कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी भारतात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनला जवळपास एक महिना झाला आहे. 3 मेनंतर हे लॉकडाऊन पुन्हा आणखी वाढणार का, असा प्रश्न अनेकांच्या मनात असेल.
लॉकडाऊन काढला तर काय होईल? लॉकडाऊन नाही उघडला तर मग काय होईल? जगात कोणते देश काय करत आहेत? आणि ढालीचं धोरण हा लॉकडाऊनला पर्याय असू शकतो का?
या प्रश्नांची उत्तरं बीबीसी मराठीनं शोधण्याचा प्रयत्न केलाय.
लॉकडाऊनमुळे कोरोनाचा प्रसार थांबतो का?
लॉकडाऊनची घोषणा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, 21 दिवसांचा लॉकडाऊन पाळणं हा कोरोनावर विजय मिळवण्याचा महत्त्वाचा भाग आहे.
मात्र, 21 दिवसांचा लॉकडाऊन देशभर पाळला जात असतानासुद्धा देशभरात कोव्हिड-19च्या रुग्णांची संख्या हळूहळू वाढत आहेच.
मग लॉकडाऊनचा फायदा झाला की नाही?
अमेरिका किंवा इटलीचे सुरुवातीचे दिवस पाहिल्यास आपल्या लक्षात येईल की, सुरुवातीच्या दिवसात लॉकडाऊन न केल्यानं वणवा भडकल्यासारखा प्रसार होतो. तसं भारतात झालेलं दिसलं नाही.
म्हणजे लॉकडाऊनमुळे कोरोनाचा फैलाव झाला, पण तो झपाट्याने होण्याऐवजी हळूहळू झाला.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी तज्ज्ञांच्या हवाल्याने सांगितलंय की, "लॉकडाऊनमुळे कोरोना निघून जात नाही, तो फक्त पॉझ होतो, म्हणजे तात्पुरता थांबतो. पण लॉकडाऊन संपलं आणि लोक एकमेकांना भेटू लागतात आणि कोरोना पुन्हा वेगाने पसरू लागतो.
"लॉकडाऊन हा उपाय नाही, ते पॉझ बटण आहे. कोरोना व्हायरसचा लॉकडाऊनमुळे पराभव होऊ शकत नाही, तर तो काही काळ थांबू शकतो. लॉकडाऊनमुळे काम संपलं नाहीय, काम पुढे ढकललं गेलंय," असं राहुल गांधी म्हणाले होते.
आता देशातला लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्यात आलाय, पण त्यानंतर काय होणार हा सगळ्यांना प्रश्न पडलाय. कारण लॉकडाऊन काढला तर पुन्हा केसेस वाढणार. आणि लॉकडाऊन सुरूच ठेवला तर अर्थव्यवस्था खड्ड्यात जाणार. हा तर मोठाच पेचप्रसंग आहे.
यावर अनेक देशांनी वेगवेगळे मार्ग काढलेत. ब्रिटनमध्ये ढालीचं धोरण नावाचा पर्याय काढला आहे.
ढालीचं धोरण काय आहे?
Shielding Policy किंवा ढालीचं धोरण म्हणजे ज्यांना कोरोनापासून जिवाचा धोका आहे, अशा लोकांभोवती सुरक्षेची ढाल उभी करायची आणि बाकीच्यांनी कामाला लागायचं.
कोरोना व्हायरसला देशभर थोपवण्याचे प्रयत्न करत बसण्यापेक्षा फक्त त्याच लोकांचं संरक्षण करायचं ज्यांना सगळ्यांत जास्त धोका आहे. याला इंग्रजीत Shielding असं म्हणतात. Shield म्हणजे ढाल.
आता पाहूया कुणाला सगळ्यांत जास्त या ढालीची गरज आहे :
60 वर्षांपेक्षा ज्यांचं वय जास्त आहे
ज्यांचं अवयव प्रत्यारोपण झालंय
कॅन्सरसाठी किमोथेरपी किंवा रेडिओथेरपी घेणारे
प्रतिकारशक्ती कमी करणारी औषध घेणारे
गरोदर स्त्रिया ज्यांना हृदयाशी संबंधित आजार आहेत
सिस्टिक फायब्रोसिस, सिव्हियर अस्थमा किंवा श्वसनाशी संबंधित गंभीर आजार असणारे
जास्त वय आणि वरच्या पैकी कोणताही आजार असणाऱ्यांसाठी कोव्हिड जीवघेणा ठरू शकतो. मग तरुणांनीही महिनोन् महिने घरात बसून राहायची गरज आहे का, असा प्रश्न आता जगभरच्या तज्ज्ञांना पडलाय.
एडिनबरा विद्यापीठाचे प्रा. मार्क वुलहाऊस सांगतात की, "80 टक्के लोकांसाठी कोरोना हा त्रासदायक व्हायरस आहे, पण जीवघेणा नाही. ते सगळे कामावर गेले तर आणि त्यांच्यात फैलाव झाला तरी आरोग्य व्यवस्थेवर ताण येणार नाही. त्यामुळे सगळा देश बंद करण्याची गरज नाही. पण मग ढालीचं धोरण अतिशय कडक पद्धतीने पाळावं लागेल."
ब्रिटनमध्ये वयोवृद्ध आणि आजारी लोकांसाठी ढालीचं धोरण 12 आठवड्यांसाठी आहे. म्हणजे 12 आठवडे त्यांनी कोणत्याही कारणासाठी - अगदी महत्त्वाच्या गोष्टी विकत घेण्यासाठीसुद्धा - घराबाहेर पाऊलही ठेवायचं नाही. या वयोवृद्ध आणि आजारी लोकांना जे जीवनावश्यक वस्तू पुरवण्यासाठी किंवा तपासण्यासाठी जातील, त्यांची आधी कोरोनासाठी चाचणी घेण्यात येईल.
या धोरणाअंतर्गत जर तुमच्या घरात वयोवृद्ध किंवा आजारी व्यक्ती असेल आणि तुम्ही घराबाहेर जात असाल तर शक्यतो तुम्ही वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहावं. शक्य असल्यास वेगळं बाथरूम वापरावं. टॉवेल्स वेगळे असावेत. भांडी वेगळी असावीत. एकमेकांच्या शक्यतो समोरासमोर येऊ नये. घरात हवा खेळती असावी. खिडक्या उघड्या ठेवाव्यात.
लॉकडाऊन संपल्यावर कुठे काय होतंय?
ढालीच्या धोरणाचा अजूनही अनेक देशांनी शासकीय पातळीवर विचार केला नाहीय. पण प्रत्येक देश आपापल्या परिस्थितीनुसार निर्णय घेत गोष्टी हळूहळू उघडत आहे. कारण कोव्हिड जाईपर्यंत सगळा देश बंद ठेवणं कुणालाही प्रॅक्टिकली शक्य नाहीय.
जर्मनीमध्ये 800 स्केअर मिटरपेक्षा छोटी सर्व प्रकारची दुकानं 20 एप्रिलपासून उघडणार आहेत. 4 मेपासून शाळा अंशतः उघडणार आहेत.
स्पेनमध्ये 40 लाख कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. तिथे दोन आठवड्यांपूर्वीच कोव्हिडचा मोठा उद्रेक झाला होता.
डेन्मार्कमध्ये नर्सरी आणि प्राथमिक शाळा सुरू झाल्या आहेत.
ऑस्ट्रियामध्ये छोटी दुकानं, पब्लिक पार्क सुरू झाले आहेत. मोठी दुकानं आणि शॉपिंग सेंटर्स 1 मेपासून सुरू होणार आहेत.
पण ब्रिटनने मात्र 16 एप्रिलला लॉकडाऊनची मुदत वाढवण्याची घोषणा केली आहे. अजून किमान तीन आठवड्यांसाठी लॉकडाऊन वाढवण्यात येणार असल्याचं युकेचे परराष्ट्र सचिव डॉमिनिक राब यांनी सांगितलं आहे. आरोग्य व्यवस्थेवर ताण वाढू नये, म्हणून यूकेने हे पाऊल उचललं आहे.
अमेरिकेत 75 टक्के लोक लॉकडाऊनमध्ये आहेत. अमेरिकेतील 50 पैकी 32 राज्यांनी लोकांना घराबाहेर पडू नका असे आदेश दिले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप म्हणाले आहेत की अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येण्यासाठी लोकांवरील निर्बंध उठणं आवश्यक आहे.
भारतातही 20 एप्रिलनंतर ग्रीन झोनमधले उद्योगधंदे हळूहळू सुरू होणार आहेत. पण रेड झोनमध्ये मात्र लॉकडाऊन सुरू राहणार आहे.
थोडक्यात काय तर प्रत्येक देशाला हे लक्षात आलंय की कोव्हिड पुढचे अनेक महिने राहू शकतो. त्यामुळे कोव्हिड असताना कामं कशी सुरू करायची आणि त्याच वेळी लोकांचे जीवही कसे वाचवायचे असा दुहेरी विचार सगळे देश करताहेत.