पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात दिंडोरी मतदारसंघाच्या खासदार डॉ. भारती पवार यांना स्थान मिळाले आहे.
मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये चार मराठी चेहऱ्यांना स्थान मिळाले आहे. त्यापैकी एक भारती पवार आहेत. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर नाशिकला पहिल्यांदाच केंद्रात मंत्रिपद मिळणार आहे.
भारती पवार या आधी राष्ट्रवादीमध्ये होत्या. नंतर त्या भाजपात आल्या. तब्बल 8 वेळा आमदार आणि शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जाणारे नेते ए. टी. पवार यांच्या त्या स्नुषा (सून) आहेत.
डॉ. भारती पवार यांनी 2019 मध्ये भाजपात प्रवेश केला. त्यावेळी त्यांना आमदारकी व खासदारकीत दोन्ही वेळेस राष्ट्रवादीने त्यांच्या गृहकलहामुळे तिकीट दिले नव्हते.
डॉ. भारती पवार यांनी राष्ट्रवादीचे नेते पदाबरोबरच प्रदेश उपाध्यक्षपद भूषविलेले आहे. सुप्रिया सुळे यांच्या त्या निकटवर्तीय मानल्या जात.
त्या राष्ट्रवादीकडून दोनदा जिल्हा परिषद सदस्यही राहिल्या आहेत. डॉक्टर असल्याने एक सुशिक्षित चेहरा म्हणून त्यांच्याकडे पहिले जाते.
डॉ. पवार यांना दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून 2014 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली होती तेव्हा त्यांना लाखांच्या घरात मतं मिळाली होती.
2019 लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने शिवसेनेचा उमेदवार आयात केल्याने भारती पवार नाराज होत्या. ग्रामीण भागात भारती पवारांना मोठी सहानुभुती मिळाली, असं म्हटलं जातं.
स्वत:ची यंत्रणा आणि आता सत्ताधारी भाजपची ताकद मिळाल्याने दिंडोरीत त्यांच्यासह पक्षाचीही ताकद वाढली आहे. त्या जोरावर 2019 मध्ये त्यांनी राष्ट्रवादीच्या धनराज महालेंचा पराभव केला.
भारती पवार यांनी दिंडोरीतील 3 वेळा खासदार असलेले भाजपचे नेते हरिश्चंद्र चव्हाण यांचे तिकीट हिसकावले असे मानले जात होते.
हरिश्चंद्र चव्हाण हे चौथ्यांदा खासदार झाले असते तर थेट मंत्रिपदाचे दावेदार होते.
त्यांची वैद्यकीय पार्श्वभूमी असल्याने त्याचा फायदा त्यांच्या आदिवासी बहुल मतदार संघाला फायदा करून देऊ अशी मनीषा त्यांनी निवडणूक अर्ज भरताना बोलून दाखवली होती.