Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ब्रेस्ट कॅन्सर : स्तनांची घरच्या घरी कशी तपासणी कशी करायची?

ब्रेस्ट कॅन्सर : स्तनांची घरच्या घरी कशी तपासणी कशी करायची?
, गुरूवार, 4 फेब्रुवारी 2021 (18:56 IST)
मयांक भागवत
बीबीसी मराठी
 
घरच्याघरी स्तनांची तपासणी शक्य आहे. असं तुम्हाला कोणी सांगितलं तर, तुमचा विश्वास बसणार नाही.
 
अनेक लोकांना तर स्तनांची तपासणी म्हणजे काय? याबद्दलही माहिती नसते.
 
स्वत:च स्तनांची तपासणी कशी करायची? खरंच असं करता येतं? हे कसं शक्य आहे? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील.
 
4 फेब्रुवारी, जागतिक कॅन्सर दिनाच्या निमित्ताने स्तनांची तपासणी कशी करायची याची माहिती आम्ही देणार आहोत.
 
'Self-Breast Examination' म्हणजे काय?

सोप्या शब्दात सांगायचं तर, स्वत:च स्वत:च्या स्तनांची तपासणी करणं म्हणजे 'Self-Breast Examination'.
 
कॅन्सरतज्ज्ञांच्या मते, घरच्या-घरी अत्यंत सोप्या पद्धतीने काही मिनिटात महिला आणि पुरूष 'Self-Breast Examination' करू शकतात.
 
फोर्टिस हॉस्पिटलच्या कन्सल्टंट मेडिकल ऑन्कोलॉजी विभागाच्या डॉ. उमा डांगी सांगतात, "स्तनांमध्ये अचानक बदल झालाय का? स्तनांमध्ये काही वेगळेपण आहे का? याची तपासणी म्हणजे 'Self-Breast Examination'.
 
स्तनांची तपासणी का महत्त्वाची?

भारतात महिलांमध्ये प्रामुख्याने आढळून येतो तो स्तनांचा कॅन्सर. भारतात गेल्या 20 वर्षांत स्तनांच्या कॅन्सरने ग्रस्त महिलांची संख्या वाढतेय.
 
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, भारतातील एकूण कॅन्सरग्रस्त महिलांच्या संख्येत ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण 25 ते 30 टक्के आहे.
 
मुंबईच्या नानावटी रुग्णालयाचे कॅन्सर सर्जरी विभागप्रमुख डॉ. संजय दुधाट सांगतात, "20 ते 40 वर्ष वयोगटातील महिलांमध्ये स्तनांच्या कॅन्सरचं प्रमाण वाढतंय. या मुली-महिलांमध्ये स्वत:च्या स्तनांची तपासणी कशी करायची याबाबत जागरुकता नाही. कॅन्सरच्या लवकर निदानासाठी 'Self-Breast Examination' महत्त्वाचं आहे."
 
केंद्र सरकारने लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार, 2018 मध्ये देशात 1 लाख 59 हजार स्तनाच्या कॅन्सरचं निदान झालं होतं. 2016 च्या तुलनेत ब्रेस्ट कॅन्सरग्रस्तांची संख्या 17 हजारांनी वाढली.
 
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीप्रमाणे, "स्वत:च स्तनांची तपासणी केल्याने स्तनांच्या कॅन्सरचं निदान लवकर होण्यास मदत मिळते."
 
स्वत:च्या स्तनांची तपासणी कशी करायची?

स्तनांची तपासणी करण्याचे दोन प्रकार आहेत. आरशासमोर उभं राहून किंवा झोपून आपण स्तनांची तपासणी करू शकतो.
 
डॉ. उमा डांगी यांनी 'Self-Breast Examination' कशी करायची याची माहिती दिली.
 
स्तनांचा आकार, रंग बदलला आहे का हे पहाणे.
स्तनांना सूज येणं, स्तन लाल होणे, व्रण आले आहेत का याकडे लक्ष द्या.
स्तनाग्रांची (निपल) जागा बदलली आहे का हे पाहा?
निपल आतील बाजूस गेले असतील तर लक्ष देणं गरजेचं आहे.
निपलमधून पाणी, रक्त किंवा पिवळ्या रंगाचा पदार्थ येतो का याकडे लक्ष ठेवा.
हाताच्या तीन बोटांनी स्तनांच्या वर, खाली, डाव्या-उजव्या बाजूला आणि त्यानंतर गोलाकार पद्धतीने पूर्ण स्तनांवर हात फिरवून पाहा
तीन बोटांच्या मदतीने काखेत हळूवार दाब द्या.

केव्हा करावी स्तनांची तपासणी?

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, स्तनांची तपासणी यावेळी करावी,
 
मासिक पाळीनंतर चार-पाच दिवसांनी करावी.
स्तन सॉफ्ट किंवा मऊ असताना करावी.
जेणेकरून स्तनांची तपासणी योग्य पद्धतीने होऊ शकते
 
याबाबत बीबीसी मराठीशी बोलताना मुंबईच्या अपोलो स्पॅक्ट्रा रूग्णालयातील सल्लागार ब्रेस्ट कॅन्सर सर्जन डॉ. संदीप बिपटे म्हणाले, "स्तनांच्या तपासणीसाठी फक्त तीन ते पाच मिनिटं वेळ लागतो. मासिक पाळी सुरू असलेल्या महिलांनी, पाचव्या किंवा सहाव्या दिवशी. तर मासिक पाळी बंद झालेल्यांनी महिन्यातून एकदा ब्रेस्ट तपासणी करणं आवश्यक आहे."
 
'मी करते Self-Breast Examination'
 
मुंबई राहणाऱ्या 54 वर्षांच्या जयश्री कोचरेकर यांना गेल्यावर्षी स्तनांच्या कॅन्सरचं निदान झालं. जुलै महिन्यात त्यांची ब्रेस्ट कॅन्सर शस्त्रक्रिया करण्यात आली.
 
बीबीसीशी बोलताना त्या सांगतात, "शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी खबरदारी म्हणून 'Self-Breast Examination करण्याचा सल्ला दिला. हे कसं करायचं, याचं महत्त्व याबाबत संपूर्ण माहिती दिली. आता आठवड्यातून दोन वेळा मी स्वत:च घरच्या-घरी तपासणी करते."
 
Self-Breast Examination चा जयश्री यांना फायदा झालाय.
 
त्या पुढे सांगतात, "शस्त्रक्रियेनंतर दोन महिन्यांनी Self-Breast Examination करताना ब्रेस्टमध्ये गाठ असल्यासारखं जाणवलं. डॉक्टरांकडे जाऊन तपासणी केली. पण, ती गाठ नव्हती असं डॉक्टरांनी सांगितलं."
 
Self-Breast Examination च्या फायद्याचं उदाहरण देताना डॉ. संदीप बिपटे सांगतात, "मुंबईतील 22 वर्षीय तरूणीला घरच्या घरी 'सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन' नंतर हाताला गाठ लागली. ही गाठ साधी असेल म्हणून तिने दुर्लक्ष केलं. पण, गाठ वाढल्यानंतर रूग्णालयात आली. तपासणीत ही गाठ कॅन्सरची असल्याचं निदान झालं."
 
प्रत्येक महिलेने 'Self-Breast Examination केलं पाहिजे, असं जयश्री आपल्या अनुभवावरून आवर्जून सांगतात.
 
ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणं कोणती?

भारतात कॅन्सरग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या माहितीनुसार, 2025 पर्यंत देशात कॅन्सरग्रस्तांची संख्या 15.6 लाखापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
 
निपलमधून पाणी किंवा रक्त येणं
स्तन किंवा काखेत कायम दुखणं
निपलची जागा, आकार बदलणं
स्तनांवरील त्वचेत बदल
स्तनांच्या आकारात झालेला बदल
स्तनांवर गाठ
निपलच्या आजूबाजूला लाल होणं किंवा पुरळ येणं
(स्रोत - केंद्रीय आरोग्य मंत्रालय)
 
पुरुषांना होऊ शकतो ब्रेस्ट कॅन्सर?

महिलांच्या तुलनेत पुरुषांना ब्रेस्ट कॅन्सर होण्याचं प्रमाण कमी आहे.
 
नानावटी रुग्णालयाचे कॅन्सर सर्जरी विभागप्रमुख डॉ. संजय दुधाट म्हणतात, "फक्त महिलांनी नाही तर पुरूषांनीसुद्धा 'Self-Breast Examination केलं पाहिजे."
 
"गेल्या काही वर्षांपासून पुरुषांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण वाढताना पाहायला मिळतंय. त्यामुळे पुरुषांनी ब्रेस्ट तपासणी करणं शिकलं पाहिजे," असं डॉ. दुधाट सांगतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

म्यानमार : लष्करी बंड मोडून काढण्यासाठी संयुक्त राष्ट्रांचं जागतिक समुदायाला आवाहन