जगभरात कोरोना साथीमुळे सध्या सोशल डिस्टन्सिंगची चर्चा आहे. कोणत्याही परिस्थितीत गर्दीत जाणं टाळावं असं प्रशासनाकडून सांगितलं जातं. पण दुसरीकडे इस्राईलमध्ये याच काळात एका कार्यक्रमात तुफान गर्दी होऊन चेंगराचेंगरीची घटना घडली आहे.
या चेंगराचेंगरीत किती जणांचा मृत्यू झाला याबाबत आकडेवारी सरकारने अद्याप अधिकृतपणे जाहीर केलेली नाही. मात्र, स्थानिक माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार सुमारे 44 जणांचा यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
कोरोना साथीनंतर इस्राईलमध्ये होत असलेला हा सर्वात मोठा धार्मिक कार्यक्रम होता. याठिकाणी हजारोंची गर्दी जमा झाली होती.
इस्राईलचे राष्ट्राध्यक्ष नेतान्याहू यांनी या घटनेला 'मोठी आपत्ती' असं संबोधलं. यामध्ये जखमी झालेल्या लोकांसाठी आपण प्रार्थना करत आहोत, असंही नेतान्याहू म्हणाले.
इस्राईलच्या मेगेन डेविड एडॉम (MDA) या संस्थेमार्फत राष्ट्रीय आपत्कालीन सेवेचं काम केलं जातं. MDA ने चेंगराचेंगरीत अनेकांना आपले प्राण गमवावे लागल्याचं मान्य केलं. पण त्यांनीही अधिकृत आकडेवारी समोर ठेवली नाही.
हारेत्ज या स्थानिक वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार या अपघातात 44 जणांचा मृत्यू झाला आहे. काहीजण हा आकडा 38 तर काही जण 39 सांगत आहे.
नेमकं काय घडलं?
ईशान्य इस्राईल परिसहरातील माऊंट मेरॉन पर्वताखाली वसलेल्या मेरॉन शहरात ज्यू नागरिक बोमर हा उत्सव साजरा करतात.
याठिकाणी दुसऱ्या शतकातील ज्यू संत रब्बी शिमॉन बार योचाई यांची कबर आहे. ज्यू धर्मीयांमध्ये हे अतिशय महत्त्वाचं धार्मिक क्षेत्र म्हणून ओळखलं जातं.
बोमर उत्सवादरम्यान भाविक मेरॉन येथे जमा होतात. येथे शेकोटी पेटवून त्याभोवती नाचतात, गातात आणि प्रार्थना करतात.
गेल्या वर्षी कोरोना साथीमुळे हा कार्यक्रम रद्द करण्याता आला होता. पण यंदाच्या वर्षी परिस्थिती नियंत्रणात आल्याने इस्राईलने याला परवानगी दिली होती.
टाईम्स ऑफ इस्राईलने दिलेल्या बातमीनुसार, "गुरुवारी रात्रीच्या वेळी बोमर उत्सवात एक लाख लोक सहभागी झाले. अनेकजण शुक्रवारी उत्सवात दाखल होणार होते.
दरम्यान, त्याठिकाणी एक छोटीशी इमारत कोसळली आणि गोंधळ माजला. एका ठिकाणी लोक पायऱ्यांवरून खाली पडले. त्यामुळे खाली सगळी मागणं एकामागून एक खाली पडत गेली, असं पोलिसांनी होरेत्झ वृत्तपत्राला सांगितलं.
इंटरनेटवर या घटनेशी संबंधित एक व्हीडिओ पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये लोकांची गर्दी आणि माजलेला गोंधळ पाहता येऊ शकतो.
एका ज्यू धार्मिक वेबसाईटच्या प्रतिनिधीशीही बीबीसीने संवाद साधला. एका छोट्याशा गल्लीतून हजारोंच्या संख्यने नागरिक पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते. याच गर्दीतून नंतर चेंगराचेंगरी होत गेल, असं ते म्हणाले.
या ठिकाणी सुरुवातीला अधिकाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक नियमही लावले होते. पण नंतर गर्दी प्रचंड वाढल्याने नियमावलीचा फज्जा उडाल्याचं दिसून आलं.