डॉ. पायल तडवी आत्महत्याप्रकरणी मुंबईतील B Y L नायर हॉस्पिटलच्या दोन विभागप्रमुखांना राज्य मानवी हक्क आयोगानं क्लीन चिट दिलीय. निलंबित केलेल्या स्त्रीरोग विभागाच्या यूनिट प्रमुख डॉ. चिंग ली आणि तत्कालीन विभागप्रमुख डॉ. एस. एस. शिरोडकर यांना अभय मिळालंय.
डॉ. पायल तडवी यांनी 22 मे 2019 रोजी नायर हॉस्पिटलच्या हॉस्टेल रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर डॉ. हेमा अहुजा, डॉ. भक्ती मेहरा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या तीन निवासी डॉक्टरांवर पायलचा जातीवरून छळ केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. या तिन्ही डॉक्टर ऑगस्ट महिन्यापासून जामिनावर बाहेर आहेत.
डॉ. पायल तडवीनं विभागप्रमुखांकडे रॅगिंग होत असल्याची लेखी तक्रार दिल्याचे कुटुंबीयांकडून कोणतेही पुरावे सादर करण्यात न आल्यानं राज्य मानवी हक्क आयोगानं हा निर्णय घेतला. शिवाय, परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेऊनही पायलच्या कुटुंबीयांनी आवाज का उठवला नाही, असा प्रश्नही आयोगानं उपस्थित केला.
"दोन्ही विभागप्रमुखांनी त्यांच्या वकिलांमार्फत हे सिद्ध केलंय की, पायलनं लेखी तक्रार दिल्याचे कुटुंबीयांकडे कोणतेही पुरावे नाहीत," असं महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष एम ए सईद यांनी सांगितलं.