Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आदित्य ठाकरे आणि राहुल गांधी यांची तुलना होऊ शकते का?

आदित्य ठाकरे आणि राहुल गांधी यांची तुलना होऊ शकते का?
, सोमवार, 23 सप्टेंबर 2019 (12:03 IST)
'आजतक' वाहिनीच्या अँकर अंजना ओम कश्यप यांची एक क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. एका कार्यक्रमादरम्यान आदित्य ठाकरेंसंबंधी बोलताना त्यांनी एक विधान केलं, ज्यात आदित्य ठाकरे आणि राहुल गांधी यांची तुलना केली.
 
अर्थात, आपण ऑन एअर आहोत, हे लक्षात न आल्यानं अंजना यांनी नकळतपणे हे विधान केलं. अंजना यांनी ट्विटरवर त्यासंबंधी दिलगिरी व्यक्त केली. पण त्यामुळे सोशल मीडियावरील उलटसुलट प्रतिक्रिया थांबल्या नाहीत.
 
एकेकाळी काँग्रेसच्या सोशल मीडिया प्रमुख राहिलेल्या आणि नंतर शिवसेनेत आलेल्या प्रियंका चतुर्वेदी यांनी अंजना ओम कश्यप यांच्या वक्तव्यावर ट्वीट केलं. "लोकांना पप्पू म्हणणं किंवा त्यांच्या बुद्धिमत्तेविषयी बोलणं चालतं हो. मात्र एवढी वर्षं काम करूनही आपण 'ऑन एअर' आहोत, हे न कळणं आणि त्यात तुमचं असं 'मौलिक' मत जाहीर करणं, यामुळे तुमची बुद्धिमत्ता उघड होते," असं प्रियंका चतुर्वेदी आपल्या ट्वीटमध्ये म्हणाल्या.
 
आपल्या पक्षाच्या नेत्यासाठी प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्वीट करणं स्वाभाविक होतं. पण अंजना ओम कश्यप यांना अगदी सहजपणे राहुल गांधी आणि आदित्य ठाकरेंची तुलना का करावीशी वाटली असावी?
 
देशाच्या राजकारणात नेहरू-गांधी घराण्याला तर महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे घराण्याच्या नावाला एक वलय आहे. या दोन्ही घराण्यांची पुढची पिढी म्हणून राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे राजकारणात आले.
 
या दोघांकडेही त्यांच्या पक्षाचं तरूण नेतृत्व म्हणून पाहिलं जातं. पण वयाचा विचार केला तर राहुल गांधी पन्नाशीत आहेत. तर आदित्य ठाकरे अवघ्या 29 वर्षांचे आहेत. राहुल गांधी यांचा पक्ष राष्ट्रीय आहे तर आदित्य यांचा प्रादेशिक. मग घराण्याचा वारसा सोडला तर दोघांमध्ये अशी कोणती साम्यस्थळं आहेत?
 
"राहुल आणि आदित्य या दोघांनाही घराण्याचा वारसा आहेच. पण त्याबरोबरच ते नवीन पिढीचे आहेत. टेक्नोसॅव्ही आहेत, सोशल मीडियावर अधिक सक्रीय आहेत. दोघांचंही नेतृत्व आक्रमक नाही. आदित्य तर ठाकरे असूनही नेमस्त आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोघांनाही सध्या त्यांच्या पक्षाच्या अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागत आहे," असं मत लोकमत वरिष्ठ सहायक संपादक संदीप प्रधान यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं.
 
ही साम्यस्थळं वगळली तर राहुल आणि आदित्य यांची तुलना होऊ शकत नाही, असं संदीप प्रधान यांनी म्हटलं.
 
"राहुल यांचं घराणं हे देशावर राज्य केलेलं आहे. दुसरीकडे ठाकरे घराण्याचं तसं नाहीये. बाळासाहेब तसंच उद्धव ठाकरे यांनी कधीच निवडणूक लढवली नाही. पण सत्ता वापरली. आदित्य सध्या निवडणूक लढवणार अशी चर्चा सुरू आहे. मात्र त्यांनी निवडणूक नाही लढवली तरी त्यांचं पक्षातील पद कायमच राहणार आहे," असं संदीप प्रधान यांनी म्हटलं.
 
राहुल आणि आदित्य यांची राजकीय कारकीर्द
2004 साली राहुल गांधी यांनी आपण सक्रीय राजकारणात येणार असल्याचं सूतोवाच केलं. त्याचवर्षी त्यांनी अमेठी या मतदारसंघातून निवडणूक लढवली. 2009 आणि 2014 सालीही राहुल अमेठीमधून खासदार म्हणून निवडून आले. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मात्र राहुल गांधींना अमेठीतच पराभवाचा धक्का बसला. मात्र केरळमधील वायनाडमधून ते खासदार म्हणून निवडून आले.
 
सप्टेंबर 2007 साली राहुल गांधींची भारतीय युवा काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. जानेवारी 2013 मध्ये ते काँग्रेसचे उपाध्यक्ष झाले. तर डिसेंबर 2017 साली राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारली.
 
राहुल गांधींच्या तुलनेत आदित्य ठाकरे यांचं राजकारणातलं पदार्पण लवकर झालं. 2010 सालच्या दसरा मेळाव्यात बाळ ठाकरेंनी युवा सेनेची घोषणा केली आणि नातू आदित्य ठाकरेंकडे या नव्या सेनेची जबाबदारी सोपवली. त्यावेळी आदित्य यांचं वय अवघं वीस वर्षे होतं. युवा सेना प्रमुख ते शिवसेनेचे नेते असा आदित्य यांचा प्रवास झाला आहे. सध्या आदित्य महाराष्ट्रातील विधानसभेच्या निमित्ताने राज्यभरात फिरत आहेत. मतदारांशी संवाद साधण्याच्या उद्देशानं त्यांनी जनआशीर्वाद यात्राही काढली.
 
राहुल यांनी आधी निवडणूक लढवली आणि नंतर पक्षसंघटनेची जबाबदारी स्वीकारली. तर आदित्य आधी संघटनेत सक्रीय झाले. ठाकरे घराण्यातील व्यक्ती निवडणूक लढवत नाही, हा इतिहास आहे. पण आदित्य विधानसभेची निवडणूक लढविण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आदित्य वरळीमधून निवडणूक लढवतील, अशा स्वरुपाच्या चर्चाही गेल्या काही दिवसांपासून रंगल्या आहेत.
 
2004 आणि 2009 साली जेव्हा राहुल गांधी खासदार म्हणून निवडून आले, तेव्हा केंद्रात काँग्रेसप्रणित युपीएचं सरकार होतं. पण राहुल गांधींनी केंद्रात कोणंतही मंत्रीपद स्वीकारलं नाही.
 
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असताना आदित्य यांनी आपण सरकारमध्ये जबाबदारी स्वीकारायला तयार असल्याचे सूतोवाच केलं होतं. शिवसेनेच्या नेत्यांना तर आदित्य यांच्यामध्येभावी मुख्यमंत्रीही दिसत आहे.
 
'गांभीर्य नसलेला राजकारणी' ते पक्षाचा नेता
 
राहुल गांधींच्या राजकारण प्रवेशानंतर त्यांच्यावर पार्ट टाइम राजकारणी अशी टीका होत होती. सरकारमध्ये कोणतीही जबाबदारी न स्वीकारणं, परदेशातील त्यांच्या सुट्ट्या यांमुळे विरोधकांकडून त्यांच्यावर टीका होत होती.
 
गंभीर आरोप असलेल्या नेत्यांना निवडणूक लढविण्यास प्रतिबंध करणारा अध्यादेश 2013 साली मनमोहन सिंह सरकारनं आणला होता. मात्र भर पत्रकार परिषदेत राहुल यांनी आपल्याच सरकारच्या अध्यादेशाची संभावना "complete nonsense" या शब्दांत केली होती. त्यांच्या या कृतीमुळे विरोधकांना आयतंच कोलीत मिळालं होतं.
 
2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर मात्र हे चित्र काहीसं बदललेलं पहायला मिळालं. केंद्रात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप बहुमतानं सत्तेत आली. त्यावेळी राहुल गांधींनी भाजप सरकारवर संसदेत आणि बाहेरही टीका करायला सुरूवात केली. जमीन अधिग्रहण विधेयकावरुन सरकारला मारलेला सूट-बूट की सरकार हा टोला चांगलाच लागला होता. राफेलच्या मुद्द्यावरून त्यांनी भाजप सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.
 
पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यानंतर राहुल यांच्या नेतृत्वाखाली पहिली निवडणूक झाली गुजरातची. या निवडणुकीत काँग्रेसनं भाजपला चांगलीच लढत दिली. कर्नाटकमध्ये जेडीयुसोबत सत्तास्थापना, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढमध्ये काँग्रेसची सरकारं आल्यानंतर राहुल गांधींच्या नेतृत्वाकडून अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेलं प्रचंड यश आणि काँग्रेसचा दारुण पराभव यानंतर राहुल गांधी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
 
नाईट लाईफ ते व्हॅलेंटाईन
आदित्य ठाकरे यांनी सुरूवातीला ज्या राजकीय भूमिका मांडल्या त्या बहुतांशी मुंबई केंद्रित होत्या. 2010 मध्ये रोहिंग्टन मिस्त्री यांच्या 'सच अ लाँग जर्नी' या पुस्तकाच्या प्रती जाळून त्यांनी पहिलं आंदोलन केलं. मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हे पुस्तक काढून टाकण्यासाठी त्यांनी हे आंदोलन छेडलं होतं. मराठी माणसाचा अपमान या पुस्तकामुळे होत असल्याचा त्यांनी आरोप केला होता. अखेर हे पुस्तक अभ्यासक्रमातून हटवण्यातही आलं.
 
आदित्य यांनी आतापर्यंत मुंबईतलं नाईट लाईफ जिवंत रहावं आणि रूफ टॉप हॉटेलना परवानगी मिळावी, यांसाठीचा आग्रह धरला. मुंबईतल्या राणीच्या बागेत पेंग्विन यावेत, यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी मुंबईतल्या मरीन लाइन्स तसंच वडाळ्यात खुले जिमही सुरू केले.
 
शिवसेनेने अनेक वर्ष व्हॅलेंटाईन डेला कडाडून विरोध केला. हा परकीय सण आम्ही साजरा करणार नाही, अशी भूमिका घेत शिवसैनिकांनी दुकानांची तोडफोड केली. पण तरुणांपर्यंत पोहोचायचं असेल, तर ही भूमिका बदलावी लागेल, असं आदित्य ठाकरेंनी वेळीच ओळखलं.
 
सध्या मेट्रोचं कारशेड बनविण्यासाठी आरे जंगलातील झाडं तोडण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. आदित्य ठाकरेंनी या निर्णयाला विरोध केला आहे.
 
"त्यांना मुंबई विद्यापीठासारखेच प्रश्न समोर दिसतात. नाईट लाईफ, रूफ टॉप हॉटेल हे मुद्दे राज्याच्या नेत्याला उचलायची आवश्यकता नाही. ग्रामीण तरुणांना आदित्यकडून कोणत्याच अपेक्षा नाहीत. शिवसेनेनं अजूनही त्यांना संपूर्ण महाराष्ट्राचा नेता म्हणून पुढे आणलेलंच नाही," असं मत भारतकुमार राऊत यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं होतं.
 
कदाचित म्हणूनच ग्रामीण तरुणांशी नाळ जोडण्यासाठी म्हणूनच आदित्य यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनआशीर्वाद यात्रा काढली असावी.
 
सोशल मीडियावर सक्रीय
आदित्य ठाकरे यांचं नेतृत्व मुंबई केंद्रित असल्याची टीका होते. तर राहुल गांधी यांनाही ग्रामीण भारतातील समस्यांची जाणीव नसल्याचं बोललं जातं. राहुल हे सोशल मीडियावर अधिक सक्रीय आहेत. यंदा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं सोशल मीडियाचा अधिकाधिक वापर केला होता.
 
सोनिया गांधी यांनी हंगामी अध्यक्ष म्हणून सूत्रं हाती घेतल्यानंतर सोशल मीडिया आवश्यक आहे. पण केवळ सोशल मीडियावर सरकारला विरोध करून भागणार नाही, पक्षानं आता रस्त्यावर उतरूनही आंदोलनं करायला हवीत असा सल्ला कार्यकर्त्यांना दिला होता. हा राहुल गांधी आणि त्यांच्या यंग ब्रिगेडला टोला असल्याची चर्चाही सुरू झाली होती.
 
आदित्यही सोशल मीडियावर सक्रीय आहेत. पण त्यांच्या सोशल मीडियाच्या वापराबाबत गंमतही दिसून येते. जिथे मराठी भाषिक मोठ्या संख्येने आहेत, त्या फेसबुकवर त्यांच्या अधिकृत पेजला 1 लाख 23 हजार लाइक्स दिसतात. तर इंग्रजीचं वर्चस्व असलेल्या ट्विटरव त्यांचे जवळपास 14 लाख 80 हजार फॉलोअर्स आहेत.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अमिताभ बच्चन यांचा राजकीय प्रवास : राजीव गांधीचे मित्र ते नरेंद्र मोदी सरकारचे जाहिरातकर्ते