Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रश्मी शुक्ला प्रकरण देवेंद्र फडणवीस यांच्यावर बुमरॅंग होऊ शकेल का?

रश्मी शुक्ला प्रकरण देवेंद्र फडणवीस यांच्यावर बुमरॅंग होऊ शकेल का?
, गुरूवार, 25 मार्च 2021 (21:02 IST)
महाराष्ट्र गुप्तचर विभागाच्या माजी आयुक्त IPS रश्मी शुक्ला या महाविकास आघाडी विरुद्ध भाजप या राजकारणाचा केंद्रबिंदू बनल्या आहेत. राज्याचं राजकारण गेले दोन-तीन दिवस रश्मी शुक्ला आणि फोन टॅपिंग आरोपांच्या भोवती फिरताना पाहायला मिळतंय.
रश्मी शुक्लांच्या रिपोर्टवरून राजकारण तापलं असतानाच, गुरुवारी (25 मार्च) गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रश्मी शुक्ला यांच्यावर आमदारांना धमकावल्याचा आरोप करत खळबळ उडवून दिली आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, "महाविकास आघाडीसोबत न जाण्यासाठी शुक्ला यांनी आमदारावर दबाव टाकला होता."
रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंगच्या मदतीने पोलीस अधिकाऱ्यांची पोस्टिंग आणि बदलीत भ्रष्टाचार झाल्याचा रिपोर्ट दिला होता. या रिपोर्टच्या आधारे फडणवीसांनी सरकारला टार्गेट केलं.
पण फोन टॅपिंग प्रकरणी शुक्ला यांचा माफीनामा आमच्याकडे आहे, असं म्हणत, ठाकरे सरकार पुन्हा फ्रॅंटफूटवर आलंय. त्यामुळे शुक्लांच प्रकरण देवेंद्र फडणवीसांवर बुमरॅंग होईल का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
 
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंह यांनी केलेले आरोप आणि रश्मी शुक्ला यांचा पोलीस दलातील भ्रष्टाचाराचा रिपोर्ट, यामुळे ठाकरे सरकार अडचणीत आलं होतं. सरकार बॅकफूटवर गेल्याची चर्चा सुरू झाली होती.
रश्मी शुक्ला यांच्यावर आरोप करताना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले, "शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र यड्रावकर यांनी महाविकास आघाडीसोबत न जाता भाजपसोबत रहावं यासाठी रश्मी शुक्ला यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यांना फोन केले व त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला."
राष्ट्रवादीच्या आरोपावर प्रतिक्रिया देताना भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले, "भ्रष्टाचाराच्या गंभीर प्रश्नावर सरकार बोलण्यास तयार नाही. उलट आमची चोरी उघडकीस कशी आली यावर सत्ताधारी चर्चा करतायत."
 
शुक्ला वादात कशा सापडल्या?
महाराष्ट्र विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी रश्मी शुक्ला यांचा पोलीस दलात पोस्टिंग आणि बदलीसाठी भ्रष्टाचार होत असल्याचा गोपनीय रिपोर्ट सार्वजनिक केला.
"या रिपोर्टची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना माहिती देण्यात आली होती," असा दावा फडणवीस यांनी केला. रिपोर्टच्या आधारे भाजपने गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना टार्गेट केलं. "या भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे," अशी मागणी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे केली.
रश्मी शुक्ला यांनी ऑगस्ट 2020 मध्ये गुप्तचर विभागाच्या आयुक्त असताना हा रिपोर्ट महासंचालक सुबोध जयस्वाल यांना दिला होता.
 
'शुक्ला यांनी अवैधरित्या फोन टॅप केले'
राष्ट्रवादी कॉंग्रेसने देवेंद्र यांच्या आरोपांवर पलटवार केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वरिष्ठ मंत्री नवाब मलिक यांनी "रश्मी शुक्ला भाजपच्या एजेंट आहेत," असं म्हणत आरोप फेटाळून लावले. तर रश्मी शुक्ला यांनी अवैधरित्या फोन टॅप केले, असा आरोप राष्ट्रवादीने केला आहे.
बुधवारी (24 मार्च) कॅबिनेट बैठकीनंतर, मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले, "शुक्ला यांना फोन टॅप करण्याची सवय पूर्वीच्या सरकारपासून होती असा आरोप आहे. तत्कालीन मुख्य सचिव (गृह) कुंटे यांनी अशी परवानगी दिली नव्हती हे स्पष्ट केलंय."
"एकाच्या फोन टॅपिंगची परवानगी मागितली आणि दुसऱ्याचे फोन टॅप करण्यात आले. मंत्र्यांचे फोनही टॅप करण्यात आले याचा आम्हाला दाट संशय आहे," असं आव्हाड पुढे म्हणाले.
रश्मी शुक्ला यांच्या रिपोर्टवर राज्यमंत्रीमंडळात चर्चा झाली. फोन टॅप करण्यासाठी परवानगी घेण्यात आली होती का? असा प्रश्न उपस्थित झाला.
 
"रश्मी शुक्ला यांनी याबद्दल माफी मागितली होती. चूक झाल्याचं लेखी लिहून दिलं. पण बरं झालं सरकारने हे पत्र परत दिलं नाही," असं आव्हाड म्हणाले.
 
राष्ट्रवादी कॉंग्रेसने केलेल्या आरोपांवर बीबीसीने रश्मी शुक्ला यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण रश्मी शुक्ला यांनी फोन आणि मेसेजचं उत्तर दिलं नाही.
 
रश्मी शुक्ला प्रकरण फडणवीसांवर बुमरॅंग होईल?
एकापाठोपाठ एक होणाऱ्या आरोपांमुळे महाविकास आघाडी सरकार बॅकफूटवर गेल्याची चर्चा सुरू झाली होती. पण शुक्ला यांनी आमदारांना धमकावल्याचा आरोप करून सरकारने विरोधकांवर हे प्रकरण उलटवण्याचा प्रयत्न केलाय.
रश्मी शुक्ला यांचं प्रकरण फडणवीसांवर बुमरॅंग होईल? यावर बोलताना वरिष्ठ राजकीय पत्रकार सुधीर सुर्यवंशी म्हणतात, "बुमरॅंग होईल का? हे सांगता येणार नाही. पण याच पद्धतीने सरकारचा प्रयत्न नक्कीच सुरू आहे."
"भाजपने शुक्ला यांच्या रिपोर्टच्या आधारे आरोप केले. फोन टॅपिंग प्रकरणी आघाडी सरकार भाजप आणि शुक्ला यांच्यातील संबंध दाखवण्याचा प्रयत्न करतंय. शुक्ला भाजपच्या संपर्कात होत्या असं दाखवण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जातोय," असं सुर्यवंशी म्हणतात.
 
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सांगतात, "सरकारला आक्रमक होण्याशिवाय काहीच पर्याय उरलेला नाही. भाजपच्या आरोपांना काऊंटर करणं सरकारला भाग आहे."
 
"रश्मी शुक्ला प्रकरण बुमरॅंग होईल का? हे येत्या काही दिवसात कळेल. मात्र, सद्यपरिस्थितीत सरकारला या आक्रमकपणाचा फायदा होईल. अधिकारी भाजपधार्जिणे आहेत. त्यांचा वापर भाजप करतं असा कार्ड सरकारला खेळता येईल," असं देशपांडे म्हणतात.
 
काय म्हणाले होते परमबीर सिंह?
देवेंद्र फडणवीसांच्या अगोदर शुक्ला यांच्या रिपोर्टचा हवाला मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी सुप्रीम कोर्टातील आपल्या याचिकेतही दिला होता.
 
"विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, 24 किंवा 25 ऑगस्ट 2020 ला राज्य गुप्तचर विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पोलीस महासंचालकांना माहिती दिली. महासंचालकांनी गृहविभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना पोस्टिंग आणि बदल्यांमध्ये गृहमंत्री अनिल देशमुखांच्या गैरवर्तनाची माहिती दिली. टेलिफोन इंटरसेप्शनच्या बेसवर ही माहिती मिळाली होती." असा दावा परमबीर सिंह यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत केला.
अनिल देशमुख यांच्यावर कारवाई न करता रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आल्याचं, सिंह यांनी याचिकेत म्हटलं आहे.
 
कोण आहेत रश्मी शुक्ला?
परमबीर सिंह यांनी नाव घेतलेल्या रश्मी शुक्ला महाराष्ट्र कॅडरच्या वरिष्ठ IPS अधिकारी आहेत. रश्मी शुक्ला फेब्रुवारी 2021 केंद्रीय राखीव पोलीस दलात अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी प्रतिनियुक्तीवर गेल्या आहेत.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 2018 मध्ये रश्मी शुक्ला यांची राज्य गुप्तचर विभागाच्या आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली. राज्यात सत्ताबदल झाला आणि महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आलं. सप्टेंबर 2020 मध्ये शुक्ला यांना सरकारने पोलीस महासंचालकपदी प्रमोशन दिलं आणि त्यांची बदली करण्यात आली.
 
रश्मी शुक्लांवर कारवाई होणार?
रश्मी शुक्लांवर अवैधरित्या फोन टॅप केल्याचा आरोप आहे. तर, त्यांचा गोपनीय अहवालही सार्वजनिक झालाय. त्यामुळे राज्य सरकार शुक्ला यांच्यावर कारवाई करण्याचा विचार करत आहे.
परमबीर सिंह आणि रश्मी शुक्ला यांच्यावर कारवाई करता येईल का, यावर मुख्यमंत्री, गृहविभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि महाधिवक्त्यांमध्ये चर्चा झाल्याचं बोललं जात आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोरोना : 'या' 9 शहरांमुळे महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आलीय का?