'श्रीलंका ट्विन्स' नावाच्या एका संस्थेने कोलंबोमध्येएका भल्या मोठ्या स्टेडियममध्ये एका जुळ्यांसाठीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. कार्यक्रमाचं उद्देश होतं 1999 मध्ये तैवानने केलेला जुळ्या व्यक्तींचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मोडण्याचा.
त्यासाठी देशभरातल्या सगळ्या जुळ्या व्यक्तींना इथे एकत्र येण्याचं आवाहन त्यासाठी करण्यात आलं होतं. ते जमलेही, मात्र अपेक्षेपेक्षा जरा जास्तच संख्येने सहभागी या स्टेडियममध्ये दाखल झाले आणि विश्वविक्रम घडवण्यासाठीचा हा प्रयत्नच फसला.
नेमकं काय झालं?
20 जानेवारी रोजी श्रीलंकेची राजधानी कोलंबोत झालेल्या या कार्यक्रमासाठी अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी झाली. लांबच लांब रांगा लागल्या आणि कार्यक्रम नोंदणीसाठीच्या नियमांमुळे अधिक वेळ लागू लागला.
वर्ल्ड रेकॉर्ड करण्यासाठी जुळ्यांच्या जोड्या येत तर होत्या, पण त्यांचा जन्म दाखला तपासला जात असल्याने रांग वाढतच गेली.
शिवाय सहभागी होणाऱ्या व्यक्तींचे फोटोही काढण्यात येत होते.
जुळ्यांच्या 5000 जोड्या येतील आणि आपण तैवानचा विश्वविक्रम मोडू, असा आयोजकांचा अंदाज होता. तैवानमध्ये 1999 साली जुळ्यांच्या 3961 जोड्या, 37 तिळे (Triplets) आणि एकाच वेळी जन्मलेल्या 4 जणांचे (Quadruplets) चार गट एकाच ठिकाणी जमा झाले होते.
पण कोलंबोतील कार्यक्रमाच्या वेळी तब्बल 14 हजार जुळ्यांच्या जोड्यांनी नोंदणी केल्याचं AFP वृत्तसंस्थेने म्हटलंय.
यात जयंत आणि पुराका सेनेविर्तने हे दोन लष्करी अधिकारीही होते.
श्रीलंकन लष्करातल्या जुळ्यांचं त्यांनी जणू नेतृत्वच केलं.
प्रचंड गर्दी झाल्याने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी आवश्यक काटेकोर नियमांची अंमलबजावणी करणं शक्य नसल्याचं आयोजकांनी म्हटलं.
या विश्वविक्रमासाठी ही संस्था पात्र ठरली की नाही, हे तर पुढच्या आठवड्यातच समजू शकेल.
आपण पुन्हा एका कार्यक्रमाद्वारे प्रयत्न करणार असल्याचं या आयोजकांनी म्हटलंय. तर यामध्ये आपण आनंदाने पुन्हा सहभागी होऊ, असं अनेक सहभागी व्यक्तींनीही म्हटलेलं आहे.