Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तुरुंगातून निवडणूक जिंकलेल्या उमेदवारांना शपथ घेता येते का?

jail
, शुक्रवार, 7 जून 2024 (21:17 IST)
भारतात 18व्या लोकसभा निवडणुकीत 2 उमेदवार तुरुंगवास भोगत असताना निवडून आले आहेत. अशा विजयी उमेदवारांचं पुढे काय होतं? ते शपथ घेऊ शकतात का?
 
तुरुंगात असलेल्या व्यक्तीला मतदान करता येत नाही, पण उमेदवार म्हणून निवडणूक लढवता येते.
 
कट्टरतावादी शीख धर्मप्रचारक म्हणून ओळखले जाणारे 'वारिस पंजाब दे'चे प्रमुख अमृतपाल सिंह पंजाबच्या खादूरसाहिबमधून 1,97, 120 मताधिक्याने निवडून आले आहेत.
 
तर शेख अब्दुल राशीद ऊर्फ इंजिनियर राशीद जम्मू-काश्मीरमधल्या बारामुल्लामधून निवडून आले आहेत.
 
राशीद यांनी जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सच्या ओमर अब्दुल्ला यांचा 2 लाख मतांनी पराभव केला.
 
दहशतवादाच्या आरोपांखाली सध्या हे दोघेही तुरुंगवास भोगतायत. यापैकी अमृतपाल सिंह यांना एप्रिल 2023 मध्ये राष्ट्रीय सुरक्षा कायदा ( NSA) खाली अटक करण्यात आली आणि आसामच्या दिब्रुगड तुरुंगात त्यांना ठेवण्यात आलंय.
 
तर टेरर फंडिग - दहशतवादासाठी पैसे पुरवल्याच्या आरोपांखाली इंजिनियर राशीदना ऑक्टोबर 2019मध्ये अटक करण्यात आली आणि ते तिहार जेलमध्ये आहेत.
 
तुरुंगवासात असताना खासदारकीची शपथ घेता येते का?
संसद सदस्य - खासदार म्हणून शपथ घेता येणं हा निवडणुकीतल्या विजयी उमेदवाराला घटनेने दिलेला हक्क आहे. आणि तो राशीद आणि अमृतपाल या दोघांनाही असेल.
 
पण हे दोघेही सध्या बंदी असल्याने त्यांना या शपथविधी सोहळ्याला हजर राहण्यासाठी तुरुंग प्रशासनाची परवानगी घ्यावी लागेल. आणि ती मिळाल्यास त्यांना तुरुंगातून संसदेत शपथविधीसाठी बंदोबस्तात आणलं जाईल.
 
पण त्यांना 18व्या लोकसभेच्या कामकाजात मात्र भाग घेता येणार नाही किंवा हजेरी लावता येणार नाही. शपथ घेतल्यानंतर त्यांना तुरुंगात परतावं लागेल.
 
आपण सदनाच्या कामकाजासाठी उपस्थित राहू शकणार नसल्याचं त्यांना शपथ घेतल्यानंतर लोकसभा अध्यक्षांना लेखी कळवावं लागेल.
 
लोकसभा अध्यक्ष त्यानंतर हा मुद्दा हाऊस कमिटी - सदन समितीसमोर मांडतील. या सदस्याला अनुपस्थित राहण्याची परवानगी देण्यात यावी वा नाही, यावर समिती त्यांच्या सूचना देईल. या नंतर हा प्रस्ताव मतासाठी लोकसभेसमोर लोकसभा अध्यक्ष मांडतील.
 
संसदेच्या दोन्ही सदनांच्या सभासदांच्या अनुपस्थितीविषयीचे नियम भारतीय घटनेच्या कलम 101(4) मध्ये नमूद करण्यात आले आहेत.
 
तुरुंगातील खासदारांवरचे आरोप सिद्ध झाले तर काय?
एखाद्या गुन्ह्याचे आरोप असणाऱ्या व्यक्तीने तुरुंगातून निवडणूक लढवली आणि जिंकली तर त्याला खासदारकी मिळते. पण हे आरोप सिद्ध होऊन शिक्षा झाली तर मात्र ही खासदारकी संपुष्टात येते.
 
अमृतपाल सिंह किंवा इंजिनियर राशीद यांच्यावरचे आरोप सिद्ध होऊन त्यांना किमान 2 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली, तर त्यांची खासदारकी संपुष्टात येईल.
 
अशा परिस्थितीमध्ये खासदार आणि आमदार अपात्र ठरतील असं सुप्रीम कोर्टाने 2013 मध्ये दिलेल्या निकालात म्हटलं होतं.
 
यापूर्वी असं घडलं होतं का?
तुरुंगातून निवडणूक लढवून जिंकल्याचं सर्वात प्रसिद्ध उदाहरण म्हणजे जॉर्ज फर्नांडिस. आणीबाणीच्या काळात जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर बडोद्यात देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता.
 
1977ला ते तुरुंगात असताना निवडणुकांची घोषणा झाली. त्यांनी ही निवडणूक तुरुंगातूनच लढवली आणि मुझ्झफरपूरमधून निवडून आले. खासदारकीची शपथ घेण्यासाठी त्यावेळी त्यांना तुरुंगातून सोडण्यात आलं होतं.
 
अगदी आताचं उदाहरण म्हणजे मार्च महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टाने आम आदमी पार्टीचे नेते संजय सिंह यांना शपथविधीसाठी अशी परवानगी दिली होती.
 
मनी लाँडरिंगच्या आरोपांखाली संजय सिंह सध्या तिहार तुरुंगात आहेत. तुरुंगापासून त्यांना संसदेपर्यंत आणि शपथविधीनंतर सुरक्षितपणे तुरुंगात परत नेण्याची सोय करण्याच्या सूचना सुप्रीम कोर्टाने तुरुंग प्रशासनाला दिल्या होत्या. संजय सिंह दुसऱ्यांदा राज्यसभा खासदार झाले आहेत.
 
Published By- Priya Dixit
 
 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

PAK vs USA: बाबर आझमचा मोठा पराक्रम,विराट कोहलीचा मोठा विक्रम मोडला