माजी उपपंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी अखेर निवडणुकीच्या अगदी आठवडाभरापूर्वी त्यांचं मौन सोडलं आहे.
भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिवसाच्या दोन दिवस आधी व्यक्त होण्यासाठी त्यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत भाषण केलं नाही तर एका ब्लॉगमधून स्वतःची भूमिका मांडली आहे.
पाचशेहून अधिक शब्दांच्या इंग्रजीत लिहिलेल्या या ब्लॉगचं शीर्षक आहे 'नेशन फर्स्ट, पार्टी नेक्स्ट, सेल्फ लास्ट' म्हणजे आधी देश, मग पक्ष, शेवटी स्वतः.
अडवाणी यांचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या गांधीनगरमधून यावेळी भाजप पक्षाध्यक्ष अमित शहा निवडणूक रिंगणात आहेत. या उमेदवारीनंतर अडवाणी यांनी पहिल्यांदा सार्वजनिक भाष्य केलं आहे.
पक्ष कार्यकर्त्यांना संबोधून त्यांनी हा ब्लॉग लिहिला आहे. विशेष म्हणजे 6 एप्रिलला भाजपचा पक्ष स्थापना दिवस असतो, त्यापूर्वी हा लेख लिहिलेला आहे.
अडवाणी लिहितात...
भाजपमध्ये आपल्या सर्वांसाठी मागे वळून पाहण्याची, पुढे पाहण्याची आणि स्वतःच्या अंतर्मनात डोकावण्याची ही एक संधी आहे. भाजप संस्थापकांपैकी एक या नात्याने मी मानतो की माझं प्रतिबिंब भारतीयांपुढे विशेषतः माझ्या पक्ष कार्यकर्त्यांसमोर सादर करावं, हे माझं कर्तव्य आहे.
माझे विचार मांडण्यापूर्वी मी गांधीनगरच्या जनतेप्रति आभार व्यक्त करतो, ज्यांनी 1991 नंतर सहा वेळा मला लोकसभेसाठी निवडून दिलं. त्यांचं प्रेम आणि पाठिंब्याने मी नेहमीच भारावलो आहे.
वयाच्या चौदाव्या वर्षी मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडला गेलो. तेव्हापासून मातृभूमीची सेवा करणं, हेच माझे ध्येय आणि मिशन राहिलं आहे.
"एक भाजप कार्यकर्ता असण्याचा अभिमान आहे आणि अडवाणी यांच्यासारख्या महान व्यक्तींनी त्याला मजबूत केल्याचादेखील अभिमान आहे," असंही मोदी यावेळी म्हणाले.