Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अजित पवार : माझा EVMवर विश्वास, नाना पटोलेंच्या वक्तव्यावर चर्चा होऊ शकते

अजित पवार : माझा EVMवर विश्वास, नाना पटोलेंच्या वक्तव्यावर चर्चा होऊ शकते
, गुरूवार, 11 फेब्रुवारी 2021 (19:01 IST)
महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिन (EVM) ऐवजी बॅलेट पेपरच्या वापराबद्दल चर्चा सुरू असताना, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी "माझा EVM वर विश्वास आहे," असं वक्तव्य केलं आहे.
 
मुंबईत पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले "EVM योग्य पद्धतीने सुरू आहे. पेपरलेस काम होतं."
 
काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष असताना, राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकीत मतदारांना ईव्हीएम व्यतिरिक्त मतपत्रिकेद्वारे देखील मतदान करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यासंदर्भात कायदा महाराष्ट्र विधिमंडळाने तयार करावा अशी सूचना केली होती.
सर्व कायदेशीर बाबींच्या अधिन राहून यासंदर्भात कायदा तयार करण्याच्या दृष्टीने तातडीने कारवाई सुरू करण्यात यावी अशा सूचना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष असताना विधी आणि न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.
 
EVM बाबत बोलताना अजित पवार म्हणाले, "त्यावेळी नाना पटोले विधानसभा अध्यक्ष होते. विधानसभेचे अध्यक्ष कोणत्या पक्षाचे नसतात. पटोले यांनी याबाबत आता वक्तव्य केलं तर, चर्चा होऊ शकते."
 
"EVM असतानाच कॉंग्रेसची सत्ता राजस्थान, पंजाबमध्ये आली. सर्वच राजकीय पक्षातील लोक चांगलं बहुमत मिळालं तर सगळं ठीक असतं. पण, खूप मोठ्या फरकाने हरले तर म्हणतात ईव्हीएम मॅनेज केलं," असं अजित पवार पुढे म्हणाले.
 
अजित पवारांच्या या भूमिकेमुळे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये वाद निर्माण होण्याची चिन्हं आहेत कारण काँग्रेसने अनेक वेळा ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
 
नाना पटोले हे विधानसभा अध्यक्ष असताना नागपूर येथील प्रदीप उके यांनी यासंदर्भात त्यांच्याकडे निवेदन आणि याचिका सादर केली होती. राज्यातील मतदानांना EVM द्वारे मतदान करण्याचा पर्याय उपलब्ध होणे, हा मतदाराचा अधिकार असल्याचं उके यांचे वकील अॅड. सतीश उके यांनी म्हटलं. तसंच वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनीही EVM ला अनेक प्रगत देशांनी नाकारलं असल्याचं सांगितलं होतं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

उदयनराजे भोसले – शरद पवारांनी मराठा आरक्षणात लक्ष घालावं नाहीतर उद्रेक होईल