्टीला विरोध केला. मी घराच्या आत बसलो होतो आणि कोणत्या तोंडाने बाहेर येऊ हे मला कळत नव्हतं."
 
"पेटी माझ्याकडे आली, ती बंद केली आणि माझा मुलगा मला सोपवण्यात आला."
 
"मला सरकार आणि लष्कराबद्दल काहीही माहिती नाही. मी एक अशिक्षित माणूस आहे. मी माझा लहान मुलगा सैन्याकडे सोपवला. मी त्याला शहीद मानतो."
 
लष्करातून आलेले तीन कर्मचारी काहीही बोलले नाहीत आणि त्यांनी असं सांगितलं की "आम्हाला काहीही न सांगता पाठवण्यात आलेलं आहे."
 
अमृतपाल यांचे वडील सांगतात, "लष्करात भरती झाल्यानंतर तो माझा मुलगा राहिला नाही. माझ्या मुलाप्रमाणेच इतर मुलांचंही असंच झालं तर काय उपयोग."
 
अमृतपाल यांचा स्वतःच्याच गोळीने मृत्यू झाला - भारतीय लष्कर
भारतीय लष्कराने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात अग्निवीर अमृतपाल सिंह यांचा त्यांच्याच गोळीने मृत्यू झाल्याचे म्हटले आहे.
 
"एका दुर्दैवी घटनेत, अग्निवीर अमृतपाल सिंग यांचा राजौरी सेक्टरमध्ये कर्तव्यावर असताना स्वत: झाडलेली गोळी लागून मृत्यू झाला," असं भारतीय लष्कराच्या व्हाईट नाइट कॉर्प्सच्या अधिकृत 'एक्स' खात्यावर प्रसिद्ध झालेल्या निवेदनात म्हटलं आहे.
 
अधिक माहिती मिळवण्यासाठी न्यायालयीन चौकशी
निवेदनात पुढे म्हटलं आहे की, "अग्नीवीरांच्या युनिटने भाड्याने घेतलेल्या नागरी रुग्णवाहिकेत नेमणूक केलेला एक कनिष्ठ अधिकारी आणि इतर चार वेगळ्या दर्जाच्या अधिकाऱ्यांसह मृतदेह नेण्यात आला होता. अंत्यसंस्कारासाठी लष्कराचे चार जवानही त्यांच्यासोबत पाठवण्यात आले होते.
 
स्वत:ला पोहोचवलेली इजा हे मृत्यूचे कारण आहे, त्यामुळे सध्याच्या धोरणानुसार, 'लष्करी मानवंदना' किंवा लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले नाहीत."
 
"भारतीय लष्कराकडून शोकाकुल कुटुंबाप्रती तीव्र संवेदना व्यक्त करण्यात येत आहेत."
 
मुख्यमंत्र्यांची घोषणा
या संपूर्ण प्रकरणाबद्दल अमृतपाल यांच्या कुटुंबात प्रचंड संताप असून विविध राजकीय नेते केंद्र सरकारवर टीका करत आहेत.
 
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी याप्रकरणी तीव्र निषेध व्यक्त केलाय.
 
त्यांनी लष्कराच्या धोरणावर टीका करत, जो सन्मान इतर सैनिकांना दिला जातो तोच सन्मान पंजाब सरकार अमृतपाल सिंग यांना देईल, असं सांगितलंय.
 
त्यांच्या एक्स खात्यावर त्यांनी लिहिलंय की, "शहीद अमृतपाल सिंगजी यांच्या हौतात्म्याबाबत लष्कराचे धोरण काहीही असो, पंजाब सरकारचे धोरण प्रत्येक शहीदासाठी सारखेच असेल."
 
"शहीद अमृतपाल सिंग हे देशाचे शहीद आहेत. पंजाब सरकारकडून कुटुंबाला 1 कोटी रुपये मानधन दिले जाईल. केंद्र सरकारकडेही याबाब तीव्र नाराजी व्यक्त केली जाईल."
 
हरसिमरत कौर बादल काय म्हणाल्या?
या प्रकरणी भगवंत मानच नव्हे तर इतर राजकीय पक्षांच्या महत्त्वाच्या नेत्यांनीही निषेध व्यक्त केलाय.
 
शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल म्हणाल्या, "जम्मू-काश्मीरमध्ये कर्तव्य बजावत असताना शहीद झालेल्या अग्निवीर अमृतपाल सिंग यांच्यावर 'लष्करी मानवंदने'शिवाय अंत्यसंस्कार करण्यात आले, हे जाणून मला धक्का बसलाय. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना खाजगी रुग्णवाहिकेत आणले."
 
त्यांनी पुढे लिहिलंय की, “ते अग्निवीर असल्याने असं घडल्याची कल्पना आहे. आपण आपल्या सर्व तरुणांचा सारखाच सन्मान केला पाहिजे.”
 
यासोबतच त्यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना सर्व सैनिकांसाठी लष्करी सन्मानाचे आदेश जारी करण्याचं आवाहनही केलं आहे.
 
म्हणूनच योजना सुरू झाली - राजा वारिंग
पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष राजा वारिंग यांनी ही घटना लाजिरवाणी असल्याचं म्हटलंय.
 
त्यांनी अग्निवीर अमृतपाल सिंग यांना त्यांच्या एक्स खात्यावरून श्रद्धांजली वाहिली आणि म्हटलं, "हा आपल्या देशासाठी दुःखाचा दिवस आहे कारण अग्निवीर योजनेंतर्गत भरती झालेल्या या व्यक्तीला कोणत्याही 'लष्करी मानवंदने'शिवाय खाजगी रुग्णवाहिकेतून घरी परत पाठवण्यात आलं."
 
राजा वारिंग यांनी प्रश्न उपस्थित केला की, "अग्निवीर असणं म्हणजे त्यांचा जीव तितका महत्त्वाचा नाही का?"
 
वारिंग यांनी केंद्रातील भाजप सरकारवर निशाणा साधत, ही योजना का सुरू केली, असा सवाल केला.
 
ही योजना देशातील तरुणांवर अन्याय करणारी - अभय चौटाला
इंडियन नॅशनल लोकदलाचे नेते अभय चौटाला यांनीही या प्रकरणावर टीका केली असून, ही योजना देशाच्या सैनिकांसाठी अन्यायकारक असल्याचं आम्ही सुरुवातीपासून म्हणत आलोय, असं म्हटलंय.
 
अग्निवीर जवानांना त्यांच्या सेवेदरम्यान पूर्ण लष्करी दर्जा आणि सन्मान मिळणार की नाही, हे स्पष्ट करण्याची मागणी त्यांनी केंद्राकडे केली.
 
हे अग्निवीर योजनेचे वास्तव आहे - सुप्रिया श्रीनेत
काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेथ म्हणाल्या की, हे अग्निवीर योजनेचे वास्तव आहे.
 
"ते हुतात्मा आहेत - पण हेच अग्निवीर योजनेचे वास्तव आहे."

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाराष्ट्र : चिपळूणमधील उड्डाणपुलाला मोठा तडा, लोकांचा जीव धोक्यात