Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

डॉ. अब्दुल कलाम यांची इस्रोत निवड करणारे मराठी शास्त्रज्ञ डॉ. चिटणीस

डॉ. अब्दुल कलाम यांची इस्रोत निवड करणारे मराठी शास्त्रज्ञ डॉ. चिटणीस
- हलीमा कुरेशी
22 जुलैला भारताने चांद्रयान 2चं यशस्वी प्रक्षेपण केलं. इस्रो या अवकाश संशोधन संस्थेने ही कामगिरी बजावली. 1962 साली INCOSPAR (Indian national committee for space research) म्हणून सुरुवात झालेल्या रोपट्याचा पुढे इस्रो नावाने वटवृक्ष झाला. हा वृक्ष बहरला त्याचा फायदा देशाला झाला. अवकाश संस्थेची सुरुवात साराभाई आणि होमी भाभा आणि देशाचे पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या दूरदृष्टीमुळे झाली. या नेतृत्वाबरोबरच शास्त्रज्ञांची टीम देखील तितकीच भक्कम होती.
 
डॉ. सतीश धवन, डॉ. एकनाथ चिटणीस, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्यापैकी डॉ. एकनाथ चिटणीस हे भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोचे संस्थापक सदस्य असून त्यांनी भारताच्या संशोधन क्षेत्राच्या पाया बांधणीत महत्वाची भूमिका बजावली आहे. 1952 साली त्यांचा डॉ. विक्रम साराभाई आणि होमी भाभा यांच्याशी संपर्क झाला. डॉ. चिटणीस मूळचे पुण्याचे असून निवृत्तीनंतर ते पुण्यातच राहत आहेत. भारताने अवकाश संशोधन क्षेत्रातील कामगिरी डोळे दिपवणारी आहे, याच सुवर्ण इतिहासाचे साक्षीदार असलेल्या चिटणीस सरांशी बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी हलीमा कुरेशी यांनी संवाद साधला.
 
प्रश्न - इस्रोची सुरुवात कशी झाली आणि त्याचं बालरूप कसं होतं ?
 
डॉ. एकनाथ चिटणीस - इस्रो म्हणजेच 'इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन'ची स्थापना अहमदाबाद येथील 'फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी' पासून झाली असं म्हणता येईल. ही अतिशय सुसज्ज अशी लॅबोरेटरी होती. कॉस्मिक किरणांबरोबर इतर विषयावर इथं काम चालायचं. मी 1952 साली पुणे विद्यापीठातून फिजिक्स विषयात मास्टर्स पूर्ण करून अहमदाबाद इथं रूजू झालो होतो. तिथं माझी भेट विक्रम साराभाई आणि डॉ. रामनाथन यांच्याशी झाली. 1957 साली रशियाने 'स्पुटनिक' हा पहिला मानवनिर्मित उपग्रह अवकाशात सोडला होता.
 
दरम्यान, अमेरिकेत एम.आय.टी. मध्ये मी काम सुरू केलं होतं. पण साराभाईंनी मला भारतात बोलावून घेतलं. 'स्पुटनिक' गेल्यानंतर साराभाई आणि रामनाथन यांनी या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून त्याचा कम्युनिकेशन, हवामान, शेती यांसाठी फायदा करून घ्यायचं ठरवलं होतं. तेव्हा सगळं कल्पनावत होतं. पण इस्रोने हे सगळं प्रत्यक्षात आणलं आहे. डॉ. होमी भाभा आणि डॉ. विक्रम साराभाई यांच्या नेतृत्वाखाली 'इंकोस्पार' ही कमिटी 1962 साली स्थापना झाली. या कमिटीचा मी मेंबर सेक्रेटरी होतो.
 
आम्ही अमेरिकेची या संशोधनासाठी मदत घ्यायचं ठरवलं. अमेरिकेला वाटलं भारताला काय करायचं आहे अवकाश संशोधन? यांच्याकडे लोकांना खायला पुरेसं अन्न नाही. मात्र आम्ही त्यांना सांगितलं, तुमच्यासारखं चंद्रावर माणूस पाठवायचा नाही. आम्हाला या तंत्रज्ञानाचा उपयोग देशात प्रभावी संपर्क यंत्रणा, पिकांची माहिती हवामान यांच्यासाठी करायचा आहे. यानंतर अमेरिकेने आम्हाला साऊंडिंग रॉकेट द्यायचं मान्य केलं. पुढे याच रॉकेटवर आम्ही वेगवेगळे प्रयोग केले.
 
इंकोस्पारची स्थापना झाली खरी, पण अवकाश संशोधन आणि त्यातले प्रयोग यासाठीची सगळी ठिकाणं उत्तर गोलार्धाजवळ होती. म्हणून भारतातून जाणाऱ्या मॅग्नेटीक इक्वेटरची जागा शोधून काढली. ती जागा थुंबा या ठिकाणी होती. त्याठिकाणी रॉकेट स्टेशन तयार केलं (रॉकेट लॉन्चिंग स्टेशन).
webdunia
प्रश्न - अवकाश संशोधन आणि नवीन तंत्रज्ञान यांसाठी काम करायला सुरुवात केली, तेव्हा सरकारची भूमिका नेमकी कशी होती?
डॉ. एकनाथ चिटणीस - पंडित नेहरूंचा प्रचंड पाठिंबा होता. आम्ही सुरुवात केली तेव्हा अर्थसंकल्पात अवकाश संशोधनाविषयी कुठल्याही निधीची तरतूद नव्हती. पण नेहरूंनी आम्हाला उणीव भासू दिली नाही. ते मदत करत सुटले. पुढे इंदिरा गांधी यांनीही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत आम्हाला खूपच मदत केली.
 
स्पेस प्रोग्राम प्रचंड धोकादायक असतो. एखादं मिशन फेल होऊ शकतं. आपल्याकडे आपण प्रयत्न करत नाही, कारण आपण अपयशाला घाबरतो. आम्हालासुद्धा अनेक अपयश आले. पण इंदिरा गांधी आमच्या मागे ठाम उभ्या होत्या. पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी यांनीही महत्वाची भूमिका बजावली.
 
प्रश्न - भारतातल्या कम्युनिकेशन तंत्रज्ञानाची काय स्थिती होती. INSAT ची सुरुवात कशी झाली?
डॉ. एकनाथ चिटणीस - कम्युनिकेशनची स्थिती दयनीय होती. लोकांकडे टेलिफोन नव्हते. पुण्याहून मुंबईला फोन करणंही अवघड होतं. उपग्रह तंत्रज्ञान (satelite) येण्यापूर्वी हे सगळं जमिनीवरून व्हायचं.
 
उपग्रह तंत्रज्ञान आल्यानंतर आमच्या लक्षात आलं की हे तंत्रज्ञान वापरून आपण क्रांती करू शकतो. पण सरकारी विभागांचा आमच्यावर विश्वास नव्हता. मात्र नंतर इंदिरा गांधी यांचा पाठिंबा मिळाला. आम्हाला अमेरिकेनंसुद्धा मदत केली. आम्ही सरकारला सिध्द करून दाखवलं की उपग्रहाद्वारे संपूर्ण भारतात संपर्काचं जाळं तयार करू शकतो. नाहीतर पारंपरिक पद्धतीने जर आपण वाट बघितली असती तर आपण कम्युनिकेशनमध्ये 20 वर्षे मागे असतो.
 
कम्युनिकेशन सॅटेलाईटबरोबरच शेती, हवामान यांसाठी देखील उपग्रह माहिती देऊ शकतो. त्यामुळे आपला कार्यक्रम भारदस्त झाला. याचा फायदा देशाला झाला. यामुळे आम्हाला केंद्र सरकारचा प्रचंड सपोर्ट मिळाला. अगदी पेन्सिल रॉकेटपासून कलाम यांनी सुरुवात केली होती. आता आपण चंद्रावर जाणारे रॉकेट तयार करू शकलो ही अलिकडच्या 35 वर्षांतील प्रगती आहे.
 
आम्ही शास्त्रज्ञांची एक पिढी तयार केली. जिथं अमेरिकेला दहापट खर्च येतो. तिथं हे शास्त्रज्ञ अतिशय कमी पैशात तंत्रज्ञान विकसित करू लागले. यामुळे आम्हाला शासनाचा पाठिंबा मिळत राहिला. इंदिरा गांधी आणि त्यानंतर आलेल्या सरकारनेही तसाच पाठिंबा दिला.
 
प्रश्न - अवकाश संशोधन संस्थेच्या टीमच्या निवडप्रक्रियेत तुम्ही होता? डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची निवडही तुम्ही केली होती?
डॉ. एकनाथ चिटणीस - खरंतर या निवडीची सुरुवात अहमदाबादमधल्या फिजिकल लॅबपासून झाली. तिथले विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी होण्यास उत्सुक होते. आम्ही तिथले विद्यार्थी घेतले आणि काही बाहेरून घेतले. आम्हाला टीम निवडीचं पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आलं होतं. तिथं यूपीएससी वगैरे भानगड नव्हती.
 
आम्हाला सरकारने मुभा दिली होती. चांगला मनुष्य आहे तर घ्या इतकी साधी प्रक्रिया होती. अब्दुल कलाम यांचा बायोडाटा विक्रम साराभाई यांच्याकडे आला. त्यांनी मला दाखवला. म्हणाले, "हा बघ कसा वाटतोय?" मी बायोडाटा बघून "छान आहे, घेऊयात," असं म्हटलं आणि कलाम यांची निवड झाली.
 
या सगळ्या प्रक्रियेमुळे वेळ वाचायचा. सगळे उत्साहाने काम करायचे. शून्यापासून सुरुवात होती. सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतली. थांबायला वेळ नव्हता. थुबा येथील चर्चमध्ये काम सुरू केलं. बिल्डिंग बांधण्याच्या फंद्यात पडलो नाही. त्यामुळे आम्ही लवकर काम सुरू करू शकलो.
 
प्रश्न - अवकाश संशोधनातील इतिहास घडत असताना तुम्हाला अनेक अपयश देखील आले. आर.के. लक्ष्मण यांनीही व्यंगचित्र रेखाटली होती ?
डॉ. एकनाथ चिटणीस - आम्ही सगळे अशा टीका-टिप्पणीपासून बाजूला राहिलो. शासनातील अनेकांना माहीत होत अपयश येणारच. आम्हालासुद्धा अपयश येणार हे माहीत होतं. पण यातूनच आम्ही यशस्वी होणार, हे सुद्धा माहीत होतं. आमची 'सायंटिफिक लीडरशीप' खंबीर होती.
 
विक्रम साराभाई, होमी भाभा यांचा पंतप्रधानांशी चांगला संपर्क होता. पंतप्रधानांचा यांच्यावर विश्वास होता. इंदिरा गांधी स्वतः उपग्रह प्रक्षेपणाला उपस्थित रहायच्या. आमच्याबरोबर मिसळायच्या. त्यामुळे त्यांच्याकडे 'फर्स्ट हॅण्ड' माहिती असायची. यामुळे जर अपयश आलं आणि आमच्यावर टीका झाली तरी त्याचा परिणाम पंतप्रधानांवर व्हायचा नाही. त्यामुळं व्यंगचित्रंसुद्धा रद्दीत जायची.
 
प्रश्न - चांद्रयान 2 मोहिमेचं यशस्वी प्रक्षेपण झालं. भारत ध्रुवीय प्रदेशात संशोधन करणार आहे का?
डॉ. एकनाथ चिटणीस - चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरणार आहे. चंद्र पृथ्वीच्या सर्वांत जवळ आहे. चंद्राबद्दल अजून खूप माहिती मिळवणं बाकी आहे. विश्व कसं निर्माण झालं, पहिल्या 3 सेकंदात काय झालं, कृष्ण विवर कसे बनले, तारे कसे बनले, हे सर्व माहीत करून घेणं प्रचंड कुतूहलाच आहे.
 
आईनस्टाईन सारख्या शास्त्रज्ञाने 100 वर्षांपूर्वी सांगितलेला सापेक्षतेचा सिद्धांत आजच्या काळात साधन उपलब्ध झाल्यानंतर तपासला असता खरा ठरला. तेव्हा साधन नसल्याने शास्त्रज्ञांनी कल्पना केल्या होत्या. हे सगळंच प्रचंड उत्साह वाढविणारं आहे.
 
प्रश्न - भारताचं अवकाश संशोधनातील भविष्य कसं आहे?
डॉ. एकनाथ चिटणीस - मी अनेक शाळा महाविद्यालयांत जातो तेव्हा तिथल्या विद्यार्थ्यांशी चर्चा होते. विद्यार्थी खूप चांगले प्रश्न विचारतात. पण त्यांचे पालक त्यांना सुरक्षित करिअर निवडायला सांगतात. प्युअर सायन्समध्ये करिअर करण्यास मनाई करतात.
 
मी अशा विद्यार्थ्यांना सांगेन, तुम्ही तुमच्या आवडीचं क्षेत्र निवडा, तुमच्या आई वडिलांचं ऐकू नका. आपल्याकडे इतकी हुशार मुलं आहेत. त्यापैकी एक टक्का मुले जरी फुलली तरी भारताच अवकाश संशोधनात उज्जवल भविष्य आहे, अस मला वाटतं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुस्लिम तरुणींनी शंकराच्या मंदिरात केला जलाभिषेक?