Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबईच्या प्रश्नांवर किती दिवस टोलवाटोलवी होणार?

मुंबईच्या प्रश्नांवर किती दिवस टोलवाटोलवी होणार?
- प्राजक्ता पोळ
गेले चार दिवस मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. पाऊस पडला की मुंबईत पाणी तुंबतं. यावर काहीच उपाय नाही का? असा प्रश्न मुंबईकरांच्या मनात येतो.
 
मुंबईमध्ये 28 जून ते 1 जुलै अशा चार दिवसांची आकडेवारी पाहिल्यास या काळात भरपूर पाऊस पडल्याचे दिसून येईल. 28 जून रोजी शहरात 235 मिमी पाऊस पडला. त्यानंतर 29 जून रोजी 93 मिमी, 30 जून रोजी 92 मिमी आणि 1 जुलै रोजी 375 मिमी पाऊस पडला. 1 जुलैचा 375 मिमी पाऊस हा 24 तासांमध्ये पडलेला गेल्या दशकभराच्या कालवधीतील सर्वांत जास्त पाऊस आहे.
 
मुंबईत इतका पाऊस पडल्यामुळे दरवर्षी पाणी साचणाऱ्या प्रदेशात पाणी साचलंच परंतु वाहतूक व्यवस्था पुन्हा एकदा कोलमडली. मुंबईच्या लोकल सेवेवर त्याचा परिणाम दिसून आला. परंतु ही स्थिती दरवर्षी येत असेल तर त्यावर पर्याय काढणं गरजेचं आहे असं तज्ज्ञांना वाटू लागलं आहे.
 
केवळ पावसावर खापर फोडून व्यवस्था चालवणाऱ्यांना जबाबदारी ढकलता येणार नाही असं मत बीबीसी मराठीकडे अनेकांनी व्यक्त केलं.
 
मुंबईत पाणी तुंबणं आणि मालाडमध्ये भिंत कोसळण्याची घटना घडणं हे पालिकेचं अपयश नाही तर हा अपघात आहे असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचं मत आहे. रशियात मॉस्कोमध्येही असा पूर येत असल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबईत खूप पाऊस पडतो तसंच अनधिकृत बांधकामसुद्धा त्याला जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
 
'असंतोष मतांमध्ये परावर्तित होत नाही'
 
मुंबई महानगरपालिकेने आपली जबाबदारीच पार पाडलेली नाही, असं मत काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी बीबीसी मराठीकडे व्यक्त केलं.
 
ते म्हणाले, "पाऊस किती पडला याचे आकडे हवामान विभागाकडून स्पष्ट होत नाही. काल बीएमसीने 550 मिमी पाऊस पडल्याचं सांगितलं तर मुख्यमंत्र्यांनी 375 मिमी पाऊस पडल्याचं सांगितलं. बीएमसीकडून आकडे फुगवून सांगितले जात आहेत का याबद्दल शंका आहे."
 
"मुंबई पालिकेने जबाबदारी झटकण्याचा प्रश्न नाही तर त्यांनी जबाबदारी पार पाडलेलीच नाही. नालेसफाई आणि इतर पावसाळी कामे झालेली नाहीत. दरवर्षी पावसाळ्यात मुंबई तुंबते. लोकांना अडचणींना सामोरे जावं लागतं. पण हा असंतोष निवडणुकीत मतांमध्ये परावर्तित होत नाही हे पाहून वाईट वाटतं," सावंत सांगतात.

webdunia

 
नालेसफाईबरोबर पंपिंग स्टेशनची गरज
मुंबई महानगरपालिकेचे माजी आयुक्त सुबोधकुमार यांनी नालेसफाईबरोबर पंपिंग स्टेशन्सची गरज आहे असं मत बीबीसी मराठीकडे व्यक्त केलं.
 
ते म्हणाले, "मुंबईमध्ये आता 6 पंपिंग स्टेशन्स आहेत. 2006 साली मुंबईत येणार्‍या पुराबाबत काय उपाययोजना करता येतील यासाठी तज्ज्ञांची समिती तयार करण्यात आली होती. त्या समितीने मुंबईमध्ये विविध ठिकाणी 8 पंपिंग स्टेशन बसवण्याचे सुचवले होते. पण आतापर्यंत 6 पंपिंग स्टेशन्स बसवली आहेत. 2 अजूनही प्रलंबित आहेत. ते काम पूर्ण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. 6 पंपिंग स्टेशनमधून 14 million लीटर पाण्याचा निचरा व्हायला मदत होते. अजून पंपिंग स्टेशन्स बसवले तर आताच्या परिस्थितीत फरक पडू शकतो."
 
मुंबईमध्ये नेदरलॅंड्स सारख्या उपाययोजना करता येणे शक्य आहे का याबाबत बोलताना सुबोधकुमार म्हणाले, "मिठी नदी ही पूर्णपणे स्वच्छ करण्यासाठी काही आधुनिक तंत्रज्ञान वापरली पाहिजेत. मुंबई शहराचा भाग सखल आहे त्यामुळे तिथे पाणी भरल्याची कारणं दिली जातात. पण भारताव्यतिरिक्त इतर देशांमध्येही अशीच भौगोलिक परिस्थिती असून तिथे मुंबईसारखी पूरस्थिती निर्माण होत नाही."
 
पुढे ते सांगतात, "जर नेदरलॅंडचं उदाहरण घ्यायचं झालं तर नेदरलँडमध्ये low line area आहे. पण त्या देशांनी समुद्राचं पाणी अडवण्यासाठी विविध प्रकल्प अमलांत आणले. जसं मजबूत समुद्र तटरक्षक भिंती बांधणं, पवनचक्क्या लावणं अशा गोष्टी त्यांनी केल्या. त्यामुळे मुंबईसारखी परिस्थिती तिथे निर्माण होत नाही. असं नियोजन मुंबईमध्ये आतापासूनच केलं तर पुढच्या 4 ते 5 वर्षांनंतर मुंबईची पावसाळ्यातली परिस्थिती बदललेली दिसेल."
 
शिवसेना आणि भाजप लोकांची फसवणूक करत आहेत
आजच्या पावसामुळे मुंबईत अनेक वस्त्यांमध्येही पाणी शिरलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि माजी आमदार नवाब मलिक यांच्या घरामध्येही पाणी शिरलं. नवाब मलिक यांनी आपल्या घराचे फोटो ट्वीट करून शिवसेनेने करून दाखवले असे लिहिले आहे. तसेच या ट्वीटमध्ये त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना, मुख्यमंत्री कार्यालय आणि महानगरपालिकेलाही टॅग केलं आहे.
 
मुंबईच्या या स्थितीबद्दल बोलताना ते बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, "सहा महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरेंनी आरोप केले होते की, जर मुंबई तुंबली तर त्याला जबाबदार एमएमआरडीए असेल कारण मेट्रोच्या कामामुळे शहरात अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. जी नालेसफाई दरवर्षी होते त्यात मोठा भ्रष्टाचार होतो असं भाजपने 6 महिन्यांपूर्वी सांगितलं आणि हे सत्तेसाठी आता एकत्र आले आहेत. त्या आरोपांमागचं सत्य काय आहे हे समोर आलं पाहीजे. शिवसेना भाजप लोकांची फसवणूक करत आहेत."
 
लोकांना कुठल्याही परिस्थितीत ठेवलं तरी ते आम्हालाच मतदान करणार या अविर्भावात वावरत आहेत. यामुळे त्यांच्या डोक्यात हवा गेली आहे. अख्खी मुंबई पाण्याखाली आहे. माझ्या घरातही पाणी घुसलंय आणि हे म्हणतात मुंबईत पाणीच भरलेलं नाही? काही सूचना केली तरी फेटाळून लावतात. लोकांनी आता सत्ताधाऱ्यांना धडा शिकविण्याची गरज आहे."
 
webdunia


'नालेसफाईचं काम दिवाळीपासूनच सुरू झालं पाहिजे'
पावसामुळे मुंबईमध्ये तुंबलेल्या पाण्याबद्दल उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी नालेसफाई मे महिन्यापर्यंत लांबवण्यापेक्षा त्याचं नियोजन वेळेत झालं पाहिजे असं मत व्यक्त केलं.
 
ते म्हणाले, "नालेसफाई दिवाळीपासून सुरू झाली पाहिजे आणि एप्रिल-मे मध्ये कामाचं पर्यवेक्षण झालं पाहिजे. सध्या मार्च महिन्यामध्ये याची टेंडर काढली जातात. त्यामुळे नालेसफाईचं एक वेळापत्रक तयार केलं पाहिजे. सोमवार आणि मंगळवारी मुंबईत भरपूर पाऊस पडला त्याचप्रमाणे हायटाईडमुळेही पाणी तुंबलं. पण नालेसफाई वेळेत झाल्यामुळे त्या स्थितीमध्ये थोडा बदल होऊ शकेल."

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आणि एकनाथ खडसे भावूक झाले