19 मार्च 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टेलिव्हिजनच्या माध्यमातून बोलताना कोरोनाचा उल्लेख केला. 22 मार्चला संपूर्ण देशभरात एकदिवसीय कर्फ्यू असेल असं त्यांनी जाहीर केलं. 25 मार्च रोजी त्यांनी लॉकडाऊनची घोषणा केली. हा लॉकडाऊन काही महिने चालला.
लॉकडाऊनच्या घोषणेला आता वर्षपूर्ती होते आहे. कोरोनाची एक मोठी लाट भारताने अनुभवली आहे. अन्य मोठ्या देशांमध्ये कोरोना सातत्याने डोकं वर काढतो आहे. भारताने अन्य मोठ्या देशांच्या तुलनेत मृत्यूदर कमी ठेवण्यात यश मिळवलं आहे. लशीकरण मोहीम सुरू आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी लशीकरण मोहिमेची गती वाढवणं आवश्यक आहे.
सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या असणाऱ्या सहा देशांपैकी फक्त भारताने दुसरी लाट अनुभवलेली नाही. सप्टेंबरच्या मध्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली. फेब्रुवारीपर्यंत ही संख्या मोठ्या प्रमाणावर घटली.
गेल्या महिन्याभरात नव्या रुग्णांची संख्या वाढली आहे. मात्र पहिल्या लाटेत ज्या प्रमाणात रुग्णसंख्या होती त्यापेक्षा हे प्रमाण कमी आहे.
18 मार्चला जो आठवडा संपला त्याची आकडेवारी पाहिली तर दररोज साधारण 30,000 नवे रुग्ण आढळत आहेत. सप्टेंबरमध्ये हेच प्रमाण दिवसाला 93,000 रुग्ण एवढं होतं.
अमेरिकेत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. अमेरिकावासीयांनी कोरोनाच्या तीन लाटा अनुभवल्या आहेत. ब्राझील आणि रशियामध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे.
सध्या देशातल्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत जाऊन दुसरी लाट आली असं झालं तरी भारताने कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांमध्ये सगळ्यांत कमी रुग्णसंख्या नोंदवली आहे.
मात्र ही सर्वांगीण गोष्ट नाही. देशातल्या काही राज्यांमध्ये कोरोनाच्या अनेक लाटा तडाखा देऊन गेल्या आहेत. दिल्लीवासीयांनी कोरोनाच्या तीन लाटा अनुभवल्या आहेत. महाराष्ट्रातील नागरिक दुसऱ्या लाटेचा त्रास अनुभवत आहेत.
जागतिक आकडेवारीत भारत कुठे?
गेल्या वर्षी काही आठवडे सर्वाधिक कोरोना रुग्णांच्या यादीच भारताचा अव्वल क्रमांक होता. मात्र त्या टप्प्यानंतर भारतातील कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे.
सप्टेंबर महिन्यात जगातील सर्वाधिक कोरोना रुग्ण तसंच कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या भारतात सर्वाधिक होती. नव्या रुग्णांपैकी एक तृतीयांश तर एकूण मृत्यूंपैकी एक पंचमांश रुग्ण भारताचे होते.
मात्र फेब्रुवारी 2021पर्यंत परिस्थिती अमूलाग्र बदलली आहे. नव्या रुग्णांच्या संख्येच्या देशनिहाय यादीत भारत सातव्या स्थानी आहे.
मृत्यूदराबाबतीत भारत अठराव्या स्थानी आहे. फेब्रुवारी महिन्यात जागतिक आकडेवारीत नव्या रुग्णांच्या एकूण तीन टक्के रुग्ण भारतात होते तर मृत्यूदराच्या बाबतीत भारताची आकडेवारी केवळ एक टक्का इतकीच होती.
मात्र मार्च महिन्यात रुग्णसंख्या वाढू लागल्याने हा आलेख बदलण्याची शक्यता आहे.
मृत्यूदर कमी
मृत्यूदराच्या पातळीवर जागतिक सरासरीपेक्षा भारताचा मृत्यूदर कमी आहे. कोरोनामुळे जगभरात जेवढे मृत्यू झाले आहेत त्याच्या सहा टक्के मृत्यू भारतात नोंदवले गेले आहेत. कोरोनाबाधितांचं भारतातलं प्रमाण जगाच्या आकडेवारीच्या 9.5टक्के एवढं आहे.
जगभरात 2.7 दशलक्ष नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. जगात 121.8 दशलक्ष लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला. मृत्यूदराचं प्रमाण 2.2 टक्के आहे.
भारतात, 1,59,000 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना बाधितांची देशातली संख्या 11.5 दशलक्ष एवढी आहे. मृत्यूदराचं भारतातलं प्रमाण 1.4 टक्के एवढं आहे. जगभरात सर्वाधिक कोरोना रुग्ण असणाऱ्या दहा देशांमध्ये भारताचा मृत्यूदर सगळ्यांत कमी आहे.
भारतात मृत्यूदर कमी राहिला याची अनेक कारणं तज्ज्ञांनी मांडली आहेत. अन्य विकसित देशांच्या तुलनेत भारतात युवा वर्गाचं प्रमाण जास्त आहे.
जागतिक बँकेने जमा केलेल्या माहितीनुसार, सर्वाधिक कोरोना रुग्ण असणाऱ्या देशांमध्ये, 65 पेक्षा कमी वयाच्या नागरिकांचं प्रमाण भारतात सर्वाधिक आहे.
अन्य कारणांमध्ये जनुकीय रचना, साथीच्या रोगांचा सामना करण्याची क्षमता, रोगप्रतिकारक्षमता सक्षम असणं ही कारणंही आहेत.
कोरोना मृत्यूदर आणखी कमी करण्यात भारत यशस्वी ठरू शकतो. गेल्या आठ महिन्यात जागतिक पातळीवर कोरोना मृत्यूची आकडेवारी पाहिल्यानंतर हे लक्षात येतं. भारतात आलेली कोरोनाची कथित लाट पहिल्या लाटेइतकी जीवघेणी नाही. आरोग्ययंत्रणा सपशेल अपुरी ठरली तरच मृत्यूदर वाढू शकतो.
कठोर लॉकडाऊन
मार्च 2020मध्ये देशात अनेक ठिकाणी कोरोनाचे रुग्ण सापडू लागले. विविध राज्य सरकारांनी आवश्यक उपाययोजना केल्या. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे हे लक्षात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्च रोजी जनता कर्फ्यू लागू केला.
25मार्च ते 19एप्रिल या कालावधीसाठी लागू करण्यात आलेला लॉकडाऊन कठोर स्वरुपाचा होता. लॉकडाऊन वाढवण्यात आला. जून महिन्यानंतर लॉकडाऊनची कठोरता कमी करण्यात आली.
हळूहळू निर्बंध हटवण्यात आले. परंतु भारतातला लॉकडाऊन जगातल्या कठोर लॉकडाऊनपैकी एक होता असं स्ट्रिंजन्सी इंडेक्स या संस्थेने म्हटलं आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठातर्फे हे संशोधन विकसित करण्यात आलं आहे.
लॉकडाऊन काळात स्ट्रिंजसी अर्थात कठोरतेची पातळी शंभर असल्याचं इंडेक्समध्ये स्पष्ट झालं. सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशांमध्ये भारताचा लॉकडाऊन सगळ्यांत कठोर स्वरुपाचा होता.
कठोर स्वरुपाच्या लॉकडाऊनचा फटका भारताच्या अर्थव्यवस्थेला बसला. भारताचा जीडीपी जून 2020मध्ये 23.9 टक्क्यांनी घसरला. इकॉनॉमिक टाईम्सनुसार कोरोनामुळे अर्थव्यवस्थेला सर्वाधिक तडाखा भारताला बसला आहे.
जनजीवन पूर्वपदावर
लॉकडाऊन हळूहळू शिथिल करण्यात आला. जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागलं. गुगलच्या कोव्हिड19 मोबिलिटी रिपोर्टनुसार, ज्यामध्ये लोकांचं जाण्यायेण्याचं प्रमाण अभ्यासलं जातं. कोव्हिडपूर्व काळातल्या माहितीशी कोव्हिड काळातील माहितीशी तुलना करण्यात आली. भारतात जनजीवन सनदशीर पद्धतीने पूर्वपदावर आलं असं या अहवालातून स्पष्ट झालं आहे.
रिटेल, रिक्रिएशन, सुपरमार्केट, फार्मसी, पब्लिक पार्क, पब्लिक ट्रान्सपोर्ट, वर्कप्लेस, रेसिडेन्स या निकषांच्या आधारे जनजीवन पूर्वपदावर आलं हे ठरवण्यात येतं.
लसीकरण विस्कळीत
भारतात 16 जानेवारीपासून लशीकरण मोहिमेला सुरुवात झाली. दोन महिन्यांनंतर, 16 मार्चला देशभरात 35.1दशलक्ष लशीचे डोस देण्यात आले आहेत असं अवर वर्ल्ड इन डेटाने म्हटलं आहे.
सर्वाधिक कोरोना रुग्ण असणाऱ्या देशांपैकी, भारताची लसीकरण आकडेवारी दुसऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिकेत लसीकरणाचे आकडे सर्वाधिक आहेत. तिथे 111दशलक्ष लोकांना लस देण्यात आली.
भारताच्या साधारण एक महिना आधी अमेरिकेत लसीकरणाला सुरुवात झाली.
देशात लसीकरणाचा वेग वाढतो आहे. दिवसाला 1.5दशलक्ष लोकांना लस देण्यात येते आहे. आठवडाभरापूर्वी हे प्रमाण 0.5दशलक्ष एवढं होतं.
जगातल्या सर्वाधिक लोकसंख्येच्या देशांमध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो. एवढ्या खंडप्राय लोकसंख्येचं लसीकरण करणं अवघड आहे. सध्याच्या वेगाने म्हणजे दिवसाला 1.5दशलक्ष लशीचे डोस दिले जात आहेत.
प्रत्येक व्यक्तीला लशीचे दोन डोस दिले जातील. या गतीने लसीकरण सुरू राहिल असं गृहित धरलं तर अडीच वर्षांत जेमतेम निम्म्या लोकसंख्येला लशीचा डोस मिळालेला असेल. परंतु लसीकरण अधिक गतिमान होण्याची चिन्हं आहेत. गंभीर व्याधी असलेल्या तसंच ज्येष्ठ नागरिकांना लवकरात लवकर लस मिळेल अशी आशा आहे.