"उदयनराजेंनी या मतदारसंघातून लाखोंच्या फरकानं विजय मिळवला आहे. आजच्या तरुणाला राजाचं वेड आहे. क्रेझ आहे. पण या राजानं घर बदललं आहे हे त्यांना आवडलंय का, ते पाहायला हवं आहे. श्रीनिवास पाटलांची IAS अधिकारी, पवारांचा भक्त अशी फार चांगली इमेज आहे. नेहमीचे मतदार नक्कीच त्यांच्या बाजूने जातील," असं संजय जोग यांनी सांगितलं.
सचिन परब यांच्या मते, "मतदारसंघाचं राजकीय शहाणपण आहे, ते सांगतात की श्रीनिवास पाटील चांगले उमेदवार आहेत. पण दुसरीकडे पाहिलं, तर भाजपची ही अत्यंत महत्त्वाची सीट आहे. त्यांना उदयनराजेंना निवडून आणावं लागेल. ते जर जमलं नाही, तर त्यांना पश्चिम महाराष्ट्राचं किंवा मराठा मतदारांचं जे गणित करायचं आहे ते कोसळेल. त्यामुळे ही जागा कोणाची हे प्रेडिक्ट करणं अजिबात सोपं नाहीये."
किरण तारे सांगतात, "उदयनराजेंचा प्रभाव कमी होत चाललाय असं लोकसभेसाठी म्हणणारे भाजपचे लोकच आता उदयनराजेंसाठी काम करणारेत. हा विरोधाभास मोठा आहे. शरद पवार स्वतः निवडणूक लढणार असतील तर मी लढणार नाही, हे उदयनराजेंचं स्टेटमेंट आलं तेव्हा ते एक पाऊल मागे आल्याचं चित्रं उभं राहिलं. त्यांचं मताधिक्य कमी होत चाललंय पण तरी ते हरतील असं वाटत नाही."