Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कॅनडा मृत्यू प्रकरण: गुजरातहून परदेशात जाणाऱ्या माणसांचं काय होतंय?

कॅनडा मृत्यू प्रकरण: गुजरातहून परदेशात जाणाऱ्या माणसांचं काय होतंय?
, मंगळवार, 25 जानेवारी 2022 (20:46 IST)
भार्गव पारेख
गेल्या आठवड्यात अमेरिका-कॅनडा सीमेजवळ एका अर्भकासह चार भारतीयांचं कुटुंब मृतावस्थेत आढळून आलं होतं. भारतीय अधिकारी या घटनेसंदर्भात तपशील जाणून घेण्यासाठी कॅनडाच्या संपर्कात आहेत.
 
अमेरिकन पोलिसांनी या घटनेत बेकायदा दाखल होण्याचा संशय व्यक्त केला आहे. कॅनडाहून अमेरिकेत दाखल होण्याचा ते प्रयत्न करत होते. मात्र अचानक हवामान बिघडल्याने बर्फाळ भागात प्रचंड थंडीत गारठून त्यांचा मृत्यू झाला असावा असा संशय व्यक्त करण्यात येतो आहे.
 
याधर्तीवर आणखी एक घटना समोर आली आहे. उत्तर गुजरातमधील कलोलजवळच्या डिंगुचा इथलं एक कुटुंब परदेशात बेपत्ता झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
 
कॅनडाच्या भयंकर अशा गारठून टाकणाऱ्या थंडीत त्यांचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे. मात्र सरकारने यासंदर्भात काहीही माहिती दिलेली नाही.
बीबीसी गुजरातीने या कुटुंबाचे प्रमुख बलदेवभाई यांच्याशी संपर्क साधला. बेपत्ता जगदीश पटेल यांचे ते वडील आहेत.
 
"दहा दिवसांपूर्वी माझा मुलगा जगदीशने कॅनडाला रवाना झाला. कॅनडाचा व्हिसा मिळाल्याचं त्याने मला सांगितलं. तो, त्याची बायको वैशाली आणि मुलगी विहंगा असं तिघे कॅनडाला रवाना झाले," असं बलदेवभाई यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.
 
"कॅनडाला गेल्यानंतर बोलू असे त्याने मला सांगितलं. गेल्या चार दिवसांपासून मुलाशी काहीच संपर्क झालेला नाही. आमचे काही नातेवाईक तिथे आहेत. त्यांच्या मदतीने आम्ही या तिघांचा शोध घेत आहोत," असं ते म्हणाले.
 
बलदेवभाई शेतकरी आहेत आणि त्यांच्याकडे 20 एकर शेती आहे. जगदीश त्यांना शेतीत मदत करत असे. शिक्षणाच्या आणि नंतर इलेक्ट्रिक दुकानाच्या निमित्ताने जगदीश कलोल इथे राहायचा.
 
जगदीशने कॅनडासाठी व्हिसा अर्ज केल्याचं बलदेवभाईंना माहिती नव्हतं.
 
गुजरातमधील पटेल मंडळी विदेशात का जातात?
गुजरातमधील पाटीदार समाज परदेशात जाऊन स्थायिक होण्यासाठी प्रसिद्ध आहे. उत्तर गुजरातमध्ये पाटीदार समाजाचं प्राबल्य आहे. या समाजात परदेशात जाण्याची ओढ आहे असं निवृत्त शिक्षक आर.एस.पटेल यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.
 
गुजराती तरुण मुलं अमेरिका आणि कॅनडाची वाट धरतात. उत्तर गुजरातमधल्या 42 गावांपैकी बरेचसे तरुण परदेशात स्थायिक झाले आहेत. त्यांना डोलारिया गोल असंही म्हटलं जातं. अशा मुलांची लग्न पटकन होतात.
 
उत्तर गुजरातमध्ये पटेल समाजाची अनेक गावं आहेत. त्यांच्यात रोटीबेटीचा व्यवहार चालतो.
 
आर.एस.पटेल सांगतात, "पैसे कमावण्याच्या उद्दिष्टाने परदेशात गेलेल्या गुजराती तरुण मुलांना तिथे अनेक वर्षांपासून स्थायिक झालेले गुजराती बांधव नोकरी देतात. चांगली कमाई, आर्थिक स्थैर्य आणि चांगलं राहणीमान यासाठी ही मुलं परदेशात जातात. कमी शिकलेली मुलंही परदेशात जातात".
 
कॅनडातून अमेरिकेत बेकायदेशीर पद्धतीने प्रवेश करताना चारजणांच्या भारतीय कुटुंबाचा मृत्यू झाल्याच्या बातम्या स्थानिक तसंच आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या. सरकार याप्रकरणी काय करत आहे?
 
गांधीनगरचे जिल्हाधिकारी कुलदीप आर्य यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "कॅनडात चार सदस्यीय गुजराती कुटुंबाचा मृत्यू झाल्याची बातमी आम्हाला कळली आहे.
 
अन्य नातेवाईक, कुटुंबीयांनी यासंदर्भात बेपत्ता होण्याची तक्रार दाखल केली तर आम्ही तपास करू. परराष्ट्र मंत्रालय, कॅनडातील भारतीय दूतावास यांच्याकडून आम्हाला मदत मिळू शकते".
 
"चारजणांच्या मृत्यूसंदर्भात कोणीही कोणतीही तक्रार दाखल न केल्याने याप्रकरणी कुठलाही तपास किंवा चौकशी सुरू झालेली नाही. कुटुंबीयांनी घरातली माणसं बेपत्ता झाली असल्याची तक्रार दिलेली नाही. परराष्ट्र मंत्रालयाने यासंदर्भात काहीही भाष्य केलेलं नाही," असं ते म्हणाले. पोलीस कार्यवाही करत असल्याचं वृत्त स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलं आहे.
 
अवैध पद्धतीने विदेशात प्रवेश?
अहमदाबाद गुन्हे अन्वेषण विभागाचे महासंचालक एसीपी दीपक व्यास यांच्याशी आम्ही बातचीत केली. ते अनेक वर्षं व्हिजिलन्स सेवेत कार्यरत आहेत.
 
ते म्हणाले, "कॅनडातील दूतावासाकडून किंवा भारतातल्या कॅनडाच्या दूतावासात या मृत्यूसंदर्भात कोणत्याही घटनेची नोंद झाली नसेल तर याचा अर्थ ही माणसं व्हिजिटर व्हिसाच्या माध्यमातून कॅनडाला गेली होती. कॅनडातून अवैध पद्धतीने अमेरिकेत जात असताना प्रचंड थंडीने त्यांचा मृत्यू झाला. यासंदर्भात कॅनडा सरकारने नेमकं काय घडलं आहे याची माहिती घेऊन भारत सरकारला द्यायला हवी".
 
"संगणकीकरण होण्याआधी अहमदाबाद, मद्रास इथली माणसं पासपोर्टवर दुसराच फोटो लावून अवैध पद्धतीने देश सोडत असत.
 
"90च्या दशकात उत्तर गुजरातमधून अनेक माणसं सांस्कृतिक किंवा नाटकाच्या नावावर परदेशात जात असत. दुसऱ्या देशात जाण्यासाठी त्यांना पैसे मिळत असत. तिथे गेल्यानंतर ओळखीच्या व्यक्तीकडे किंवा मॉटेल इथे त्यांना नोकरी मिळत असे.
 
"अशा प्रकरणात काही गडबड-घोटाळा झाला तर पोलिसांकडे अभावानेच तक्रार दाखल केली जाते. अशा पद्धतीने हे रॅकेट चालतं," असं व्यास यांनी सांगितलं.
 
डिंगुचा इथल्या पटेल कुटुंबीयांनी याघटनेसंदर्भात नातेवाईक बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केलेली नाही.
 
गुजरात पोलीस मधल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की, "अवैध पद्धतीने देश सोडून जाण्याचा प्रकार असू शकतो. लोकांना बेकायदेशीर पद्धतीने परदेशात पाठवणारे एजंट आणि त्यांच्या रॅकेटवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. या एजंटची सूत्रं कोण आहेत यांच्यावरही आम्ही लक्ष ठेऊन आहोत".
 
गुजरातचे माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी यासंदर्भात म्हटलं आहे की, "देशात रोजगाराच्या संधी नाहीत. त्यामुळे नागरिक जीवाची जोखीम असतानाही परदेशात जात आहेत.
 
"कलोल परिसरातील या कुटुंबांने परराष्ट्र मंत्रालय आणि कॉमनवेल्थ कार्यालयाला याची माहिती दिली आहे. कॅनडा सरकारच्या ते संपर्कात आहेत. यासंदर्भात अधिकृत माहिती स्पष्ट झाल्यानंतर आम्ही कार्यवाही करू".
 
काँग्रेसचे वरिष्ठ नेते अर्जुन मोढवाडिया यांनी या घटनेचा निषेध केला आहे. बीबीसी गुजरातीशी बोलताना त्यांनी सांगितलं की, "पैसा मिळवण्यासाठी लोकांना जीव धोक्यात घालून परदेशात जावं लागतं. गुजरातमध्ये बेरोजगारीचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे अशा घटना घडणं स्वाभाविक आहे".
 
"भाजप सरकार, सरकारी नोकरीतही स्थैर्य मिळवून देऊ शकत नाही. ठोस वेतनाच्या नावावर ते शोषण करतात. लेबर लोनच्या माध्यमातूनही नागरिकांना त्रास दिला जातो. त्यामुळेच अशा घटना घडतात."
 
"नोकरीसाठी बेकायदेशीर परदेशात जाण्याचा हा केवळ प्रकार नाही. पण हा प्रकार वेगळा आहे. भाजपने श्रीमंत पटेलांना हाताशी धरलं आहे. पण या गरीब कुटुंबाला मदत करायला त्यांच्याकडे वेळ नाही."

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नवीन Mahindra Scoroio लाँच: Mahindra & Mahindra या वर्षी भारतीय कार बाजारपेठेत थैमान