भारताचे लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी गुरुवारी (3 फेब्रुवारी) एका ऑनलाईन सेमिनारमध्ये राष्ट्रीय सुरक्षेवर चर्चा केली. यावेळी ते चीन आणि पाकिस्तानमुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांबद्दल बोलले.
ते म्हणाले, "भविष्यात होणाऱ्या संघर्षांची काही उदाहरणं भारत पाहत आहे. विरोधी देश त्यांचं लक्ष्य साधण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहतील."
जनरल नरवणे पुढे म्हणाले, "भारत अनेक प्रकारच्या आव्हानांचा सामना करत आहे. आम्हाला उत्तरेकडील सीमेवर आधुनिक तंत्रज्ञानाने सक्षम दलांना तैनात करण्याची आवश्यकता आहे,"
चीन आणि पाकिस्तानचं नाव न घेता ते म्हणाले, अण्वस्त्रधारी शेजारी, सीमा वाद आणि राज्य प्रायोजित प्रॉक्सी वॉर तसंच सुरक्षा तंत्रज्ञानासह संसाधनांसमोरील आव्हानं वाढली आहेत.
"भविष्यात होणाऱ्या संघर्षांचं ट्रेलर आपण पाहत आहोत. सूचना क्षेत्र, नेटवर्क आणि सायबर स्पेसमध्येही आम्हाला हे दिसून येत आहे. वादग्रस्त आणि सक्रिय सीमांवरही हा खेळ खेळला जात आहे."असंही ते म्हणाले.
"आपण आपल्या आजूबाजूला पाहिलं तर वास्तव काय आहे हे आपल्या लक्षात येईल. आपल्याला जी उदाहरणं दिसत आहेत त्याआधारावर भविष्यासाठी आपल्याला युद्धासाठी मैदान तयार करावं लागेल,"
लष्कर प्रमुखांनी उत्तरेकडील सीमांवर सुरू असलेल्या घटनाक्रमांचाही उल्लेख केला.देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडता राखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज सुरक्षा दलांची गरज असल्याचंही ते यावेळी म्हणाले.
ते पुढे म्हणतात, "आपले विरोधी राजकीय, लष्कर आणि आर्थिक क्षेत्रात संदिग्ध हालचाली करून आपले लक्ष्य साध्य करण्याचा प्रयत्न सुरू ठेवतील."
पूर्व लडाखमधील चकमक
पूर्व लडाखमधील लष्करी चकमकीचा संदर्भ देताना ते म्हणाले, "2020 मधील घटना सर्व प्रदेशांमध्ये विविध प्रकारच्या सुरक्षा धोक्यांचे साक्षीदार आहेत. या घटनांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ग्रे-झोन युद्धाकडे लक्ष वेधले आहे. आम्हाला संपर्क रहित आणि समोरासमोर युद्धासाठी क्षमता वाढवण्याची गरज आहे."
संपर्क रहित युद्ध प्रणाली लढण्याचे नवीन तंत्रज्ञान आहे. यात पारंपरिक शस्त्रांऐवजी आधुनिक शस्त्रांचा वापर केला जातो. यामुळे शत्रुच्या सीमेत प्रवेश न करताच त्याला नुकसान पोहचवले जाऊ शकते अशीही माहिती त्यांनी दिली.
'नॉन स्टेट एक्टर्स'
अप्रत्यक्षपणे चीनचा संदर्भ देत ते म्हणाले, "काही देश जागतिक स्तरावर स्वीकृत मानदंड आणि नियमांवर आधारित आदेशाला आव्हान देत आहेत. आक्रमकता आणि संधीसाधूपणा करक स्थिती बदलण्याच्या कृती अनेक मार्गांनी केल्या जात आहे."
अफगाणिस्तानमधील घटनाक्रमाने पुन्हा एकदा प्रॉक्सी आणि 'नॉन स्टेट एक्टर्स' प्रभावावर लक्ष केंद्रीत केलं आहे असंही ते म्हणाले.
"'नॉन स्टेट एक्टर्स' हे स्थानिक परिस्थितीचा फायदा घेतात. ते अशी परिस्थिती उत्पन्न करतात ज्यामुळे देश आपल्या क्षमतांचा वापर करू शकत नाही."
लष्कराचे तिन्ही दल एकत्र मिळून कटिबद्ध योजनांवर काम करत आहेत. भारतीय लष्कर दलांची पुनर्रचना आणि पुनर्संतुलित करण्यावर भर देत आहे. ही प्रक्रिया यापूर्वीच सुरू झाली आहे.