भाजप नेते आणि महाराष्ट्राचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी फुले-आंबेडकर आणि कर्मवीरांनी शाळा सुरु करण्यासाठी भीक मागितली, असं वक्तव्य केल्यानंतर त्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत सडकून टीका केली.
या वादानंतर चंद्रकांत पाटलांनी स्पष्टीकरण देत आपल्या वक्तव्यात काहीही आक्षेपार्ह नसून भीकचा अर्थ आजच्या काळात देणगी, वर्गणी आणि सीएसआर असा होतो, अशी भूमिका मांडली.
चंद्रकांत पाटील काय म्हणाले?
चंद्रकांत पाटील हे काल (9 डिसेंबर) पैठणमध्ये संत विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात भाषण करत होते. यादरम्यान ते म्हणाले, आपल्याला संत विद्यापीठ सुरु करायचं असेल तर सरकार नक्की मदत करतील. मी आणि संदीपान भुमरे अशा चांगल्या कामाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे गेलो तर पैशांची कमतरता भासणार नाही.
पुढे ते म्हणाले, "आता त्या काळात दहा रुपये देणारे होते. आता दहा कोटी रुपये देणारे आहेत. सीएसआरच्या माध्यमातून कंपन्यांच्या नफ्यातून दोन टक्के खर्च करण्यासाठी कायदा झाला आहे."
"पण माझं म्हणणं आहे की सरकारवर अवलंबून का राहता? या देशात शाळा कोणी सुरु केल्या? शाळा कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांनी शाळा सुरू केल्या."
"या सगळ्यांनी शाळा सुरु करताना सरकारनं त्यांना अनुदान दिलं नाही. त्यांनी लोकांकडं भीक मागितली. मी शाळा चालवतोय, पैसे द्या."
हे विधान करताना चंद्रकांत पाटील यांनी गळ्यातील उपरणं पुढे पसरून दाखवलं.
विरोधकांचा आक्षेप
चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्वीट करून प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले, “महात्मा फुले हे उद्योजक देखील होते. त्यांनी उभी केलेली रचनात्मक सामाजिक कामे हि स्वतःच्या कष्टाच्या पैशांतून उभी केलेली आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे विधिज्ञ, पत्रकार व प्राध्यापक होते. बाबासाहेबांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली त्यावेळी ते केंद्रीय मजूर मंत्री होते.”
“राज्यातील मंत्री चंद्रकांत पाटील यांनी फुले - आंबेडकरांनी भीक मागून शाळा उभारल्या हे विधान चुकीचे तर आहेच पण महापुरुषांच्या रचनात्मक कार्याच्या उभारणीला भीक मागण्याची उपमा देणे, हा त्यांचा जाणून बुजून केलेला अपमानच आहे,” असं जयंत पाटील यांनी म्हटलं.
“चंद्रकांत पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानानंतर भाजपचे लोक आता जाणून बुजून महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करत आहेत,” असंही जयंत पाटील यावेळी म्हणाले.
लेखक आणि विचारवंत प्रा. हरी नरके यांनीसुद्धा चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर टीका केली.
ते ट्विट करून म्हणाले, “राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री म्हणाले की फुले, आंबेडकर, कर्मवीर यांनी लोकांकडे भिक मागून शाळा चालवल्या. त्यांना सरकारी अनुदान मिळत नव्हते. फुले,आंबेडकर, कर्मवीर हे स्वाभिमानी होते. त्यांनी कधीही कोणाकडेही भिक मागितली नाही. लोकवर्गणीसाठी आवाहन करणे हे भिक मागणे नव्हे. फुले पक्षाघाताने आजारी होते,तेव्हा औषधपाण्यालाही पैसे नव्हते, पण त्यांनी त्यासाठी भिक मागितली नाही. बाबासाहेबांना बुद्ध अँड हिज धम्म हा ग्रंथ छापायचा होता. पैसे नव्हते पण त्यांनी कधीही कोणापुढे ना हात पसरला ना तोंड वेंगाडले.”
ते पुढे म्हणाले, “कर्मवीरांनी पत्नीचे दागिने विकले पण पैशाभावी मुलांचे शिक्षण थांबू दिले नाही. जोतीराव,सावित्रीबाई आणि त्यांचे सहकारी पदरमोड करून शाळा चालवीत असत. पुढे मुलींची, मुलांची व शाळांची संख्या वाढली तेव्हा सरकारने त्यांच्या शाळांना अनुदान दिले. बाबासाहेबांनी गरिबांच्या शिक्षणासाठी खूप खस्ता खाल्ल्या. त्यांच्या व कर्मवीरांच्या शाळा-महाविद्यालयांना सरकारी अनुदान मिळत असे.”
“त्यामुळे मंत्र्यांची ही माहिती चुकीची आहे. त्यांनी भिक हा शब्द मागे घ्यायला हवा. शिक्षणावरचा खर्च ही भविष्यावर केलेली गुंतवणूक असते. तो खर्च नसतो. पण हे कळण्यासाठी शिकलेले असणे गरजेचे असते,” अशी टीका नरके यांनी केली.
चंद्रकांत पाटील यांचं स्पष्टीकरण
आपल्या वक्तव्यावरून टीका होत असताना पाटील यांनी काल औरंगाबादमध्ये एक पत्रकार परिषद घेतली.
यामध्ये आपली व्हायरल होत असलेली व्हीडिओ क्लिप पुन्हा एकदा प्रसार माध्यमांना ऐकवत ते म्हणाले, “मी काय म्हटलं, हे मी सांगण्यापेक्षा दर्शकांनी लाईव्ह पाहिलं आहे. त्यामध्ये मी त्यांच्याबद्दल आदरच व्यक्त केला.
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, “मी फक्त एवढंच बोललो की शाळा कोणी सुरू केल्या? तर या शाळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरू केल्या आणि हे महापुरुष सरकारवर अवलंबून राहिले नाहीत. त्यांनी लोकांकडे पैसे मागितले."
"कर्मवीर भाऊराव पाटलांनी तर लोकांकडे जाऊन धान्य मागितलं. आताच्या काळात या सगळ्याला वर्गणी किंवा सीएसआर म्हणतात. मात्र तेव्हा वेगळी भाषा होती. त्यामुळे सीएसआरच्या माध्यमातून संस्थांना बळकटी द्यावी लागेल, एवढंच माझं म्हणणं होतं,' असं पाटील यांनी सांगितलं.
ते पुढे म्हणाले, "झोपलेल्या जागं करता येतं, मात्र झोपेचं सोंग घेतलेल्यांना जागं करता येत नाही. मीडियामुळे लोकांना ही क्लिप ऐकायला मिळाली. त्यानंतर लोक म्हणाले यात तर काहीच आक्षेपार्ह नाही."
"मला याबाबत एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचाही फोन आला होता आणि त्यानेही यात नेमकं काय आक्षेपार्ह आहे, असं विचारलं. माझंही तेच सांगणं आहे आणि लोकांचंही समाधान झालेलं आहे. 'ध' चा 'मा' करणं एवढंच काम विरोधी पक्षांना आता उरलेलं आहे, असा आरोप पाटील यांनी केला आहे.
दरम्यान, "मी कसा चुकलेलो नाही, याबाबत आता दलित संघटनाच पत्रक काढत आहेत. त्यामुळे माझ्यावर टीका करणारे विरोधी पक्ष तोंडघशी पडले,' असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
Published By -Smita Joshi