Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोरोनाः WHOने दिलेल्या या 5 टिप्स तुम्ही वाचल्यात का?

कोरोनाः WHOने दिलेल्या या 5 टिप्स तुम्ही वाचल्यात का?
, शुक्रवार, 15 मे 2020 (15:40 IST)
कोरोना संकटाच्या काळात अनेक बदल घडत आहेत. कामकाज, स्वच्छतेपासून ते अगदी खाण्या-पिण्याच्या सवयीपर्यंत बरंच काही बदललं आहे.
आरोग्य, खाण्या-पिण्याच्या सवयी आणि स्वच्छता या गोष्टींना अचानक प्राधान्य आलं आहे. आजकाल लोकांना अशीही भीती वाटू लागली आहे की कोरोना खाण्या-पिण्याच्या पदार्थातूनही पसरतो का?
त्यामुळेच जागतिक आरोग्य संघटनेने सुरक्षित खाण्या-पिण्यासंबंधी काही टिप्स दिल्या आहेत.
स्वच्छता पाळा
स्वयंपाक करण्यापूर्वी आणि करताना वारंवार हात धुवायला विसरू नका.
टॉयलेटच्या वापरानंतर हात स्वच्छ धुवा.
स्वयंपाकाची जागा, गॅस, भांडी सॅनेटाईज्ड करा.
स्वयंपाकघरात किडे-किटक येणार नाहीत, याची काळजी घ्या.
 
का गरजेचं आहे?
बहुतांश सूक्ष्मजीव म्हणजेच बॅक्टेरिया, फंगस आजार पसरवत नाहीत. मात्र, यात काही जीव असेही असतात जे पाणी, माती, प्राणी आणि मानवी शरीरातही आढळतात.
हे सूक्ष्मजीव आपले हात, साफ-सफाईसाठी कामात येणारी फडकी, भांडी, चॉपिंग बोर्डवर राहू शकतात.
अन्नपदार्थात हे सूक्ष्मजीव मिसळले गेले तर आजार होण्याची शक्यता असते.
कच्च अन्न शिजवलेल्या अन्नापासून दूर ठेवा
पोल्ट्री प्रोडक्ट, कच्च मांस आणि सीफूड हे कच्चे पदार्थ शिजवलेल्या अन्नापासून दूर ठेवा.
कच्चे पदार्थ हाताळताना वेगळा चाकू, वेगळा चॉपिंग बोर्ड अशी वेगळी भांडी वापरा.
शिजवलेलं अन्न आणि कच्च अन्न यांचा संपर्क येऊ नये, यासाठी पदार्थ डब्यात बंद करून ठेवा.
का गरजेचं आहे?
कच्च अन्न विशेषतः पोल्ट्री प्रोडक्ट्स, कच्च मांस, सीफूड यांच्यात काही घातक सूक्ष्मजीव असतात. हे सूक्ष्मजीव अन्न शिजवताना इतर पदार्थांना संक्रमित करू शकतात.
अन्न चांगलं शिजवा
पोल्ट्री प्रोडक्ट्स, अंडी, मांस, सीफूड हे पदार्थ पूर्णपणे शिजले पाहिजे.
सूप आणि स्ट्यू सारखे पदार्थ उकळताना पाण्याचं तापमान 70 अंश सेल्सियसपर्यंत जाईल, याची काळजी घ्या. मांस शिजवताना ते कुठेही गुलाबी राहता कामा नये, याची काळजी घ्या. यासाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे तापमान मोजण्यासाठी थर्मामीटरचा वापर करा.
शिजवलेल्या अन्नाला दुसऱ्यांदा चांगलं गरम करा.
का गरजेचं आहे?
अन्न चांगलं शिजवल्यास उष्णतेमुळे सूक्ष्मजीव पूर्णपणे नष्ट होतात. संशोधन असं सांगतं की 70 अंश सेल्सियस तापमानवर शिजवलेलं अन्न खाण्यासाठी योग्य असतं.
खिमा किंवा अख्खी कोंबडी शिजवताना विशेष काळजी घ्यावी.
सुरक्षित तापमानावर अन्न सुरक्षित ठेवा
शिजवलेलं अन्न रुम टेम्परेचरला दोन तासांपेक्षा अधिक वेळ ठेवू नये.
शिजवलेलं अन्न, विशेषतः लवकर खराब होणारे पदार्थ फ्रीजमध्ये 5 अंश सेल्सियसपेक्षा कमी तापमानात ठेवा.
जेवण वाढण्याआधी ते किमान 60 अंश सेल्सियस तापमानावर गरम करा.
फ्रीजमध्येही अन्न जास्त वेळ ठेवू नका.
फ्रोजन फूड रुम टेम्परेचर अधिक काळ ठेवू नका.
का गरजेचं आहे?
शिजवलेलं अन्न जास्त वेळ रुम टेम्परेचरला ठेवलं तर त्यात सूक्ष्मजीव वेगाने तयार होतात.
5 अंश सेल्सियसपेक्षा कमी किंवा 60 अंश सेल्सियसपेक्षा जास्त तापमानावर सूक्ष्मजीव एकतर तयारच होत नाहीत किंवा तयार झालेच तर त्याचा वेग अत्यंत संथ असतो.
मात्र, काही घातक बॅक्टेरिया असेही आहेत जे 5 अंश सेल्सियसपेक्षा कमी तापमानावरही जिवंत राहू शकतात.
स्वच्छ पाणी आणि खाद्य सामुग्री
शुद्ध पाणी वापरा आणि शुद्ध पाणी उपलब्ध नसेल तर ते शुद्ध करूनच वापरा.
ताजं आणि पौष्टिक आहार घ्या.
सुरक्षित प्रक्रिया केलेल्या पदार्थांचा वापर करा. उदाहरणार्थ पॉश्चराईज्ड दूध.
फळं आणि भाज्या स्वच्छ धुवून वापरा. विशेषतः कच्चे खाणार असाल तर.
मुदत संपलेले पदार्थ खाऊ नका.
का गरजेचं आहे?
पाणी आणि बर्फामध्ये काही सूक्ष्मजीव किंवा घातक बॅक्टेरिया असू शकतात. खराब आणि शिळ्या अन्नात विषारी रसायनं तयार होण्याची शक्यता असते.
खाद्यपदार्थ विकत घेताना काळजी घेण्याची गरज आहे. शिवाय, हे पदार्थ स्वच्छ धुवून त्यापासून निर्माण होणारे धोके टाळता येऊ शकतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शाकाहारी लोकांना Corona संसर्ग, जाणून घ्या एक्सपर्ट काय म्हणतात