आमच्या भूमिकेला जनसामान्याचा पाठिंबा आहे. त्यामुळेच या ठिकाणी इतकी गर्दी जमा झाली आहे. शेवटची व्यक्ती देखील दिसत नाहीये असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या दसरा मेळाव्याच्या भाषणाची सुरुवात केली.
"खरी शिवसेना कुणाची याचं उत्तर या जनसागराने दिलं आहे," असं एकनाथ शिंदे म्हणाले.
"हजारो शिवसैनिकांनी मिळून जो पक्ष उभारला तो आपल्या हव्यासासाठी गहाण टाकलात. तुम्ही राष्ट्रवादीच्या तालावर नाचलात," असा टोमणा एकनाथ शिंदेंनी लगावला.
"ज्या पक्षाचा उल्लेख बाळासाहेबांनी स्काउंड्रल्स असा केला होता त्यांच्या दावणीला तुम्ही शिवसेना बांधली."
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले गेल्या तीन महिन्यांपासून मी लोकांमध्ये फिरतोय, सर्व ठिकाणी लहान थोर लोक आमच्या स्वागतासाठी उभे आहेत. जर आम्ही गद्दारी केली असती तर तुम्ही आमच्यासोबत आला असता का असा सवाल एकनाथ शिंदेंनी मेळाव्यास उपस्थित असलेल्या लोकांना केला.
ही शिवसेना ना उद्धव ठाकरेंची आहे ना एकनाथ शिंदेंची नाही, तर ही शिवसेना केवळ शिवसैनिकांची आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांनी चालणाऱ्या लोकांची ही शिवसेना आहे.
आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे पाईक आणि शिलेदार आहोत असं एकनाथ शिंदे म्हणाले.
ही गद्दारी नाही गदर आहे
एकनाथ शिंदे म्हणाले तुम्ही आम्हाला म्हणतात आम्ही गद्दार आहोत. पण ही गद्दारी नाही तर हा गदर आहे. तुम्ही बाळासाहेबांचे विचार गहाण टाकलेत. तुम्ही म्हणतात बाप चोरणारी टोळी आली आहे, पण आम्ही असं म्हणावं का तुम्ही बापाचे विचार विकण्याचा प्रयत्न केला तुम्हाला काय म्हणायचं, असं एकनाथ शिंदेंनी विचारलं.
तुम्ही जे पाप केलं त्यासाठी तुम्ही बाळासाहेबांच्या समाधीवर माफी मागावी असं एकनाथ शिंदे म्हणाले.
Published By -Smita Joshi