ब्राझीलमध्ये 24 तासांत 2 हजार कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुन्हा संसर्ग वाढल्यानंतर देशातला हा एका दिवसातला आतापर्यंतचा सर्वाधिक मोठा आकडा आहे.
जगभरात अमेरिकेनंतर कोरोना रुग्णांच्या मृतांच्या आकडेवारीत ब्राझील दुसऱ्या क्रमांकावर आहे. ब्राझीलमध्ये आतापर्यंत तब्बल 2 लाख 68 हजार 370 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.
बुधवारी (10 मार्च) 2,286 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली.
कोरोना विषाणूच्या संसर्गजन्य प्रकारांमुळे प्रादुर्भाव वाढत असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
10 मार्चला माजी राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांनी साथीच्या रोगादरम्यान राष्ट्राध्यक्ष जेर बोल्सोनारो यांनी घेतलेल्या निर्णयांवर जोरदार टीका केली.
बोल्सोनारो यांनी महिन्याभरात पहिल्यांदा मास्क घातल्याचे दृश्य दिसले. त्यांनी व्हायरसमुळे निर्माण होणारा धोका कमी करण्याचा सातत्याने प्रयत्न केला. गेल्या आठवड्यात त्यांनी लोकांना "ओरडणं बंद करा." असं सांगितलं.
ब्राझीलमधील बहुतेक मोठ्या शहरांमध्ये आरोग्य यंत्रणांवर प्रचंड दबाव आला आहे आणि यंत्रणा कोसळण्याचीही शक्यता आहे असा इशारा ब्राझीलचे अग्रगण्य सार्वजनिक आरोग्य केंद्र फिओक्रूझ यांनी दिला.
फिओक्रूझ येथील डॉक्टर आणि संशोधक मार्गारेट डाल्कोलो यांनी सांगितले की, देशाने "साथीच्या रोगाचा सर्वात वाईट काळ पाहिला."
"2021 हे वर्ष देखील कठीण असणार आहे," एएफपी न्यूस संस्थेशी बोलताना त्यांनी सांगितलं.
नेमकी काय परिस्थिती आहे?
बुधवारी (10 मार्च) देशात 79,876 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. एकाच दिवसात नोंद झालेल्या रुग्णांची तिसरी सर्वाधिक संख्या आहे.
काही दिवसांपासून विषाणूच्या अत्यंत संसर्गजन्य प्रकारामुळे प्रसार अधिक होतोय. हा पी-1 प्रकार आहे. याची सुरुवात अॅमेझॉन शहरात झाली असे मानले जाते.
10 मार्चला एकूण 2,286 लोकांचा मृत्यू झाला आहे.
फिओक्रूझच्या मते, 15 राज्यांच्या राजधान्यांमध्ये अतिदक्षता विभाग (ICU) आहेत ज्याची क्षमता 90 टक्क्यांहून अधिक आहे.
रिपोर्ट्सनुसार, राजधानी ब्रासिलियामध्येही आता पूर्ण क्षमतेची ICU व्यवस्था आहे. तर पोर्टो अलेग्रे आणि आणि कॅम्पो ग्रांदे या दोन शहरांनी आरोग्य व्यवस्थेची क्षमता वाढवली आहे.
कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येऊ शकतो तसंच यंत्रणा कोसळण्याचीही शक्यता आहे असा इशाराही संस्थेने आपल्या अहवालात दिला आहे.