Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

देगलूर पोटनिवडणूक: काँग्रेसचे जितेश अंतापूरकर विजयी, कशी झाली निवडणूक?

देगलूर पोटनिवडणूक: काँग्रेसचे जितेश अंतापूरकर विजयी, कशी झाली निवडणूक?
, मंगळवार, 2 नोव्हेंबर 2021 (17:16 IST)
- योगेश लाटकर
नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे जितेश अंतापूरकर हे विजयी झाले आहेत.
 
"भाजपाने कितीही फोडाफोडीचे राजकारण केले तरी जनतेचा कौल हा महाविकास आघाडीलाच आहे हे आज पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. केंद्रिय यंत्रणांचा वापर करून महाविकास आघाडीची प्रतिमा मलीन करण्याचे कितीही प्रयत्न केले तरी जनतेचा स्वच्छ कौल महाविकास आघाडीलाच आहे," अशी प्रतिक्रिया महाविकास आघाडीतील मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे.
 
जितेश अंतापूरकर हे 41 हजार 933 मतांनी विजयी झाले आहेत. भाजपच्या सुभाष साबणेंचा त्यांनी पराभव केला आहे.
 
2019 च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे रावसाहेब अंतापूरकर यांनी शिवसेनेचे उमेदवार सुभाष साबणे यांचा 22 हजार मतांनी पराभव केला होता. आमदार अंतापूरकर यांचं निधन झालं. त्यामुळे आता या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली.
 
निवडणुकीतील महत्त्वाचे मुद्दे
लोकांचा कल महाविकास आघाडीकडे आहे की भाजप हे या निवडणुकीतून काही अंशी दिसणार असल्यामुळे ही निवडणूक महत्त्वाची झाल्याचं जाणकार सांगतात.
 
या निवडणुकीत दोन तुल्यबळ प्रतिस्पर्धी असतानाच वंचित बहुजन आघाडी उच्चशिक्षित उमेदवार देऊन तगडे आव्हान उभे केले होते.
 
देगलूर-बिलोली हा मतदारसंघ सीमावर्ती विधानसभा मतदार संघ म्हणून ओळखला जातो. या संपूर्ण मतदारसंघात एकही मोठा उद्योग नाही त्यामुळे इथे बेरोजगारी ही प्रमुख समस्या असल्याची सातत्याने ओरड होते.
 
दोन्ही तालुक्यात अंतर्गत रस्त्यांची समस्या असल्याची तक्रार मतदार सातत्याने करतात. मतदारसंघात प्रवाही नद्या आहेत पण म्हणावे तसे सिंचन प्रकल्प कोणत्याही राजकीय पक्षाने मार्गी लावले नाहीत.
 
राज्याच्या विधानसभेत देगलूर विधानसभेचा क्रमांक हा 90 आहे. देगलूर विधानसभा क्षेत्रात देगलूर आणि बिलोली या दोन तालुक्यांचा समावेश आहे.
 
हे दोन्ही तालुके तेलंगणा आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवर नांदेड जिल्ह्यातील शेवटचे तालुके आहेत. सध्याची मतदार संख्या सुमारे 2 लाख 98 हजार एवढी आहे.
 
2009 च्या विधानसभा निवडणुकांत हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला तेव्हापासून या मतदारसंघाकडे प्रमुख नेत्यांचं दुर्लक्ष झाल्याचं म्हटलं जातं.
 
मतदारसंघ आरक्षित झाल्यानंतर काँग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर यांनी शिवसेनेच्या सुभाष साबणे यांचा 6 हजार मतांच्या फरकाने पराभव केला होता.
 
अंतापूरकर यांनी शासकीय नोकरीचा राजीनामा देऊन प्रथमच निवडणूक लढवली आणि विजयी झाले होते.
 
त्यानंतर 2014 च्या निवडणुकीत सेनेच्या सुभाष साबणे यांनी काँग्रेसच्या रावसाहेब अंतापूरकर यांचा 8 हजार मतांनी पराभव केला होता.
 
2019 साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या रावसाहेब अंतापूरकर यांनी सेनेच्या सुभाष साबणे यांचा 22 हजार मतांनी पराभव केला.
 
या सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे या मतदारसंघात अंतापूरकर आणि साबणे हे दोघेच एकमेकांवर मात करत राहिले. पण आता चित्र बदललं आहे.
 
काही महिन्यांपूर्वी रावसाहेब अंतापूरकर यांचे निधन झाले त्यामुळे पोटनिवडणुकीत काँग्रेसने रावसाहेब अंतापूरकर यांचे चिरंजीव जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी दिली आहे.
 
महाविकास आघाडी असल्याने निवडणूक लढवता येणार नाही म्हणून शिवसेनेचे साबणे हे भाजपमध्ये दाखल होऊन उमेदवार झाले आहेत तर वंचित बहुजन आघाडीनेही डॉ. उत्तम इंगोले यांच्या माध्यमातून तगडे आव्हान उभे केलं आहे.
 
पोटनिवडणुकीत मोठ्या प्रमाणात दलबदल
ही पोटनिवडणूक नांदेड जिल्ह्यात राजकीय पक्ष बदलासाठी चर्चेत राहिली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे मेहुणे भास्करराव पाटील खतगावकर हे काही वर्षांपूर्वी नाराज होऊन काँग्रेस सोडून भाजपात गेले होते.
 
त्यावेळी काँग्रेसचे माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा हे देखील भाजप मध्ये गेले होते. पण या पोटनिवडणुकीत त्यांचे मनपरिवर्तन झाले अन हे दोघेही भाजप सोडून पुन्हा काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. खतगावकर यांचे देगलूर विधानसभा क्षेत्रात वर्चस्व आहे, असं मानलं जातं.
 
ही निवडणूक महाविकास आघडीच्या नावाखाली लढवली जात आहे त्यामुळे काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र आहेत.
 
माजी आमदार सुभाष साबणे यांना मात्र काहीही करून पोटनिवडणूक लढवायचीच होती. त्यामुळे अखेर त्यांनी शिवसेनेचा त्याग करून भाजपशी घरोबा केला.
 
भाजपने त्यांना उमेदवारीही दिली. जिल्ह्यात विधानसभा निवडणूक आली की पुणे येथील व्यावसायिक भीमराव क्षीरसागर यांची आठवण जनतेला येते.
 
कारण ते निवडणूक काळात हमखास नांदेडमध्ये येतात आणि विविध पक्षाशी संपर्क करून निवडणूक लढवतात.
 
2019 साली त्यांनी भाजपकडून देगलूर विधानसभा निवडणूक लढवली होती. यावेळच्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेससोबत घरोबा केला पण तिकीट मिळाले नाही.
 
त्यानंतर खतगावकर काँग्रेसमध्ये आले अन् क्षीरसागर भाजपमध्ये गेले.
 
वंचित बहुजन आघाडीदेखील यावेळी निर्णायक ठरणार आहे. डॉ. उत्तम इंगोले यांना वंचित बहुजन आघडीने उमेदवारी दिली आहे. त्यांच्यासाठी प्रकाश आंबेडकर यांची जंगी सभा झाली. या सभेतील गर्दीचे मतदानात रूपांतर झाले तर प्रस्थापित पक्षांना अवघड होणार आहे.
 
'निवडणूक गल्लीची अन् गप्पा दिल्लीच्या'
खरंतर ही निवडणूक केवळ देगलूर विधानसभेची पोटनिवडणूक आहे. पण या निवडणुकीसाठी राज्याच्या आणि केंद्राच्या पातळीवरचे अनेक नेते मंत्री प्रचाराला येत आहेत.
 
प्रत्येकजण आपापल्या पक्षाला विजयी करा असे आवाहन मतदारांना करत आहेत पण या सभांमध्ये देगलूरच्या विकासाचे प्रश्न देगलूरच्या समस्या 100 टक्के हरवल्या आहेत.
 
विजयाचा करिष्मा
काँग्रेसला या निवडणुकीत जितेश अंतापूरकर यांना वडिलांच्या निधनामुळे मतदारांची सहानुभूती मिळेल, पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जितेश यांच्या प्रचाराच्या धुरा स्वीकारल्याने जनता विश्वास ठेवेल आणि शिवसेना राष्ट्रवादीची ताकत एकत्र येऊन विजय मिळेल असा विश्वास आहे.
 
सुभाष साबणे हे अनेक वर्षांपासून राजकीय जीवनात आहेत. सेनेकडून ते 3 वेळा विधानसभेवर गेले होते त्यामुळे त्यांच्याकडे अनुभव आहे.
 
प्रतिस्पर्धी जितेश हे राजकारणात नवखे आहेत, सहानुभूती आहे म्हणून विजय मिळेल असे आडाखे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते बांधत आहेत, तर मोदी-फडणवीस यांच्यावरील प्रेमामुळे विजय मिळेल, शिवसैनिक हे गुप्तपणे साथ देतील अशी आशा भाजपचे कार्यकर्ते बाळगून आहेत.
 
वंचित बहुजन आघाडीने देखील प्रचारात तगडे आवाहन उभे केले आहे. अंतापूरकर आणि साबणे या दोघांना आजवर अनेकदा संधी मिळालेली आहे पण त्यांनी मतदारसंघाचा विकास केलेला नाही.
 
उलट वंचितच्या उमेदवाराने 20 वर्षांपासून मतदारसंघातील लोकांना जिव्हाळ्याने आरोग्य सुविधा दिलेल्या आहेत सामाजिक काम आहे आणि वंचित आघाडीला मानणारा वर्ग यामुळे त्यांना विजयाची खात्री वाटते.
 
उमेदवारांचे शिक्षण
जितेश अंतापूरकर हे अभियांत्रिकी पदवीधर आहेत. सुभाष साबणे हे 12 वी आहेत. तर डॉ. उत्तम इंगोले हे एमबीबीएस, एमडी आहेत.
 
एकूणच शिवसेना भाजप यांनी एकमेकांचा घटस्फोट घेतल्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना हे एकत्र आले आणि राज्यात सत्ता स्थापन केली. महाविकास आघाडी सरकार उत्तम काम करत आहे असा दावा महाविकास आघाडी सरकार सातत्याने करते.
 
पण महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर काही दिवसांपूर्वी पंढरपूर इथं पोटनिवडणूक झाली पण तिथे भाजप उमेदवार विजयी झाला अन भाजप ने महाविकास आघाडी सरकारला जनतेची साथ नसल्याचं म्हटलं.
 
त्यानंतर आता देगलूर विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. भाजपला ही जागा जिंकून भाजपचं जनतेचं प्रेम आहे हे दाखवून द्यायचं आहे तर महाविकास आघाडी सरकारवरच जनतेचं प्रेम आहे आणि महाविकास आघाडी एकमेकांत दगाफटका करत नाही हे महाविकास आघाडीला दाखवून द्यायचं आहे.
 
शिवाय अशोक चव्हाण यांना देखील आपलं राजकीय महत्त्व या निवडणुकीच्या निमित्ताने सिद्ध करून दाखवायचं आहे. म्हणूनच ही निवडणूक सरकार आणि विवर्धि पक्षांच्या विश्वासाची निवडणूक म्हणावी लागणार आहे.
 
महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला
देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत कॉंग्रेस, भाजपसह वंचित बहुजन आघाडीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, असं मत दैनिक सकाळ नांदेड आवृत्तीचे संपादक अभय कुळकजाईकर यांनी व्यक्त केलं.
 
ते सांगतात, "पंढरपूर पोटनिवडणुक भाजपने जिंकल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या टीमचा विश्वास दुणावला आहे. तर दुसरीकडे महाआघाडी भक्कम असून कॉंग्रेस विजयी व्हावी यासाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. महाआघाडी विजयाचा वारू रोखणार का? हा प्रयत्न आहे."
 
"तिसरीकडे वंचित आघाडीच्या माध्यमातून अँड. प्रकाश आंबेडकर यावेळी विधानसभेत प्रवेश करण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी देखील महाआघाडीची भूमिका प्रामाणिकपणे पार पाडत आहेत. त्यामुळे या पोटनिवडणुकीचा निकाल राज्यातील आगामी निवडणुकींवर परिणाम करणारा ठरणार आहे," असं कुळकजाईकर म्हणाले.
 
"देगलूर विधान सभा निवडणुकीच्या निकालाचा संख्याबळाच्या दृष्टीने सरकारवर कोणताही परिणाम होणार नाही. परंतु या निकालाने महाविकास आघाडी किंवा भाजपचे नैतिक बळ वाढणार असल्याने ही निवडणूक महत्वाची आहे," असं ज्येष्ठ पत्रकार विनायक एकबोटे यांना वाटतं.
 
त्यांच्या मते, "राज्यात सध्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या ज्या कारवाया सुरू आहेत त्यावर महाविकास आघाडीचे जोरदार टीकास्त्र सुरू आहे. देगलूर विजयामुळे या टिकास्त्राची धार अजून तीव्र होऊ शकते. जनमत भाजपच्या विरोधात आहे हे ठासून सांगितलं जाईल.
 
"याऊलट देगलूरचा निकाल भाजप विरोधात गेला तर महाविकास आघाडी विरोधात रान पेटविण्यास भाजप अधिक आक्रमक होईल. पंढरपूर नंतर देगलूरही भाजपला अधिक नैतिक बळ मिळवून देईल.
 
"दोन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व देवेंद्र फडणवीस यांनी देगलूर मध्ये चांगलीच मोर्चे बांधणी केली. त्यामुळे दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागली.कोण सरस ठरणार हे निकालावरून स्पष्ट होईल. देगलूरच्या विकासावरही निवडणुकीचा परिणाम होणार नाही. ते पूर्वी मागास होते, पुढेही तसेच राहणार," असं विनायक एकबोटे म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

परमबिर सिंग पळाले की पळवून लावले ? नवाब मलिक यांचा सवाल