Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लोकसभा निकाल: NDA विरुद्ध UPA - त्रिशंकू लोकसभा निवडून आल्यास सत्तास्थापनेसाठी कुणाचं पारडं किती जड?

लोकसभा निकाल: NDA विरुद्ध UPA - त्रिशंकू लोकसभा निवडून आल्यास सत्तास्थापनेसाठी कुणाचं पारडं किती जड?
गुरुवारी 23 मेला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागेल. पण एक्झिट पोल ते निकाल लागेपर्यंतची काय आहे परिस्थिती?
 
रविवारी अंतिम टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर आलेल्या अनेक एक्झिट पोल्समध्ये जवळपास सर्वच संस्थांनी भाजपप्रणित NDAची सरशी होईल, असं भाकित वर्तवलं आहे.
 
थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार
 
पण एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरतात का?
एक्झिट पोलचे अंदाज किती खरे ठरतात, याचं उत्तर ज्येष्ठ पत्रकार प्रणय रॉय आणि दोराब सोपारीवाला यांच्या 'द वर्डिक्ट…डिकोडिंग इंडियाज इलेक्शन' या पुस्तकात मिळतं.
 
या पुस्तकात 1980 ते 2018दरम्यान झालेल्या 833 एक्झिट पोलचे अंदाज देण्यात आलेले आहेत. त्यात ते लिहितात, "एक्झिट पोल खरे ठरण्याचा अंदाज 84 टक्के इतका आहे."
 
त्यामुळे अगदी तंतोतंत नाही पण एक्झिट पोलमुळे आपल्याला राजकीय परिस्थितीचा अंदाज समजतो.
 
बीबीसी मराठीने याच विषयी दिल्लीतील काही ज्येष्ठ मराठी पत्रकारांबरोबर विश्लेषण केलं. पाहा हा व्हीडिओ -
 
Skip Facebook post by BBC News Marathi End of Facebook post by BBC News Marathi
या चर्चासत्रात एक्झिट पोलविषयी ज्येष्ठ पत्रकार सुनील चावके सांगतात, "एक्झिट पोल बरेचदा फसवे ठरले आहेत. एक्झिट पोल आणि प्रत्यक्षातला निकाल या दोन आकड्यांमध्ये बरीच तफावत असते. नुसतं एक्झिट पोलवर विसंबून राहून मोदींचं सरकार आलं, असं गृहित धरण्यात काही अर्थ नाही."
 
तर ज्येष्ठ पत्रकार अदिती फडणीस यांच्या मते, "एक्झिट पोलचं काम फक्त दिशा दाखवणं एवढंच असतं आणि ती दिशा स्पष्ट करण्यात आली आहे. कारण सगळे एक्झिट पोल एकच गोष्ट सांगत आहे की भाजप सत्तेवर येईल.
 
"पण जितक्या जागा भाजपला एक्झिट पोलमध्ये देण्यात आल्या आहेत, तितक्या येणार नाहीत, असा अनेकांना संशय आहे. कारण उत्तर प्रदेशात भाजप पिछाडीवर येईल, असं सांगितलं जात आहे," त्या सांगतात.
 
उत्तर प्रदेशमधील भाजपच्या जागांविषयी ज्येष्ठ पत्रकार महेश सरलष्कर सांगतात, "उत्तर प्रदेशात भाजपला कमीत कमी 25 तर जास्तीत जास्त 50 ते 60 जागा एक्झिट पोल्समध्ये देण्यात आल्या आहेत. दलित मतं ट्रान्सफर होत आहेत, असं लोकांचं म्हणणं होतं. यामुळे मग एक्झिट पोलचे नंबर्स आणि ग्राउंड रिअॅलिटी यात कुठेतरी मिसमॅच होत आहे, असं मला वाटतं."
 
EVM वादात किती तथ्य?
EVMच्या वादाविषयी अदिती फडणीस सांगतात, "EVMबाबत दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे, EVMची तांत्रिक बाजू स्वयंपूर्ण आहे, असं मला वाटतं. कारण जोवर तुम्ही EVMला पूर्णपणे तोडणार नाही, तोवर त्यासोबत छेडछाड करता येऊ शकत नाही. ज्या कंपन्यांनी EVM बनवलंय, त्यांचं म्हणणं आहे की EVM एक स्टँड-अलोन मशीन आहे, जिला वायफाय, ब्लूटूथ अशा कोणत्याच पद्धतीनं प्रभावित करता येऊ शकत नाही."
 
"पण आता EVMवरून विरोधी पक्ष आवाज करत आहेत. हा एक्झिट पोलचा परिणाम असू शकतो. त्यामुळे EVMचा मुद्दा काढून आपण कसं स्पष्टीकरण द्यावं, याचा विचार विरोधी पक्ष करत असावेत," त्या पुढे सांगतात.
 
पण सुनील चावके यांच्या मते, "EVM स्टँड-अलोन मशीन जरी असलं तरी त्यात एक कॅलक्युलेटर आहे, जे काही आपल्या मनानी कॅलक्युलेट करत नाही. त्याला काहीतरी कमांड दिलेली असते. त्यानुसार ते कॅलक्युलेट करतं. कमांड देऊन एखादी गोष्ट डायव्हर्ट करता येऊ शकते, आपल्याला हवी तशी वळवता येऊ शकते.
 
"पण आता सगळीकडे EVM सापडू लागले आहेत. त्यामुळे एक्झिट पोलचे निकाल मॅच व्हावेत म्हणून तर काही खेळ सुरू नाही ना, अशा पद्धतीची शंका विरोधकांना आहे. शिवाय, VVPAT मोजण्यात काय प्रॉब्लेम आहे?"
 
ज्येष्ठ पत्रकार सुरेखा टाकसाळ सांगतात, "ज्या पक्षाला अपयश येतं किंवा आपल्याला कमी जागा मिळत आहेत, असं पक्षाला वाटतं तेव्हा ते आधीपासूनच आरडाओरडा करायला लागतात की EVM सदोष आहे. पण गेल्या वर्षी चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्या, त्यात काँग्रेस जिंकलं होतं. त्यावेळी मात्र त्या पक्षानं आरडाओरडा केलेला दिसला नाही."
 
अदिती फडणीस सांगतात, "पक्षांच्या रणनीतीला किती यश येईल, हे आताच सांगू शकत नाही. कारण कुणाचे किती नंबर येतील, त्यावर हे अवलंबून असेल. जोवर नेमक्या जागा स्पष्ट होत नाहीत, तोवर हे सांगणं कठीण होईल. (YSR) काँग्रेस, तेलुगू देसम पक्ष या सर्व प्रादेशिक पक्षांच्या किती जागा येतील, यावर विरोधी पक्षांचं गणित अवलंबून असेल. त्यांच्या सरकारचं भवितव्य अवलंबून असेल."
 
काँग्रेस कमी पडली?
लोकसभा मोहिमेत तर कोण वरचढ ठरलं, याविषयी बोलताना पत्रकार महेश सरलष्कर सांगतात, "एक्झिट पोलनुसार निकाल लागले तर काँग्रेसनं सरकार बनवायचा प्रश्नच येत नाही. समजा अशी परिस्थिती निर्माण झाली की NDAला बहुमत मिळालं नाही तर काँग्रेस आणि बिगर-भाजप आघाडीतील पक्ष, जसे की सपा आणि बसपा, यांना मिळून सत्ता स्थापन करता येईल काय? तर या परिस्थितीत काँग्रेसचा पंतप्रधान होणार किंवा अन्य पक्षाचा होणार, हा त्यात प्रश्न आहे.
 
"मायावती, ममता बॅनर्जी या दोघींनाही दिल्लीत यायचं आहे. त्यामुळे हे घटक राहुल गांधींना विरोध करत आहेत. हा मुद्दा पकडला तर राहुल गांधी पंतप्रधान बनणार नाहीत."
 
ते पुढे सांगतात, "दुसरा मुद्दा संपूर्ण निवडणुकीचं चित्र बघितलं तर त्यात काँग्रेस कमी पडलं आहे. काँग्रेस संघटनात्मक पातळीवर कमी पडलं. प्रियंका गांधींना उत्तर प्रदेशात आणलं, पण त्याचा तितका काही परिणाम झाला नाही. उत्तर प्रदेशासारख्या इतक्या मोठ्या राज्यात एक व्यक्ती बदल घडवेल, हे शक्यच नाही. त्यामुळे काँग्रेस नक्कीच कमी पडली."
 
त्रिशंकू अवस्थेत कुणाचं पारडं जड?
त्रिशंकू अवस्थेत कुणाचं पारडं जड ठरेल, याविषयी सुरेखा टाकसाळ सांगतात, "सध्या तरी NDAची स्थिती मजबूत दिसते, UPAचे कमकुवत दिसते. UPA आणि इतर मिळून NDAच्या आसपास आले तर UPA सत्तेत येण्याचा चान्स आहे. पण त्यांना त्यासाठीच जुळवाजुळव करणं कठीण जाईल, कारण त्यांच्यात पंतप्रधानपदाचे अनेक दावेदार आहेत."
 
तर मंगेश वैशंपायन यांच्या मते, "NDAचे जे घटक पक्ष असतील ते मोदींना मनमानी कारभार करू देणार नाही. नीतीश कुमार यांनी वक्तव्य केलंय की, 370 वगैरे रद्द करायचं नाही. आम्ही याला मान्यता दिलेली नाही, असं नीतीश कुमारांनी निकाल लागण्याच्या आधीच हे स्पष्ट केलंय.
 
"दुसरीकडे 19 विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. याशिवाय एक्झिट पोलमध्ये त्यांच्या जागा वाढण्याची शक्यता दिसतेय. त्यामुळे सरकारला गेल्या कार्यकाळाप्रमाणे कामकाज रेटून नेता येणार नाही."

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सावधान, फेसबुकनंतर आता इंस्टाग्रामच्या डेटाची चोरी, बर्‍याच लोकांना लागला झटका