Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हवामान बदल : पृथ्वीवरचं पाणी संपत चाललंय का?

हवामान बदल : पृथ्वीवरचं पाणी संपत चाललंय का?
, रविवार, 31 ऑक्टोबर 2021 (14:16 IST)
काही महिन्यांपूर्वी इराणमध्ये अभूतपूर्व दुष्काळ पडला व पावसाच्या अभावामुळे नद्या कोरड्या पडल्या. संपूर्ण देशात पाण्याच्या तुडवड्याविरोधात तीव्र आंदोलनं झाली.
 
भारतातील सर्वांत मोठ्या शहरांपैकी एक असलेल्या चेन्नईत पाणीसंकट निर्माण झाल्याच्या बातम्या 2019 साली ठळकपणे प्रसिद्ध झाल्या. त्यानंतर मोठे उद्योग, शहरीकरण आणि हवामानबदल यांमुळे किती गंभीर परिणाम होऊ शकतात, यावर चर्चा सुरू झाली.
 
2018 साली भयंकर दुष्काळामुळे दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरात प्रत्येक व्यक्तीसाठी दिवसाकाठी पन्नास लीटर पाणीपुरवठ्याची मर्यादा घालण्यात आली होती.
2014 साली ब्राझीलमध्ये साओ पाओलो इथे आणि ऑस्ट्रेलियातील पर्थमध्येसुद्धा अशीच परिस्थिती उद्भवली होती.
 
लांबणाऱ्या पाणीसंकटासाठी पुरेसं नियोजन नसणं, जलस्त्रोतांमध्ये साठ्याचा अभाव आणि हवामानबदल, हे घटक या परिस्थितीसाठी कारणीभूत असल्याचं मानलं जातं. पण ही समस्या किंवा त्यासाठी दिली जाणारी कारणं यांपैकी कोणतीही गोष्ट नवीन नाही.
 
1980 च्या दशकापासून जगातील पाण्याचा वापर दर वर्षी जवळपास एक टक्क्याने वाढतो आहे आणि 2050 पर्यंत पाणीवापरातील वाढीचा हाच दर कायम राहण्याचा अंदाज आहे.
 
पाण्याची वाढती मागणी आणि हवामानबदलाचे परिणाम यांमुळे जलस्त्रोतांवरील दबाव वाढेल, असं तज्ज्ञ म्हणतात.
 
तर, पृथ्वीवरील पाणी संपतं आहे का? या समस्येवर कोणता तोडगा आहे? या प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न आपण करणार आहोत.
एका बाजूला दुष्काळ, तर दुसऱ्या बाजूला पूर
सास्काचेवान विद्यापीठात ग्लोबल इन्स्टिट्यूट फॉर वॉटर सिक्युरिटीचे कार्यकारी संचालक असणारे आणि कॅलिफोर्नियात नासाचे वैज्ञानिक म्हणून काम केलेले जेम्स फॅम्लिएटी यांच्याशी आम्ही या प्रश्नाबाबत बोललो. कॅलिफोर्नियातील जंगलांमध्ये दर वर्षी आग लागते. परंतु, अमेरिकेतील फळांच्या व भाज्यांच्या मागणीची पूर्तता करण्याचा एक तृतीयांश वाटा कॅलिफोर्निया उचलतो, ही आश्चर्यकारक बाब आहे.
जेम्स सांगतात, "शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याबद्दल आपण बोलत असू, तर बहुधा जगातील शेती असणाऱ्या सर्वच प्रदेशांची परिस्थिती कॅलिफोर्नियासारखी असेल. त्या-त्या ठिकाणी घेतली जाणारी पिकं केवळ त्याच प्रदेशाच्या नव्हे तर इतर प्रदेशांच्यासुद्धा गरजा भागवतात. परंतु, त्या विशिष्ट प्रदेशातील शेतीची पाण्याची गरज इतर प्रदेश पूर्ण करत नसतात. ही पद्धत शाश्वत राहणारी नाही."
 
नासाने 2002 साली ग्रेस मिशनची सुरुवात केली.
 
पंधरा वर्षं चाललेल्या या अभियानामध्ये उपग्रहाद्वारे टिपण्यात आलेल्या प्रतिमांमधून पृथ्वीवरील जलस्त्रोतांची अवस्था आणि पाणीवाटपाची परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.
 
जेम्स म्हणतात, "ग्रेस मिशनमध्ये आम्हाला पृथ्वीच्या दोन्ही गोलार्धांमधील एका वैश्विक आकृतिबंधाची माहिती मिळाली. जगातील ज्या भागांमध्ये पाणी भरपूर प्रमाणात आहे, तिथे आणखी पाणी मिळतं आहे. तर इतर भाग दुष्काळी राहत आहेत. त्यामुळे मुबलक पाणी असलेल्या प्रदेशांमध्ये वारंवार पूर येतो, तर कोरड्या प्रदेशांमध्ये दुष्काळ पडतो."
 
जागतिक स्तरावर जलसाठे कोरडे होत जाण्याला जागतिक तापमानवाढ व शेती या दोन्ही गोष्टी जबाबदार आहेत. पण यात इतरही काही कारणं आहेत.
 
शहरीकरणाची वाढती व्याप्ती
जगाच्या लोकसंख्येतील 17.5 टक्के लोक भारतात राहतात, पण पृथ्वीवरील ताज्या पाण्याचे केवळ 4 टक्के स्त्रोत भारतात आहेत. सम्राट बझाक वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूटमध्ये भारताच्या शहरी पाणी कार्यक्रमाचे संचालक आहेत. अलीकडच्या वर्षांत लोकांचं उत्पन्न ज्या गतीने वाढलं आहे, त्या गतीने पाण्याची मागणीसुद्धा वाढली आहे, असं सम्राट सांगतात.
ते म्हणतात, "लोक एअर कंडिशनर, फ्रीज, वॉशिंग मशिन यांसारखी उपकरणं अधिक विकत घेऊ लागले आहेत. देशातील विजेच्या गरजेपैकी 65 टक्के वाटा औष्णिक ऊर्जा प्रकल्पांकडून येतो, त्यात पाण्याचा अधिकाधिक वापर असतो. विजेचा वापर वाढला, तर त्याच्या उत्पादनासाठी पिण्याच्या पाण्याची मागणीही तितकीच वाढेल."
 
वाढत्या उत्पन्नासोबत लोकांच्या खाण्यापिण्याच्या पद्धती बदलत आहेत, असं सम्राट म्हणतात. प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांची विक्री वाढली आहे, आणि आधीच्या तुलनेत पाण्याची गरजसुद्धा वाढली आहे.
 
या व्यतिरिक्त शहरीकरणाची वाढती व्याप्ती आणि पावसाचं पाणी वाया जाणं, यांमुळेसुद्धा मोठी समस्या निर्माम झाली आहे. देशात पिण्याच्या पाण्याच्या गरजेपैकी 85 टक्के गरज भूजलातून पूर्ण होते.
 
सम्राट सांगतात, "शहरीकरणाची रीत बदलते आहे. जमिनीच्या पृष्ठभागावर कॉन्क्रिटचं आवरण तयार केलं जातं आहे, त्यामुळे भूपृष्ठ टणक व अभेद्य होत चाललं आहे. त्याचप्रमाणे वृक्षतोड करून जमीन आकुंचित केली जाते आहे. यामुळे जमिनीत पाणी शोषलं जात नाही आणि पावसाचं पाणी वाहून या व्यवस्थेच्या बाहेर निघून जातं."
 
देशातील सुमारे 79 टक्के घरांमध्ये पिण्याच्या पाण्याचा नळ पोचलेला नाही. अनेक भागांमध्ये लोकांना पाणी विकत घ्यावं लागतं आहे. देशात दूषित पाण्यामुळे दर वर्षी सुमारे दोन लाख लोक मृत्युमुखी पडतात, तर हजारो लोक आजारी पडतात.
 
पाणीसंकटामुळे कुटुंबांसोबतच समाजावरही परिणाम होतो.
 
सम्राट म्हणतात, "पाणीसंकट व्यक्तीला गरिबीच्या अखंडित दुष्टचक्रामध्ये ढकलतं आणि समाजातील विषमता वाढवतं. सामजिक व आर्थिकदृष्ट्या मागास लोकांना पाण्यावर आणखी खर्च करणं शक्य होत नाही. याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो आणि ते या दुष्टचक्रात अडकत जातात."
 
कॅलिफोर्निया व भारत इथे जे काही होतं आहे, तीच परिस्थिती जगातील इतर अनेक भागांमध्ये आहे. पण पृथ्वीवरील पाणी संपतं आहे, असं आपल्याला म्हणता येईल का?
 
गरज आणि वापर
मिनेसोटा विद्यापीठात ग्लोबल वॉटर इनिशिएटिव्हमध्ये मुख्य वैज्ञानिक असणाऱ्या केट ब्राउमेन म्हणतात की, पाण्याची कमतरता ही खरी समस्या नसून त्याची गरज व उपलब्धता ही समस्या आहे.
 
त्या म्हणतात, "हवामानबदलामुळे जास्त पूर येईल आणि दुष्काळसुद्धा पडेल, हे आपल्याला माहीत असतं. वास्तविक पृथ्वीवरील पाणी कमी झालेलं नाही, पण गरज नसते तेव्हा आपल्याला जास्त पाणी मिळतं आणि जिथे गरज असते तिथे मिळत नाही."
शहरीकरणामुळे पावसाचं पाणी आता जमिनीत मुरत नाही, या सम्राट बझाक यांच्या प्रतिपादनाशी केट सहमत आहेत. परंतु, हा केवळ पुरवठ्याचा मुद्दा नाही, तर त्याला आणखीही काही कारणं आहेत, असं त्या म्हणतात.
 
"या संकटाचं एक मोठं कारण पाण्याच्या वापराशी संबंधित आहे. पृथ्वीवर उपलब्ध पाण्यानुसार त्याचा वापर करायला हवा, हे आपण अजून शिकलेलो नाही. पाणी संपतं आहे, असं आपण म्हणतो तेव्हा वास्तविक आपल्याला पाण्याचा हवा तितका वापर करता येत नाही एवढाच मुद्दा असतो."
 
पाण्याचा वापर कसा होतो यावर बरंच काही अवलंबून असतं, असं केट म्हणतात. शेत मोठं असेल तर बाष्पीभवन जास्त होतं, घरात वापर झालेलं पाणी फेकून दिलं तर ते वाहून जाईल. यातून जलचक्र सुरू राहील, परंतु भूजलपातळी वाढणार नाही किंवा पाणी पुढील वापरासाठी उपलब्धही होणार नाही.
 
केट म्हणतात, "प्रदूषण हीसुद्धा मोठी समस्या आहे. पाणी उपलब्ध आहे, पण ते वापरण्यालायक नसेल, तर ते असून नसल्यासारखंच आहे. पाणी पोचण्यासाठी पायाभूत सुविधा आवश्यक आहेत. पाणी किती आहे आणि किती घरांपर्यंत पोचणार आहे, यासंबंधीचे निर्णय महत्त्वाचे असतात. अभावातून विषमता उगम पावते."
 
केट यांच्या म्हणण्यानुसार पृथ्वीवरील पाणी येत्या काळात बहुधा संपणार नाही, पण वाढत्या लोकसंख्येमुळे आव्हानं मात्र निश्चितपणे वाढतील.
 
समस्यांवर तोडगा कसा काढायचा?
'द नेजर कन्झर्वन्सी'मध्ये रेझिलिएन्ट वॉटरशेड स्ट्रॅटेजीचे संचालक असणारे डॅनिएल शेमी म्हणतात की, पाणीसंकटावर तोडगा काढण्याची सुरुवात शेतापासून व्हायला हवी.
 
ते म्हणतात, "कोणत्या ठिकाणी कोणतं पीक घेतलं जातं, याबाबत ताळमेळ फारसा नाही. पाण्याचा योग्य वापर करत असताना कोणत्या प्रकारची शेती करता येईल, हे आपण शिकायला हवं. त्यासाठी तज्ज्ञांची मदत घेता येऊ शकते."
यासाठी आपण किती तयार आहोत, हा वेगळा मुद्दा होईल. डॅनिएल यांच्या म्हणण्यानुसार, जलप्रदूषणावर मात करण्यासाठी आपण सज्ज आहोत. बहुतांश वेळा ही जबाबदारी सरकारव असते आणि सरकार संबंधित उद्योगांना त्यासाठी बांधील ठरवतं, पण जलशुद्धीकरणाचं काम खर्चिक असतं, त्यामुळे ही एक मोठी अडचणसुद्धा होते.
 
आपण समुद्राचं पाणी पिण्यालायक करू शकतो का, असाही एक प्रश्न आहे.
 
डॅनिएल म्हणतात, "हे तंत्र रोचक आहे, पण सध्या तरी खाऱ्या पाण्यातून मीठ बाजूला काढण्याची प्रक्रिया खूप महाग आहे, इतकंच नव्हे तर ऊर्जावापराच्या दृष्टीने ती प्रक्रिया योग्य नाही. विशेषतः ऊर्जासंकट हा आधीपासूनच मोठा प्रश्न निर्माण झालेला असताना हा मुद्दा विचारात घ्यावा लागतो."
 
या प्रक्रियेत निर्माण होणाऱ्या मिठाचं काय करायचं, असाही एक प्रश्न यात उद्भवतो. हे मीठ जमिनीवरही टाकता येणार नाही आणि समुद्रातही फेकता येणार नाही.
 
मग पाणीसंकटावर मात कशी करायची?
डॅनिएल सांगतात, "उद्यानांमध्ये आणि गावांमध्ये व शहरांमध्ये अस्तित्वात असलेल्या हिरव्यागार प्रदेशांत ही शक्यता लपलेली आहे. हे प्रदेश स्पंज म्हणून काम करतात. म्हणजे आपण कॉन्क्रिटच्या आवरणाऐवजी पाणी शोषून घेणाऱ्या जमिनी अधिक ठिकाणी निर्माण केले, तर पावसाचं पाणी वाया जाणार नाही आणि भूजलपातळी वाढेल."
परंतु, असे प्रयत्न करून आपल्याला खरोखरच भूजलपातळीची परिस्थिती सुधारता येईल का?
 
लहान प्रयत्न, मोठे बदल
तरुण भारत संघ या संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र सिंह गेली चाळीस वर्षं राजस्थानच्या ओसाड जमिनीवर हिरवळ फुलवण्याचा प्रयत्न करत आहेत. ते 'भारताचे वॉटरमॅन' म्हणून ओळखले जातात.
 
पृथ्वीवरचं पाणी संपत नाहीये, तर त्यावरचं अतिक्रमण, त्याचं प्रदूषण आणि शोषण वाढलं आहे, असं ते म्हणतात.
"पाण्याचा प्रश्न आधुनिक शिक्षणाने आणखी गंभीर झाला आहे. आधुनिक शिक्षणातील आपलं तंत्रज्ञान आणि आपल्या अभियांत्रिकी रचना नैसर्गिक संसाधनांचा अधिकाधिक वापर करण्याला विकासाचं परिमाण मानतात. हे परिमाण आपल्यासाठी भयंकर आहे. अशा शिक्षणामुळे लोक 200 ते 300 फुटांपर्यंत खोल जाऊन भूजल बाहेर काढत आहेत," असं भाष्य सिंग करतात.
 
जगभरात भूजलाचा जितका वापर होतो, त्यातील 25 टक्के वापर एकट्या भारतात होतो. याबाबतीत चीन आणि अमेरिका यांना भारताने मागे सोडलं आहे.
 
पाणीसंकटामुळे विविध समुदायांमध्ये तणाव निर्माण होतो, शिवाय नवीन आव्हानंही उभी राहतात, असं राजेंद्र सिंह नमूद करतात.
 
ते म्हणतात, "पाण्याच्या कमतरतेमुळे संपूर्ण जगात विस्थापन वाढतं आहे. या कारणामुळे स्थलांतर करणाऱ्या लोकांना 'क्लायमेट रेफ्यूजी' असं म्हटलं जातं. पाणीसंकटामुळे तिसऱ्या जगात जलयुद्ध होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आपण एका बाजूने पाण्याचा वापर सजगपणे करायला हवा, तर दुसऱ्या बाजूला पाण्याचं संवर्धन करून त्यावरील सामुदायिक अधिकार टिकवून ठेवण्याचाही प्रयत्न व्हायला हवा. पाण्यावरील लोकांच्या अधिकाराला बड्या उद्योगांकडून सर्वाधिक धोका आहे आणि हेच सर्वांत मोठं आव्हानसुद्धा आहे."
 
राजेंद्र सिंह यांच्या मते, पाणीसंकटाची समस्या सोडवता आली, तर हवामानबदलाची दिशासुद्धा बदलणं शक्य होईल.
 
ते म्हणतात, "पाणीच हवामान आहे आणि हवामान म्हणजेच पाणी आहे, असं मला माझ्या चाळीस वर्षांच्या अनुभवावरून वाटतं. जगाला जागतिक तापमानवाढीपासून किंवा हवामानबदलापासून स्वतःचा बचाव करायचा असेल, तर पाण्याचं योग्य नियोजन करावं लागेल, हिरवळ वाढवावी लागेल आणि पाण्यामुळे होणारा मातीचा ऱ्हास व गाळनिर्मिती यांवरही उपाय करायला हवा. तरच पाण्याच्या संवर्धनातून भूजलाच्या पुनर्भरणाची प्रक्रियासुद्धा गतिमान होईल."
 
जलसंवर्धनासाठी मोठमोठ्या योजनांची गरज आहे का?
राजेंद्र सिंह म्हणतात, "लहान-लहान कामं एकत्र आली की त्यातून मोठं परिवर्तन घडतं. मोठ्या धरणांची सुरुवात विस्थापनाने होते. लहान योजना आखल्या तर असं होत नाही. 11,800 लहान योजनांमुळे 10,600 चौरस किलोमीटरांच्या प्रदेशातील पर्यावरण हिरवंगार झालं, तसं एका मोठ्या धरणाला करता येत नाही."
आता, पृथ्वीवरील पाणी संपतं आहे का, या आपल्या प्रश्नाकडे परत येऊ.
 
एका मांडणीनुसार, जगातील अर्ध्या लोकसंख्येसमोर 2050 साल उजाडेपर्यंत पाणीसंकट उभं राहिलेलं असेल. तेव्हा जगातील 36 टक्के शहरांमध्ये पाण्याचा तुटवडा निर्माण होईल.
 
हवामानबदल, वाईट नियोजन, जलस्त्रोतांची रोडावती संख्या आणि गुंतवणुकीची कमतरता, अशी विविध कारणं या परिस्थितीला कारणीभूत आहेत. परंतु, तज्ज्ञांनी म्हटल्यानुसार, ही समस्या पाणी संपण्याशी संबंधित नसून पाण्यासोबतचं माणसाचं नातं संपण्याशी जोडलेली आहे.
 
या समस्येवर उपाय आहे, परंतु त्यासाठी आपल्याला आपली जीवनशैली बदलावी लागेल आणि पाण्याच्या वापराचा पुनर्विचार करावा लागेल. तरच भविष्यात प्रत्येक व्यक्तीला आणि प्रत्येक ठिकाणी गरजेनुसार पाणी उपलब्ध असेल.
 
अन्यथा, बेन्जामिन फ्रँकलीन यांनी म्हटल्यानुसार, विहीर कोरडी पडल्यावर आपल्याला पाण्याचं मोल लक्षात येईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

प्रसिद्ध व्हायोलिनवादक प्रभाकर जोग यांचे वृद्धापकाळाने निधन