आर्यन खान प्रकरणी समीर वानखेडे यांच्यावर झालेल्या आरोपांची आता चौकशी सुरू करण्यात आली आहे. NCB चे उपसंचालक ज्ञानेश्वर सिंग यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना याची माहिती दिली आहे.
"NCBच्या महासंचालकांना यासंदर्भातील अहवाल प्राप्त झाला आहे. त्यांनी या प्रकरणी NCBच्या अंतर्गत दक्षता विभागाला चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांच्याकडून या प्रकरणाची योग्य चौकशी केली जाईल. ही चौकशी नुकतीच सुरू झाली आहे. सध्या त्याबाबत जास्त काही माहिती देता येणार नाही," असं ज्ञानेश्वर सिंग यांनी म्हटलंय.
साईल यांनी घेतली पोलिसांची भेट
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील स्वतंत्र साक्षीदार प्रभाकर साहिल यांनी सोमवारी मुंबई पोलीसांच्या क्राईम ब्रांचच्या सहआयुक्तांची भेट घेतली.
क्राईम ब्रांचच्या सहआयुक्त मिलिंद भारंबे यांची साहिल यांनी भेट घेतली.
दरम्यान समीर वानखेडे यांनी मुंबई सेशन्स कोर्टात स्वतंत्र प्रतिज्ञापत्र दाखल केलंय. स्पेशल NDPS कोर्टात त्यांनी हे प्रतिज्ञापत्र दाखल केलंय. त्यात त्यांच्यावर खोटे आरोप झाल्याची माहिती त्यांनी कोर्टाला दिली आहे.
शिवाय स्वतंत्र साक्षीदार प्रभाकर साईल यांनी केलेल्या आरोपांची माहिती देणारं आणि त्यांनी त्यांची साक्ष फिरवल्याचा दावा करणारं वेगळं प्रतिज्ञापत्र NCBनं कोर्टात सादर केलं आहे.
रविवारी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत त्यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यापासून धोका असल्याची प्रतिक्रिया दिली होती.
प्रभाकर साहिल यांनी प्रतिज्ञापत्रात नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोवर खंडणी वसूल करण्याचा आरोप केला आहे. त्यामुळे मुंबई पोलीस प्रभाकर साईल यांच्याकडून आरोपांबद्दल माहिती घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत मुंबई पोलीस चौकशी सुरू करण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाराष्ट्र सरकार प्रभाकर साईल यांच्या आरोपांबद्दल पुढे काय कारवाई करते यावर सर्वांचं लक्ष आहे.
दरम्यान संजय राऊत यांनी केलेल्या एका ट्वीटमुळे चर्चा सुरू झाली आहे.
कोणत्याही चौकशीला तयार - वानखेडे
"काही जण मला वैयक्तिकरित्या लक्ष्य करत आहेत. माझ्यावर आणि माझ्या कुटुंबियांवर सतत आरोप केले जात आहेत. आजही माझे काही खाजगी फोट लिक करण्यात आलेत. माझ्या आजवरच्या कारकिर्दीत मी कधीही चुकीचं वागलेलो नाही. माझ्यावरील सर्व आरोप निराधार असून मी कोणत्याही चौकशीला सामोरा जायला तयार आहे," असं समीर वानखेडे यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात म्हटलंय.
प्रभाकर साईल यांनी केलेले आरोप खोटे आणि बिनबुडाचे आहेत. तसंच NCB ची प्रतिमा मलिन करण्यासाठी त्यांच्याकडून आरोप केले जात असल्याचा दावा NCBने त्यांच्या प्रतिज्ञापत्रात केला आहे.
"गुन्ह्याची चौकशी सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी साईल यांनी त्यांचं प्रतिज्ञापत्र दाखल केलंय. त्यामुळे त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण झाले आहेत. तसंच साक्षीदाराने हे प्रतिज्ञापत्र कूहेतूने दाखल केलंय," असं NCBने त्यांच्या प्रतिज्ञापत्रात म्हटलंय.
NCB वर खंडणी वसूल करण्याचे आरोप करणं म्हणजे चौकशीत अडथळा आणण्याचा प्रयत्न आहे, असंसुद्धा त्यांनी म्हटलंय.
खोट्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न - समीर वानखेडे
"मला असा संशय आहे की मला खोट्या प्रकरणात गुंतवण्यासाठी काही लोक प्रयत्न सुरू केले आहेत," अशी चिंता एनसीबीचे मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे यांनी व्यक्त केलीय. त्यांनी तसं पत्र मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांना लिहिलं आहे.
"ड्रग्ज प्रकरणात झालेल्या आरोपांच्या चौकशीसाठी NCB पोलीस महासंचालकांना माझ्या वरिष्ठांनी पत्र पाठवलंय. मला जेलमध्ये टाकण्याची आणि सेवेतून काढून टाकण्याची धमकी देण्यात आलीय," असं समीर वानखेडेंनी पत्रात म्हटलंय.
तसंच, "माझी तुम्हाला विनंती आहे की खोट्या प्रकरणात कारवाई करू नये," असंही वानखेडे म्हणालेत.