Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अभिताभ बच्चन : 50 वर्षांपूर्वी अशी झाली रुपेरी पडद्यावरील प्रवासाला सुरुवात

अभिताभ बच्चन : 50 वर्षांपूर्वी अशी झाली रुपेरी पडद्यावरील प्रवासाला सुरुवात
, गुरूवार, 7 नोव्हेंबर 2019 (16:24 IST)
- वंदना
50 वर्षांपूर्वी एक हिंदी फिल्म रिलीज झाली. नाव होतं - सात हिंदुस्तानी
 
ख्वाजा अहमद अब्बास लेखक - दिग्दर्शक असलेल्या या फिल्ममध्ये उत्पल दत्त होते. साहित्य, पत्रकारिता आणि फिल्मी जगातलं हे एक मोठं नाव होतं. त्यांच्या सोबतच या फिल्ममध्ये होता एक नवखा उंच, शिडशिडीत मुलगा. नाव होतं - अमिताभ बच्चन.
 
तेव्हा हे नाव कोणालाही माहीत नव्हतं.
 
'ब्रेड ब्युटी रिव्होल्यूशन: ख्वाजा अहमद अब्बास' या आपल्या पुस्तकात दिग्दर्शक ख्वाजा अहमद अब्बास यांनी अमिताभसोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा लिहिला आहे. तो प्रसंग असा घडला होता-
 
ख्वाजा अहमद अब्बास : तुमचं नाव?
उत्तर : अमिताभ.
ख्वाजा अहमद अब्बास : या आधी सिनेमामध्ये काम केलंय का?
उत्तर : अजूनपर्यंत कोणी घेतलं नाही मला.
ख्वाजा अहमद अब्बास : तुमच्यात काय कमी आहे, असं वाटलं त्यांना?
उत्तर : (अनेक मोठी नावं घेत) सगळे म्हणतात, की त्यांच्या हिरोईनच्या दृष्टिनं मी फारच उंच आहे.
ख्वाजा अहमद अब्बास : आमच्या फिल्ममध्ये ही अडचण येणार नाही. कारण या फिल्ममध्ये हिरोईनच नाही.
जेव्हा फिल्मफेअरने अमिताभना केलं रिजेक्ट…
 
आपल्या फिल्मसाठी अब्बासना उंच, सडपातळ, सुंदर आणि उत्साही तरुणाची गरज होती. मुख्य म्हणजे त्याला अभिनयही यायला हवा होता.
 
ही गोष्ट 1969 पूर्वीची आहे. तेव्हा अमिताभ बच्चन कोलकत्याच्या 'बर्ड अँड को' कंपनीत काम करायचे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ऑफिसचं काम केल्यानंतर संध्याकाळी नाटकात काम करायचे. अमिताभना अॅक्टिंगचा नाद लागलेला होता.
 
काही वर्षांपूर्वी अमिताभनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिलं होतं, "फिल्मफेअर - माधुरी मासिकाच्या स्पर्धेसाठी मी फोटो पाठवला होता. फिल्ममध्ये काम करू इच्छिणाऱ्यांसाठी हे एक चांगलं व्यासपीठ होतं. माझा फोटो रिजेक्ट झाला, यात काही नवल वाटण्यासारखं नव्हतं."
 
पण सिनेमासृष्टीतच आपलं नशीब आजमावायचं अमिताभने ठरवलं होत. कोलकत्यातील आपली चांगली नोकरी सोडून ते मुंबईत दाखल झाले. त्याच काळात के ए अब्बास गोव्याच्या स्वातंत्र्य संग्रामावर आधारित 'सात हिंदुस्तानी' या चित्रपटावर काम करत होते. एकमेकांपेक्षा अगदी वेगळ्या असणाऱ्या सात नायकांची त्यांना गरज होती.
 
यातीस एका भूमिकेसाठी अब्बास यांनी नवख्या टीनू आनंदला घेतलं होतं. त्यांचा मित्र आणि प्रसिद्ध लेखक इंदर राज यांचा हा मुलगा. टीनू आनंदची एक मैत्रीण - नीना सिंह मॉडेल होती. तिला सातवा हिंदुस्तानी म्हणून घेण्यात आलं. अमिताभ बच्चन यासगळ्यात कुठेच नव्हते.
 
दिग्दर्शक आणि अभिनेते टीनू आनंद यांनी मीडियाशी बोलताना अनेकदा हा किस्सा सांगितलेला आहे. "झालं असं, की मला सत्यजित रे यांचा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. तसंही हा रोल मी हौस म्हणून करत होतो. त्यामुळे हा रोल सोडून मी कोलकात्याला जायचं ठरवलं. त्या दरम्यानच माझ्या मैत्रिणीने तिच्या कोलकत्याच्या एका मित्राचा फोटो सेटवर दाखवला. अब्बास तसे रागीट होते. तो फोटो अब्बासना दाखवावा अशी विनंती नीनाने मला केली आणि मग त्या नवीन मुलाला सेटवर बोलवण्यात आलं."
 
आपल्या पुस्तकातल्या एका लेखात अब्बास म्हणतात, "मी 5000 रुपयांपेक्षा जास्त पैसे देऊ शकत नसल्याचं अमिताभला भेटल्यावर सांगितलं. अमिताभच्या चेहऱ्यावर थोडीशी नाराजी होती. मी विचारलं, नोकरीत जास्त पैसे मिळत होते का? उत्तर आलं, "हो, दरमहा 1600 रुपये"
 
"तुला रोल मिळेल की नाही याची खात्री नसताना अशी नोकरी सोडून का आलास?" मी विचारलं. अमिताभने आत्मविश्वासाने सांगितलं, "माणसाला असा धोका पत्करावाच लागतो." हा आत्मविश्वास पाहूनच मी म्हटलं, की हा रोल तुझा. अशा प्रकारे अमिताभ बच्चनना त्यांची पहिली फिल्म 'सात हिंदुस्तानी' मिळाली.
 
हरिवंशराय बच्चन यांचा मुलगा ही ओळख
या फिल्मसाठीचा करार लिहिला जात असताना अमिताभनी आपलं पूर्ण नाव सांगितलं - अमिताभ बच्चन, वडिलांचं नाव - डॉ. हरिवंशराय बच्चन.
या आधी अमिताभनी अब्बास यांना फक्त स्वतःचं नाव सांगितलेलं होतं.
पण हिरवंशराय बच्चन यांचं नाव ऐकताच अब्बास सटपटले. हरिवंशराय तेव्हाचे प्रसिद्ध कवी होते आणि अब्बास त्यांना ओळखायचे.
डॉ. हरिवंशराय बच्चन यांच्यासोबत कोणताही गैरसमज होऊ नये, असं अब्बास यांना वाटत होतं. म्हणूनच अब्बास यांनी तुमचा मुलगा फिल्ममध्ये काम करणार आहे, असं सांगणारा टेलिग्राम हरिवंशरायना पाठवायला सांगितला.
दोन दिवसांनी त्यांचं उत्तर आल्यानंतरच सात हिंदुस्तानीसाठीच्या करारावर सह्या करण्यात आल्या.
15 फेब्रुवारी 1969 ला अमिताभ यांनी साईन केलेला हा पहिला सिनेमा. 7 नोव्हेंबर 1969ला रिलीज झाला.
योगायोग म्हणजे ज्या नीना सिंह यांनी अमिताभचं नाव सुचवलं आणि ज्या टीनू आनंद यांनी अब्बास यांच्याकडे हा प्रस्ताव मांडला, त्या दोघांनाही ही फिल्म करता आली नाही.
शूटिंगचं एक शेड्यूल झाल्यानंतर नीना मुंबईला परतल्याच नाहीत आणि टीनू आनंद त्यांचा रोल सोडून सत्यजीत रे यांचे सहाय्यक होण्यासाठी गेले.
 
आठवडाभर केली नव्हती आंघोळ
या फिल्मच्या शूटिंगचे किस्सेही रंजक आहेत. एका महिला क्रांतिकारकाच्या गोष्टीतून ही कथा उलगडते. हॉस्पिटलमध्ये असलेली ही महिला जुन्या दिवसांना उजाळा देत गोष्ट सांगते. देशातल्या वेगवेगळ्या भागातल्या, धर्मांच्या साथीदारांनी एकत्र येऊन गोव्याला कशाप्रकारे पोर्तुगीजांपासून मुक्त केलं, याची ही गोष्ट होती. यात बिहारच्या अन्वर अली या मुसलमान तरुणाची भूमिका अमिताभ करत होते. फिल्मचं बजेट कमी होतं आणि प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट पंढरी जूकर एकही पैसा न घेता ही फिल्म करायला तयार झाले होते. पण ते खूप व्यग्र होते.
 
अब्बास यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी अमिताभनी हा किस्सा सांगितला होता. "फिल्मचं शूटिंग गोव्यात होतं. जूकर यांनी सांगितलं, की माझ्याकडे शूटिंगच्या एक आठवडा आधीच वेळ आहे. म्हणून मग मी एक आठवडा आधी येऊन अमिताभची दाढी लावून जाईन. तेव्हा मेकअपचं काम तितकं विकसित नव्हतं. एकेक केस जोडून दाढी तयार केली जाई. मग मी एक आठवडाभर दाढी लावून फिरत होतो. दाढी निघू नये म्हणून आठवडाभर आंघोळही केली नव्हती."
 
या फिल्ममधल्या अमिताभच्या कामाचं खूप कौतुक झालं. एका नवख्या कलाकाराच्या दृष्टीने ही कठीण भूमिका होती.
 
'हा मुलगा सुपरस्टार बनेल, असं वाटलं नव्हतं'
फिल्ममधलं एकमेव स्त्री पात्र शहनाज या अभिनेत्रीने वठवलं होतं. बीबीसीशी बोलताना त्यांनी सांगितलं, "त्यांचा आवाज चांगला होता पण तेव्हा त्यांच्याकडे पाहून मला असं अजिबात वाटलं नव्हतं, की हा उंच - सडपातळ माणूस एक दिवस सुपरस्टार बनेल. सेटवर ते अगदी शांत असत. फिल्ममध्ये पोर्तुगीज त्यांचा छळ करत आहेत, असा एक सीन होता. त्यांचे पाय जखमी आहेत आणि ते सरपटत आहेत. हा सीन त्यांनी केल्यावर सेटवरच्या सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. तेव्हा मला जाणवलं, की हा मुलगा खूप पुढे जाईल."
 
याच शहनाज यांच्यासोबत टीनू आनंद यांनी लग्न केलं. सात हिंदुस्तानी सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता.
 
ही फिल्म करताना अब्बास यांना एक प्रयोग केला होता. कलाकार ज्या राज्याचा आहे त्यापेक्षा अतिशय वेगळी भूमिका तो वठवत होता. म्हणूनच मग बंगालचे हिरो उत्पल दत्त यांना पंजाबी शेतकरी करण्यात आलं. मल्याळी हिरो मुध हे बंगाली झाले. मॉर्डन दिसणाऱ्या जलाल आगा यांना ग्रामीण मराठी पात्र देण्यात आलं. अभिनेता अन्वर अली (महमूद यांचा भाऊ) यांना एका आरएसएस कार्यकर्त्याची भूमिका देण्यात आली ज्याला ऊर्दूचा तिटकारा आहे. आणि अमिताभ हिंदी न आवडणारे ऊर्दू शायर होते.
 
पहिल्या फिल्ममध्ये हिंदीचा तिटकारा असणारं पात्र वठवणारा हा तरूण अभिनेता पुढे जाऊन हिंदी फिल्म्सचा शहेनशाह झाला. शहेनशाहा अमिताभ बच्चनच्या याच पहिल्या फिल्मला आज 50 वर्षं पूर्ण झाली आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शिवसेनेची ठाम भूमिका…जे ठरलंय…ते व्हावं !